दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिन

जन्म – ३० एप्रिल १९०९ (यावली,अमरावती)
स्मृती – १० नोव्हेंबर १९६८ (अमरावती)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज जन्म अमरावती मधील यावली येथे झाला. माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचे नाव. अंगभूत गुणांमुळे आणि विवेकनिष्ठ जीवनदृष्टीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने ओळखले जाणारे गेल्या शतकातले ते महान प्रबोधनकार होते. त्यांच्या ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणा पासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि.अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले. ते गांधी आणि विनोबांचे शिष्य होते. त्यांनी खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलं.
त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. स्त्रीचं स्थान हे कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्थे मध्ये महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. स्त्रीला अज्ञानात आणि बंधनात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिलं. ईश्वरभक्ती करतानाच दुबळ्यांचीही सेवा करा असं ते नेहमी सांगत. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रामविकासावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
संत तुकडोजी महाराज यांची कविता
या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या !
भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या !
पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या
दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या !
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या !
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या !
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या !
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!