त्यागमूर्ती : पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील
प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे
गुरुवर्य राजर्षी शाहूमहाराजांना गुरू मानून त्यांच्या कार्याचा वसा घेऊन आयुष्य भर जीवन जगणारे महान वंदनीय म्हणून ज्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ज्यांना भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरविले.केवळ सहावी पर्यंत शिक्षण घेतलेले पण पुणे विद्यापीठाने ( सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ) ज्यांच्या कार्याला नतमस्तक होऊन डी.लीट. ची पदवी देऊन त्यांना सन्मानित केले.अशा या महान, तपस्वी,त्यागी , रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ज्यांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यात, दर्याखोर्यात पोहचवून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देश व परदेशात सुद्धा एक आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या भाऊराव पायगोंडा पाटील यांच्या या १३७ व्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करतो.त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी झालेला होता.
त्यांच्या या महान कार्यामुळे शिक्षण हे केवळ शहरात न राहता ग्रामीण भागात,वाडी वस्ती पर्यंत पोहचले.शेतकरी,कष्टकरी आठरा पगड जातीतील मुलांना शिक्षण कसे मिळेल हे आण्णा पहात होते. त्यांना माहित होते शिक्षण हे माणसाचा सर्वांगीण विकास करू शकते.असे महापुरुष, कर्मवीर युगातून जन्म घेतात. निसर्ग त्यांना जन्माला घालतात. आणि ही मंडळी स्वतःच्या शरीराकडे,तब्येतीकडे, कुटुंबाकडे नीट लक्ष्य न देता केवळ आपल्या कार्याला सत्यशोधक पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. मग अंगावर सरळ कपडे असो-नसो,पायात वाहना असो- नसो,डोकीवर टोपी किंवा पटकाअसो -नसो.वेळेवर जेवन नाही.पण हाती घेतलेले काम कसे वेळेत पूर्ण होईल हे पहात (असत.आण्णा नी आपल्या संपूर्ण आयुष्यात हेच काम केले.जगायचे केवळ दुसऱ्यांच्या साठीच. स्वार्थ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच. होता तो सामान्यांच्या शिक्षणातील अडसर दूर होऊन त्यांना केवळ शिक्षण कसे मिळेल यासाठी.म्हणूनच आण्णा हे शिक्षण महर्षी, कर्मवीर होते.ते आपल्या कर्माने कर्मवीर झालेले होते.हे करत असतांना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष्य दिले नाही.माझ्या शाळा,वसतीगृहे त्यामध्ये राहणारी व शिकणारी मुलेच त्यांचा परिवार होता. किती मोठा हा त्यांचा त्याग होता.
१९०९ पासून म्हणजे दुधगाव जि.सांगली च्या शिक्षण प्रसार मंडळात आण्णांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन एक प्रकारे शिक्षण कार्याची मुहूर्त मेढ च रोवल्यासारखे होते. त्यातच वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी म्हणजे १९१२ ला कुंभोज च्या पाटलांचे कन्यारत्न आदाक्का हिच्याशी त्यांचे लग्न झाले .पुढे आण्णां नी त्यांचे नाव बदलले आणि लक्ष्मीबाई ठेवले.की ज्या वसतीगृहात राहणाऱ्या अनेक जाती धर्मांच्या मुलांच्या आयुष्यातील लक्ष्मीच्या रूपाने सेवा करत राहिल्या.त्यांनी आपले आयुष्य आण्णांनी सुरू केलेल्या त्या वसतिगृहातील मुलांच्या साठी जवळ- जवळ अठरा वर्षे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत वाहिले.कुटुंब, संसार हे न पाहता त्या मुलांना वसतीगृहात कशाची कमतरता होऊ नये यासाठी जगल्या प्रसंगी स्वतःचे,मंगळसूत्र, अंगावरील दागीने याचा कधी विचार च केला नाही.वसतीगृहात धान्य, जेवण या गोष्टींची वेळच्या वेळी कशी पूर्तता होईल ,हे पाहिले.आण्णांनी हाक मारली की त्यांनी ओळखलेले असायचे,वसतीगृहात काहीतरी कमतरता असणार. त्या मुलांना सणाला गोडधोड जेवण मिळालेच पाहिजे यासाठी त्यांनी स्वतःच्या दागिण्याकडे कधीच पाहिले नाही.किती मोठा हा त्याग या उभयतांचा मानावा लागेल. लग्नानंतर जबाबदारी वाढलेली,संकटे आली म्हणजे एकवटूनच येतात नोकरी,कामधंदा नाही त्यामुळे खूप भटकंती करावी लागायची.अनेक ठिकाणी नोकरी करण्याचा आण्णांनी प्रयत्न केला पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते,म्हणून ते नोकरी व्यवसायात कुठेच तग धरू शकले नाहीत. सातारा या ठिकाणी त्यांनी गणित इंग्रजी,संस्कृत या विषयांच्या शिकवण्या घेतल्या. पाटील मास्तर म्हणून त्यांची ओळख वाढली होती.ते अतिशय प्रामाणिक होते.स्वाभीमानी होते.१९१४ च्या काळात आत्माराम पंत ओगले(ओगलेवाडी,कराड) यांच्याकडे काच सामानाच्या विक्रीसाठी प्रचार प्रसार चे काम केले. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्कर (किर्लोस्करवाडी )यांच्याकडे त्यांच्या कारखान्यात लोखंडी नांगर,इंजिन विक्रीसाठी व्यापारी व शेतकरी यांना या वस्तूंची महती पटवून विक्रीसाठी एजंट म्हणून काम करतांना खेडोपाड्यात फिरतांना गोरगरीब व शेतकऱ्यांचे अठरा विश्व दारिद्र्य पाहून आण्णां समजत होते की उद्योग, रोजगार आणि शिक्षण यांची योग्य सांगड नसेल तर पुढे यांचे दु:ख वाढतच जाणार. यामुळे लोकांची काय दुर्दशा होते हे त्यांनी जवळून पाहिले होते.धनजी कूपर यांच्या कूपर कंपनी च्या उभारणीत खूप मोठ्या जबाबदारीने,व मोठ्या आशेने आपल्या शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक उभारणी होईल म्हणून काम केले, पण कूपरजी नी आपला शब्द पाळला नाही.आण्णा खूप चिडले हातापायी चा प्रसंग होणार होता.पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या सहिष्णुतेमुळे आण्णा शांत राहिले. दु:ख,दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा, यामुळेच लोकांचा विकास होत नाही . संकटे येतात म्हणून थांबून चालत नाही.रस्त्याने चालतांना ,कधी सपाट,कधी दगड धोंड्यांचा रस्ता,कधी चढ लागेल, घाट लागेल ,तर कधी उतार लागेल म्हणून चालायचे थांबून चालत नाही.दुधगाव मध्ये मनात घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षण कार्यास आपण वेळ दिला पाहिजे यासाठी.वेळ हवा म्हणून पुढे त्या एजंट च्या कामाचा त्यांनी राजीनामा दिला.पैसा कमवून संसार करणे हा जीवनाचा उद्देश त्यांनी कधीच मानला नव्हता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श,समोर ठेऊन महात्मा फुलें ची बहुजनांच्या,मुलां- मुली साठी शिक्षणासाठीची धडपड (१८२७ ते१८८९) , आण्णांना माहित होती.राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) यांनी अनेक जाती धर्माच्या मुलांच्या शिक्षणा साठी कोल्हापूर मध्ये सुरू केलेली वेगवेगळी वसतीगृहे. हे पाहून आण्णांना जाणवत होते.महात्मा फुलेंची तत्वे विद्ये विना मती,गती, नीती, वित्त आणि यामुळे शुद्र कसे खचलेले आहेत? यासाठीच ४आक्टोंबर १९१९ ला काले(कराड) या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची मुहूर्त मेढ वसतीगृहा सह रोवली होती.१९२१ ला नेर्ले( सांगली)या ठिकाणी वसतिगृह सुरू केले. नंतर पुढे १९२४ ला सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर करून सर्व जाती धर्मियासाठी वसतीगृहाची स्थापना केली होती. १९१४ चे पुत्ररत्न आप्पासाहेब, जेमतम वय वर्ष १६, तर १९१९ चे कन्यारत्न शकुंतला वय वर्ष ११ व १९२६ द्वितीय कन्यारत्न चि.बेबी(मृत्यु१९२८) अशा मुलांच्या लहान वयातच १९३० ला वहिनीं लक्ष्मीबाईं चे निधन झाले यामुळे आण्णा एकाकी झालेले. पत्नीचा आधार नाही.मुलांना आईचे प्रेम नाही.वाढती आर्थिक दुरावस्था. कामाचा व्याप यातून ही ते थांबले नाहीत.१९३२ ला पुणे या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युनियन बोर्डिंग हाऊस मिश्र वसतिगृहाची स्थापना केली.१९४७ साली सातारा येथे पहिल्या मोफत वसतिगृह युक्त महाविद्यालयाची स्थापना. त्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी काॅलेज ,सातारा.तर १९५४ ला कराड ला छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या धाडसांने मुकादम तात्या,भाई केशवराव पवार व स्थानिकांच्या सहकार्याने सैदापुर (उद्योगनगरीत )गाडगे बाबांच्या नावाने सदगुरू गाडगे महाराज काॅलेज सुरू केले.म्हणजे तळागाळापर्यंत महाविद्यालयीन शिक्षण कसे पोहचेल हे पाहिले.
रयत शिक्षण संस्था जनतेच्या ,समाज्याच्या सहकार्याने आण्णांनी उभी केली, राहिलेली आहे.या शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ही आण्णांच्या कुटूंबाशी कुठे ही जोडलीली नाही.कोणाचे ही नाव संस्थेच्या कोणत्याही शाखेला शाळेला,काॅलेजला,वसतीगृहाला, एकाद्या खोलीला आपल्या हयातीत आण्णांनी दिलेले नव्हते.हे शेतकरी,समाज यांच्याशी जोडलेले असे हे “रयत” नाव आहे. ब्रीदवाक्य आहे “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ” कमवा आणि शिका. बोधचिन्ह वटवृक्ष आहे की जो शेकडो वर्षे जगून आपली सावली इतरांना माणसांना,पशु-पक्षी या सर्वांना देत असतो. त्याची मुळे खूप खोलवर घट्ट रूजलेली असतात. कितीतरी पक्षी आपली घरटी बांधून रहात असतात.या प्रमाणेच या शिक्षण संस्थेतून अनेकांची शिक्षणे पूर्ण झाली. त्यांचे संसार फुलले .सेवकांचे कल्याण व्हावे म्हणून ,आर्थिक उन्नती व्हावी म्हणून १९४० मध्ये रयत सेवक को ऑप.बैंक स्थापनेचा पाया घातला.ती आज मोठ्या डौलाने कार्यरत आहे. यामुळेच आर्थिक विकास होण्यास,शिक्षणास मदत होत गेली. लोक उच्च विद्याविभूषित झाले.आण्णांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले.बॅ.पी.जी.पाटील यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले.त्यांनी ही भारतात आल्यावर संस्थेला वाहून घेतले.अनेक उच्च पदस्थ नोकर्यावर पाणी सोडले.या संस्थेचा कार्यभार आज ही रयतेतील जनमाणसांच्या खांद्यावर आहे.आण्णांनी अतिशय प्रामाणिक पणे संस्थेचा कार्यभार सांभाळला होता. एकदा रूकडी च्या शेतातील विकत आणलेले भुईमुगाच्या शेंगाचे पोते घरात जेव्हा आण्णांना दिसले होते,तेव्हा त्यांनी ते खाली काढून रूकडी ला परत करायला लावले.ते मटले “जरी हे विकत घेतले असले, तरी संस्थेच्या शेतातील काहीच आपण विकत घ्यायचे नाही.” पैसे दिले असले तरी लोक गैर अर्थ काढतात, म्हणून आपण इतर कोठून ही बाजारातून भुईमुगाच्या शेंगा विकत घेऊ,पण तेथील नको.” यामधून ही आण्णांचा फार मोठा प्रामाणिक पणा व त्याग या ठिकाणी दिसतो आहे.म्हणूनच रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात लाख मोलाचे योगदान आहे.अनेक शिक्षण संस्था एका मोठ्या आदराने संस्थेकडे पहात असतात.कामाचे एक वेगळेपण नाविन्य या संस्थेत नक्कीच पहायला मिळत असते. १९१९ पासून ते आज अखेर संस्थेची वाटचाल सुरू आहे.आण्णा म्हणायचे ” मला ओसाड जमीन द्या, मी त्याचे नंदनवन करून दाखवितो.” आणि खरोखरच आज रयत शिक्षण संस्था हे महाराष्ट्राचे एक देखने नंदनवन झालेले आहे.याच्यासाठी समाजातील सर्व घटक शिक्षक,प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य आहेच.आज महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्या मध्ये संस्थेची बीजे प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक,(मराठी,इंग्रजी) डी.एड बी.एड.,महाविद्यालये,वसतिगृहे अशा माध्यमातून खोलवर रुजली गेलेली आहेत.जवळ जवळ ७४० पर्यंत शाखांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे अखंड कार्य सुरूआहे.आज सातारा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील या नावाने विद्यापीठ ही सुरू झालेले आहे. मधल्या काळात अनेक आर्थिक संकटे ही येऊन गेली पण आण्णांचे हे कार्य थांबले नाही.थोर देणगीदार, धनिक, समाज हे सर्व जण आण्णांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. त्यातच आण्णांची चिकाटी,अचूक ध्येय,सत्यशोधकी पणा निस्वार्थी भावना,स्वाभिमान, प्रामाणिक पणा, त्यागी वृत्ती, शासनाची व रयतेची साथ यामुळेच संस्थेच्या यशस्वी कार्याची घोडदौड सुरू आहे.
प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे
सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत