दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मातृदिनाच्या निमित्ताने अशोककुमार उमरे यांची कविता ..” माय “

माय..!

उन्हाळ्यात पोळून निघालेल्यांना
पावसाच्या सरी भलेही
गगनात न मावणारा आनंद असे |
मात्र माझ्या मायच्या चेहऱ्यावर सुखदुःखाचे द्वंद्वचं दिसे ||

पाऊस नाही आला तर दुष्काळाने होरपळणे |
झळी सुरू झाल्या तर
मजुरीची दार बंद होऊन
कामधंद्यासाठी झुरणे ||

हातावर आणून पानांवर खाणाऱ्या व
भुकेने तडफडून जगणाऱ्यांची
अशीच लय भारी गत आहे |
गावगाड्यातील कोरडवाहू कास्तकार आणि शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या रहाटगाडग्याची
अशीच काहीशी जीवंत राहायची मरणांतिक धडपड आहे ||

खोटं वाटते? एक दिवस खेडं जगून पहा |
दवा नाही, डॉक्टर नाही, रस्ता नाही, लाईट नाही टोंगळं टोंगळ पांदनीच्या चिखलातून आमच्या गावात येऊन तर पहा ||

दिवस डुबला की अख्खा गाव काळोखात गडप होतो |
एरवी गाव, पोमाडेंगीचे आश्वासन देणाऱ्या
विकासाच्या कागदावरच्या सारखाचं
धुळखात पडल्यासारखाच दिसतो ||

अश्या ह्या आमच्या गावी
झळीचा पावसाळा सुरू व्हायचा |
कामधंदा- दाण्यादाण्याचा दुष्काळ पडून
एकमेकांचा संपर्कच तुटायचा ||

घरी खाणारी तोंडे सहा |
मला पहा अन् फुले वाहा ||

जवा तीन चार दिवसांचा उपवास पडायचा |
मिलो जवूचा पहिलेच ठणठणाट राहायचा ||

माय पोटाले पालव बांधून निंदाले जाहाची |
येतांनी अंबाडी, तरोट्याची भाजी बुरून आणायची ||

त्याले सुद्धा मीठ नाही भेटे |
अलवणीच भाजीच तवा पंचपंक्वान वाटे ||

कधी भेटलचं नाही काही तं
माय मोहफुलाचे मुठ्ठे बांधायची |
कधी रानात जाऊन सुरम कांदे,
नाहीत वेरवाचे वायदे आणायची ||

उद्या जवारी आणतो म्हणून विश्वासानं सांगे |
नुसत्या जवारीच्या नावाने भुकेल्या पोटीचे स्वप्न तवा महाल माड्यात रांगे ||

माय झोपेची डुलकी येई पावतो
कबिराचे दोहे, तुकोबांचे बारा अभंग म्हणे |
त्यात सतावे तिले उद्याच्या संजेचे विवेचणे ||

जवा चवथी पाचवी संज पडायची |
माय भिरभिर गावभर हिंडायची ||

निंदनाच्या मजुरीत पैसे खंडवितो म्हणून
कवा शेर पायली आणायची उसणं |
काही जमलंच नाही काही त
गुलाबचंद मारवाड्याकडे गहाण ठेवायची
अंगावरची दागीणं ||

म्हणे धनाले कोण विचारते भाऊ ?
पोरं जीवंत राहिले तर तेच माझे अलंकार |
अवंदा दुष्काळाने जरा जास्तच केला हाहाकार ||

कंबर वाकली तरी माय खचली नाय |
दुष्काळावर मात करणे म्हणे जीवन जगण्याचा उपाय ||

नाहीतं आपल्यासारख्या शहराईतल्याइले
एकाच दिवसात वाटल
अशा जगण्यापेक्षा मेलेलं बरं हाय |
अशाही परिस्थितीत मायनं सर्रास जगविणे
हा चमत्कारच नाही काय ? ||

अडाणीच होती माय मात्र
सकाळी कामाले जाताना
काकुळतीने म्हणायची-
बापू काहीही होऊ दे पण साळतं जाजो
सिकसण्यापेक्षा कोणतीच इस्टेट मोठी नाय |
शिक्षण आपलाच नाही त जगाचा तरणोपाय ||

अशी ही व्यथा अन् कथा माझ्या निळाई मायची
दु:खाचा डोंगर उरावर पेलून मायेची पाखर घालायची |
सांगा जगात, निर्व्याज प्रेमाच्या सावलीला
माय पेक्षा आणखी कोणती उपमा द्यायची ? ||

  • अशोककुमार उमरे 8698842402
    निळाई, सिद्धार्थ विहार, गडचांदूर
    त कोरपना जि चंद्रपूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!