राखीव जागेवर निवडून आलेल्या नंदी बैलांना व शोभेच्या बाहुल्यानां अनावृत पत्र
नागभूषण बनसोडे
संदर्भ आहे स्वतःला सुप्रीम कोर्ट म्हणवून घेणाऱ्या एका जातिसमुहाने उपवर्गिकरण व क्रिमी लेअर लागू करण्याबाबत दिलेला असंवैधानिक निर्णय.
या निर्णयाने कधी नव्हे एवढा धोका अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या मूलभूत हक्कावर चाल करून येत आहे. खरे पाहिले तर या दोन्ही समूहाच्या आरक्षणावर हा कुनियोजित हल्ला आहे आणि आरक्षण मुळासकट उपटून टाकण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
या धोक्याची ज्यांना जाणीव झाली ते लोक आपल्या परीने आवाज उठवत आहेत पण जाती आधारित असलेल्या राखीव जागेवर निवडून गेलेल्या तथाकथित लोक प्रतिनिधींची या विषयावर दातखीळ का बसली आहे??
तुम्हाला हे राजकिय आरक्षण दगडावर डोके आपटून, उपास तापास करून, किवा कोणत्याही धर्माने तुमच्या झोळीत टाकलेली भीक म्हणून मिळालेले नाही तर यामागे एका महामानवाने तुमच्या पिढ्यन्पिढ्या सुरक्षित व्हाव्यात म्हणून आयुष्यभर केलेल्या संघर्षाचे फलित आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही संविधान रक्षकाची झुल पांघरून दारोदार जोगवा मागत फिरलात आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सर्वोच्च सभागृहात दखल झालात पण स्वतःच्या समाजाच्या घटनेने दिलेल्या न्याय्य हक्कांवर कुऱ्हाड चालविली जात असताना तुमची वाचा का बसली आहे??
तुम्ही कित्येक दशकापासून हा बाबासाहेबांच्या कृपेने मिळालेला मलिदा खात आहात मग त्यांनीच दिलेल्या आरक्षणावर असा हल्ला होत असताना तुमच्या संवेदना गोठल्या आहेत का??
राज्य घटनेने दिलेल्या आरक्षणा मधे ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणत्याही व्यवस्थेला नाही हे तुम्हाला माहीत नाही, येवढे दूधखुळे तुम्ही नक्कीच नाही मग तुम्हाला नेमके कशाचे भय आहे??
का या वर्गिकरणाच्या आधारे जाती जातीत आग लावून त्यावर तुमच्या भाकरी शेकायच्या आहेत??
आतापर्यंत नोकरी व शिक्षणामध्ये असलेल्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली आहे का या प्रश्नावर तुम्ही कधी तुमचे तोंड उघडले आहे काय??
एस सी, एस टी व ओबीसी समाजाच्या किती जागा सवर्णांनी ओरबाडून खाल्ल्या याचा हिशोब विचारायचे थोडे तरी धाडस तुमच्यामध्ये आहे काय??
घटनेतील कलम ३१२ नुसार न्याय्य व्यवस्थेतील भरती साठी स्वतंत्र आयोग नेमण्याची तरतूद असताना त्याची अंमलबजावणी गेल्या ७५ वर्षात का झाली नाही हा प्रश्र्न तुम्ही कधी संसदेत विचारला आहे का??
सुप्रीम कोर्टात एकाच जातीचे लोक गोचीडा सारखे घट्ट रुतून बसले आहेत त्यांच्या विरोधात बोलायला तुमची जीभ कधी झडणार आहे काय??
या निर्णयाच्या तुम्ही विरोधात आहात किंवा समर्थन करणार आहात हे जाहीररीत्या सांगण्याची तुमची हिम्मत आहे काय??
तुमच्या पैकी कोणीही फुटपाथ वर किंवा झोपडीत रहात नाही, किंवा जंगलात अंगाला झाडाच्या फांद्या गुंडाळून तुम्ही जगत नाही, तुमच्या सहित येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य तुम्ही सुरक्षित केलें आहे. याअर्थी क्रिमी लेअरचा नारळ तुमच्या नावाने फोडला पाहिजे हो ना??
तुमची जागा उपवर्गिकरणाच्य आधारे ज्यांना संधीचा लाभ मिळाला नाही अशा समाजासाठी सोडणार आहात का??
मग तुम्ही हे जाती आधारित आरक्षण नाकारून जनरल कॅटेगरी मधून तिकीट का मागत नाही??
संविधानाला धोका आहे म्हणून एस सी, एस टी व ओबीसी समाजाने तुमच्या झोळीत मतांची भीक टाकली मग त्या उपकाराला जगणार आहात की हाय कमांड ची पालखी वाहण्याताच तुमची हयात मातीत घालणार आहात??
या निर्णया वर तुम्ही मौन बाळगले किंवा गोलमाल उत्तरे दिली किंवा याचे समर्थन केले तर याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही हाय कमांडच्या इशाऱ्यावर डुलनारे नंदी बैल व शोभेच्या बाहुल्या आहात, तुमच्या जिवंत असण्याचे कोणतेही प्रमाण तुमच्या आचरणात दिसतं नाही.
अनुसूचित जातीतील लोकांचे घटनादत्त हक्क हिरावले जात असताना तूम्ही जर सोयीचे मौन बाळगणार असाल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला,तुमच्या आघाडीला प्रचारासाठी पाऊल ठेवू द्यायचे नाही अशी प्रतिज्ञा बाबासाहेबाना साक्ष मानून आंबेडकरी समाज घेत आहे याची नोंद घ्यावी.
जयभीम
नागभूषण बनसोडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत