संविधानाला धर्म मानावे का
संविधानाला धर्म मानावे का हा फैजान मुस्तफा यांच्या लोकसत्ता दि.14/8/24 च्या लेखांमध्ये प्रश्न विचारला आहे. खरं तर “माणुसकी हा धर्म” असं आपण म्हणतो या अर्थाने माणुसकी टिकवण्यासाठी व भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही. बंधन, अटी, नियम, कायदा, मार्गदर्शक तत्व ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. हे एक निमित्त आहे. सामाजिक जीवनामध्ये जीवन जगत असताना जे समता -बंधुताचे पालन करावे लागते ते गरजेचे आहे. सध्या धर्म म्हणून जो जो काही समूह आहे त्यामध्ये व्यक्ती केंद्रित आचरण हे खूप महत्त्वाचे आहे. विविध धर्मांची पारंपारीक शिकवण ही खरंच समताधिष्ठित आहे का, ती बंधुभाव शिकवते का, जर उच्च नीच भेदभाव करणाऱ्या जाती असतील, कनिष्ठ -वरिष्ठ असे प्रकार असतील, एकमेकांना वेगवेगळ्या नजरेने पाहण्याची शिकवण असेल तर हे अंधश्रद्धा, कर्मकांड, अवैज्ञानिक चालीरीती पाळणारे धर्म अधर्मच आहेत. माणसाच्या वाईट वागणुकीतून अनेक अन्याय, अत्याचार, व्यभिचार, भ्रष्टाचार होत असतील व धर्म त्यामध्ये काहीही करू शकत नसेल तर त्याला काय अर्थ आहे ?माणसाने त्या धर्माचे पालन करायचे ठरवले नसेल, धर्मगुरूंचे अथवा धर्म संस्थापकांच्या शिकवणीला जुमानले नसेल, तर काय अर्थ आहे.
भारतासारख्या विविध जाती धर्म,पंथ असलेल्या नागरिकांना एकाच नितीनियमांचे पालन करायला लावणाऱ्या संविधानाला सर्वश्रेष्ठ मानणे महत्त्वाचे आहे. यामध्ये भेदभावाला कुठेही स्थान नाही, गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या समताधिष्ठित ग्रंथाला पवित्र मानणे महत्त्वाचे आहे, त्यात चुकीचे अथवा गैर काही नाही. जर कायद्यांचे पालन केले नाही, तर शिक्षा करण्यात येते, सुधारणेला वाव देण्यात येतो, मनुष्याच्या चुकांची शिक्षा त्याला भोगावी लागते व पुढील आयुष्यात चांगल्या आचरणाची हमी त्याला द्यावी लागते आणि तो देतो हे आवश्यक आहे. जगात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असाव्यात आणि मानवता हा एकमेव धर्म असावा ज्यामुळे मानवाचे कल्याण होईल या अर्थाने संविधान हा योग्य, सत्याचा मार्ग दाखवणारा एकमेव ग्रंथ हा पवित्रच आहे.
त्याचा अपमान करणे त्याला कमी लेखणे, त्याच्या प्रति पूर्ण विश्वास नसणे हे चुकीचे आहे. देशामधील अन्याय, अत्याचार, हुकूमशाही , अराजकता, भ्रष्ट वातावरण, भेदभाव, असमानता नष्ट करायची असेल तर या बाबींना एकमेव संविधान याचे पालन करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. या दृष्टीने अर्थाचा अनर्थ न करता व्यापक दृष्टिकोनातून संविधानाला राष्ट्र ग्रंथ मानणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धर्माचा पगडा स्वार्थी हेतूने ठेवून, कट्टर धर्मांधता ही मानवाला विनाशाकडे, अधोगतीला घेऊन जाणारी आहे. म्हणून संविधान हेच सर्वोत्तम मानून त्याचे पालन करणे गरजेचे आहे. संविधान हा विशिष्ट धर्म होऊ शकत नाही. ह्या महान ग्रंथापुढे अगरबत्ती -मेणबत्ती लावणे ही आदरभाव दाखविण्याची एक भावना असू शकते. इथे कोणीही आरत्या, स्तोत्र म्हणत नाहीत व तसे कोणालाही अपेक्षितही नाही. इतर देव देवतांच्या पुढे करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या पूजा व हा आदरभाव याचा सरळ संबंध जोडणे अयोग्य आहे. जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे ,गुणगान करावे एवढे मात्र नक्की !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत