ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय राजकारणातील अभ्यासू, परखड आणि निर्भीड लोकनेता ! – आयु. श्रीमंत कोकाटे
ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे भारतीय राजकारणातील एक निर्भीड, अभ्यासू आणि परखड लोकनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतामध्ये घडणाऱ्या विविध घटनाबाबत तत्काळ आणि योग्य भूमिका घेण्यात ते निष्णांत आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व असते, कारण ते अभ्यासपूर्ण आणि निर्भीडपणे मांडणी करत असतात. कोपर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये सामाजिक ध्रुवीकरण झाले. मराठा समाजाचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले. त्यावेळेस उपेक्षित, वंचित, गरीब, मजूर मराठा समाजाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी मांडल्या, त्यामुळे मराठा समाजातील उपेक्षित वर्गाला ते आपला आवाज वाटले. त्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सामाजिक ध्रुवीकरण थांबले. जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या चौकटीच्या बाहेर जाऊन संविधानिक भूमिका घेण्यामध्ये ते अग्रेसर असतात.
महाराष्ट्रातील तरुण पिढीला धर्म संस्कृतीच्या नावाखाली चुकीचा इतिहास सांगून भिडे -एकबोटे यांनी बरबाद केले आहे. या दंगलखोरांनी अनेक ठिकाणी समाज विघातक कार्य केलेले आहे. कोरेगाव भीमा दंगलीमागे यांचा हात आहे, अशी योग्य, सडेतोड आणि निर्भीड भूमिका महाराष्ट्रामध्ये प्रथमता ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली, या दोघांचे नाव घ्यायला पुरोगामी म्हणून घेणारे अनेक राज्यकर्ते आजही घाबरतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच भिडेचे नावं आरोप पत्रातून कसे काय वगळले जातेय? ऍड. प्रकाश आंबेडकर मात्र समाजविघातक व्यक्तींचा मुलाहिजा बाळगत नाहीत. भिडेला अटक करावी, यासाठी आझाद मैदानावरती त्यांनी लाखोंचा मोर्चा काढला होता. त्यावेळेस फडणवीस सरकार होते.
विस्थापित मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरात खा. छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत पावसात आंदोलन केले. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, अशी उघड भूमिका त्यांनी घेतली होती.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी म्हटले होते की महाराष्ट्राच्या राजकारणाला शिळेपणा आलेला आहे. संसदीय लोकशाहीतून आलेले नवसरंजामदार यांनी राजसत्ता गिळंकृत केलेली आहे. त्यासाठी सर्व समाजघटकांतील वंचित पिढीने राजकारणात येणे आवश्यक आहे, राजकीय सामाजिक घडामोडीवर अचूक भाष्य करण्यात ते निष्णांत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे.
वाढदिवसानिमित्त बाळासाहेब आंबेडकर यांना खूप खूप शुभेच्छा!
- श्रीमंत कोकाटे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत