दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
लोककल्याणकारी क्रांतिकारक संत तुकाराम महाराज
(संत तुकाराम महाराज बीजनिमित्त लेख)
डॉ. श्रीमंत कोकाटे
संत तुकाराम महाराज यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1608 रोजी पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या उजव्या काठावर आहे. संत तुकाराम महाराज यांचे वाडवडील हे मनोभावे वारकरी संप्रदाय आचरणारे होते. त्यांच्या मागील आठ पिढ्यापासून ते विठ्ठल भक्त होते. संत तुकाराम महाराज हे मोरे घराण्यातील आहेत. आंबिले हे त्यांचे उपनाम आहे. संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई होते.
संत तुकाराम महाराजांना दोन भाऊ होते. मोठा सावजी आणि धाकटा कान्होबा. तुकोबा हे आपल्या भावंडांवर जीवापाड प्रेम करत असत. मोठा भाऊ सावजी हा लहानपणापासूनच अत्यंत चिंतनशील आणि संवेदनशील मनाचा होता. ऐन तारुण्यामध्ये त्याने सर्वसंगपरित्याग केला. त्याला विरक्ती प्राप्त झाली. त्याने गृहत्याग करून परमार्थाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे कुमार वयातच संत तुकाराम महाराजांवर संसाराची जबाबदारी पडली.
संत तुकाराम महाराजांचे घराणे हे सधन शेतकऱ्याचे घराणे होते. त्यांचे वाडवडील हे सावकार आणि महाजन होते. महाजन म्हणजे बाजारातील वजन- मापे यावरती नियंत्रण ठेवणारे व बाजारपेठेतील कर वसूल करणारा अधिकारी होय. संत तुकाराम महाराजांनी पारंपारिक सावकारकी बंद केली. त्यांचे किराणा मालाचे दुकान होते, तसेच ते नामवंत शेतकरी होते.
संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाई, तर दुसऱ्या पत्नीचे नाव अवलाई तथा जिजाई होते. संत तुकाराम महाराजांच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. त्याप्रसंगी त्यांनी गोरगरिबांना धनधान्याचे मोफत वाटप केले. ते अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील मनाचे होते.
जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेची जाणावा ।
ही त्यांची साधू आणि देव याबाबतची धारणा होती. गोरगरिबांना मदत करणे, हाच खरा धर्म आहे. हे त्यांचे धर्माचे तत्वज्ञान होते.
संत तुकाराम महाराजांना महादेव, नारायण आणि विठोबा ही तीन मुले आणि गंगा, भागीरथी, आणि काशी या तीन मुली होत्या. त्यांचा संसार अत्यंत सुखाचा होता. परंतु सर्वांचा संसार सुखाचा असावा, यासाठी त्यांची धडपड होती. त्यांनी पत्नीला आणि मुलांना अत्यंत प्रेमाने वागविले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा त्यांच्या पत्नीला आणि मुलांना प्रचंड अभिमान वाटत असे. त्यांनी उत्पन्नाचा खूप मोठा भाग गोरगरिबांना मदत म्हणून वाटप केला. याचा त्यांना प्रचंड आनंद वाटत असे. त्यांच्या या लोककल्याणकारी कार्यात त्यांचा पत्नीचा मोठा वाटा आहे, त्यांना आपल्या पतीचा प्रचंड अभिमान वाटत असे.
कष्टकरी, कामकरी, शेतकरी, महिला यांच्या अधोगतीचे कारण अज्ञानामध्ये आहे त्यामुळे आपण ज्ञानी झाले पाहिजे, हा संत तुकाराम महाराजांचा आग्रह होता. ज्ञान हीच महत्त्वाची संपत्ती आहे, असे त्यांचे मत होते. म्हणून ते म्हणतात.
आम्हा घरी धन।
शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे।यत्ने करू।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्दे वाटू धन जनलोका।
संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन केले. त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. त्यांनी अभंग लेखन केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध बंड केले. त्यावेळेस सनातन्यांनी संत तुकाराम महाराजांची बदनामी करायला सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांकडे प्रतिभा नाही. त्यांना संस्कृत येत नाही, अशी अवहेलना सुरू केली. तेव्हा संत तुकाराम महाराज सनातन्याना उद्देशून म्हणाले.
वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा।
येरानी वाहवा भार माथी।।
तुका तरी सहज बोले वाणी।
त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी।।
संत तुकाराम महाराजांच्या या बोलण्यामागे दर्प नव्हता. अहंकार नव्हता. घमेंड नव्हती. उर्मटपणा नव्हता. होता तो नम्रतापूर्वक अभिमान! ज्ञान आणि गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. हे संत तुकाराम महाराजांनी ठासून सांगितले.
संत तुकाराम महाराजांनी जनतेला धनसंपत्तीचे, श्रमाचे आणि काटकसरीचे महत्त्व पटवून दिले. आपण कष्ट केले पाहिजे, चांगल्या मार्गाने पैसा कमावला पाहिजे, त्याचा विनियोग विचारपूर्वक केला पाहिजे, असे सांगणारे संत तुकाराम महाराज हे महान अर्थतज्ञ होते. ते म्हणतात.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी।।
सोन्याचांदीवर प्रेम करण्यापेक्षा आपल्याला जगवणाऱ्या मातीवर-भूमीवर प्रेम केले पाहिजे, असा आग्रह संत तुकाराम महाराज धरतात. आपल्याकडे कितीही सोने-चांदी असले तरी पोटाची भूक भागविण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि ते अन्न आपल्याला या मातीतून-जमिनीतून मिळते. माती ही सोन्याहून मौल्यवान आहे. त्यामुळे सोन्या चांदीचा हव्यास धरण्यापेक्षा मातीवर प्रेम करा, हा संत तुकाराम महाराजांचा विचार होता. ते म्हणतात
सोने-चांदी मृत्तिके समान।
मृत्तिका सोन्याहून मौल्यवान।।
संत तुकाराम महाराजांनी दारू-तंबाखू प्राशन करणाऱ्यावर कडाडून हल्ला केला. व्यसनाधीनता हा मानवी विकासातील मोठा अडथळा आहे. व्यसनाधीनतेमुळे आपले शारीरिक, आर्थिक, सामाजिक नुकसान होते, हे संत तुकाराम महाराज अत्यंत कळकळीने सांगत असत. व्यसनाधीनतेमुळे घर बुडते, असे संत तुकाराम महाराजांचे मत होते. ते म्हणतात.
ओढुनि तंबाखू काढीला जे धूर।
बुडेल ते घर तेणे पापे।
तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केले तर घर बुडेल, असे संत तुकाराम महाराजांचे लोककल्याणकारी विचार होते.
गोरगरिबांना उपेक्षितांना मदत करणे हेच खरे पुण्य आहे आणि गोरगरीब उपेक्षितांना त्रास देणे हे खरे पाप आहे, अशी त्यांची पाप-पुण्याची संकल्पना होती. याबाबत तुकाराम महाराज म्हणतात
परोपकार ते पुण्य।
परपीडा ते पाप।।
संत तुकाराम महाराज श्रमाला प्रतिष्ठा देतात. ऐतखाऊ, परजीवी लोक त्यांना आवडत नसत. दुसऱ्याच्या श्रमावर जगणार्या लोकांचा त्यांनी नेहमी धिक्कार केला. भाकड कथा सांगून श्रमकऱयांच्या जीवावर जगणाऱ्या सनातनी बुवाबाजीला संत तुकाराम महाराज म्हणतात
भिक्षापात्र अवलंबणे।
जळो जिने लाजिरवाणे।।
सनातन्यांनो, भिक्षा मागून जगता लाज कशी वाटत नाही? असा सवाल ते विचारतात.
संत तुकाराम महाराजांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त, शकुन-अपशकुन या अनिष्ट रूढी -परंपराविरुद्ध परखड शब्दात आवाज उठवला. त्यांनी बुद्धीप्रामाण्यवादाचा आग्रह धरला. ते म्हणतात.
मेळवुनि नरनारी।
शकुन सांगति नानापरी।।
तुका म्हणे ऐसे मैंद।
तया पाशी नाही गोविंद।।
सांगो जाणती शकुन।
भूत भविष्य वर्तमान।।
तयांचा आम्हांसी कंटाळा।
त्याचे तोंड न पाहावे।।
भविष्य, पंचांग, मुहूर्त, पाहणाराचे थोबाड देखील पाहू नका, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात जिवंतपणी आई वडिलांना सांभाळा. मृत्यूनंतरचे कोणतेही जीवन नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे, तेरवी करणे, केस कापणे, नैवेद्य दाखविणे आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहणे, हा मूर्खपणा आहे, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे. आपले मृत वाडवडील काय कावळे होते काय?
भुके नाही अन्न।
मेल्यावरी पिंडदान।।
हे तो चाळवाचाळवी।
केले आपणची जेवी।।
तीर्थयात्रा करून पुण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आई-वडिलांना सांभाळणे हेच खरे पुण्य आहे. काशी तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य आई-वडिलांची सेवा केल्यानंतर मिळते, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे.
मायबापे अवघी काशी।
तेणे न भजावे तीर्थाशी।।
तुका म्हणे मायबापे।
अवघी देवाचीच रुपे।।
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दगडधोंड्यांची पूजा करण्यापेक्षा कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण, मुलं, पत्नी यांचा आदर-सन्मान करा. गोरगरिबांना मदत करा. शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा, हे संत तुकाराम महाराजांचे लोककल्याणकारी विचार आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फलप्राप्ती होणार नाही, असे संत तुकाराम महाराज म्हणतात.
जाऊनिया तीर्था काय तुवा केले।
चर्म प्रक्षाळीले वरी वरी।।
तीर्थी धोंडा पाणी।
देव रोकडा सज्जनी।।
नाही निर्मळ जीवन।
काय करील साबण।।
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंग स्वच्छ कराल, पण अंतकरण स्वच्छ करणारे साबण आहे का? पाणी स्वच्छ नसेल तर महागडे साबण देखील उपयुक्त ठरणार नाही. अंतकरण स्वच्छ करणारे साबण अजून आलेले नाही. सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात, असे संत तुकाराम महाराज यांचे विचार आहेत.
कुंभमेळा हा भटांचा पर्वणी मेळा असतो, असे संत तुकाराम महाराजांचे परखड मत होते. कुंभमेळ्याला जाऊन आंघोळ करणं, केस कापणे, यात कसला आलाय धर्म? हा तर मूर्खांचा बाजार आहे. असे क्रांतिकारक आणि परखड मत तुकाराम महाराजांनी एका अभंगात द्वारे व्यक्त केले आहे
आली सिंहस्थ पर्वणी।
न्हाव्या भटा झाली धनी।।
अंतरी पापाची कोडी।
वरी वरी बोडी दाढी।।
बोडीले ते निघाले ।
नाही पालटले अवगुण।।
पाप गेल्याची काय खूण।
तुका म्हणे अवघा सीन।।
अशा क्रांतिकारक संत तुकाराम महाराजांचा शेवट कसा झाला, याबद्दल मतभिन्नता आहे. ती मतभिन्नता आपण पाहू.
संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा, म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले. ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले. हे वय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे.
संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे समजून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा लागेल. ते अत्यंत बुद्धिमान,प्रेमळ आणि श्रीमंत होते. त्यांनी सुमारे 5 हजार अभंग लिहिले. त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता.ते म्हणतात
भेदाभेद भ्रम अमंगल।
सर्वांची एकची वीण।
तेथे कैसे भिन्नाभिन्न।
भेदभाव बाळगणे अमंगल आहे, तर समता बाळगणे मंगलमय आहे. सर्व माणसं समान आहेत. असे सांगून संत तुकाराम महाराजानी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला. वर्णव्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात.
वर्णाभिमाणे।
कोण झाले पावन।।
ऐसें द्या सांगून।
मजलागी।।
संत तुकाराम महाराजानी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, ते तुकाराम महाराजावर प्रचंड चिडले. कारण वर्णव्यवस्था हे ऐतखाऊ लोकांचे दुसऱ्याच्या श्रमावर जगण्याचे भांडवल होते.
संत तुकाराम महाराजानी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला.
नवसे कन्यापुत्र होती।
मग का करणे लागे पती।
नवस सायास करू नका,प्रयत्नानेच यश मिळेल.
असाध्य ते साध्य।
करिता सायास।
कारण अभ्यास।
तुका म्हणे।
प्रयत्नवादी व्हा, दैवावर विश्वास ठेवू नका, प्रयत्न केल्याने अशक्य काम शक्य होते, हा संदेश संत तुकाराम महाराजानी दिला.
सनातन्यांचा व आपला धर्म एक नाही, त्यामुळे त्यांचा संबंध तोडा, त्यांच्याकडून कोणतेही विधी करू नका,असा मोलाचा उपदेश संत तुकाराम महाराजानी केला.
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड।
काय त्यासी रांड प्रसवली।।
तुका म्हणे ऐसें लंड।
त्याचे हाणोनि फोडा तोंड।।
सनातन्यांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा, या हेतूने संत तुकारामांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला.
ऐसें कैसे झाले भोंदू।
कर्म करुनि म्हणती साधू।।
अंगा लावुनिया राख।
डोळे झाकुनि करिती पाप।।
दावी वैराग्याची कळा।
भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगो किती।
जळो तयांची संगती।।
भटाची संगत सोडा हे संत तुकाराम महाराजानी निक्षून सांगितले. त्यांनी यज्ञ, होम, हवन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, दशक्रिया, पुरोहितगिरी, पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली, त्यामुळे सनातनी वर्ग संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभा राहिला. त्यांच्या अभंगांची गाथा सनातन्यांनी इंद्रायणीत बुडवली. ते पदोपदी संत तुकाराम महाराजाना त्रास देऊ लागले आणि यातच संत तुकाराम महाराज नाहीसे झाले.
ब्राह्मणी पक्षाच्या मतानुसार ते वैकुंठाला गेले, तर अभ्यासक सुदाम सावरकर आणि संस्कृतपंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या मतानुसार त्यांचा घातपात झालेला आहे. दोन्ही पक्षाचे मत पाहण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ, स्वर्ग याबाबत काय मत होते,ते आपण पाहू.
संत तुकाराम महाराज हे जीवनाला कंटाळलेले नव्हते. ते जगू आणि लढू इच्छिणारे हिम्मतवान आणि क्रान्तीकारक संत होते. ते म्हणतात
बुडता हे जन न देखवे डोळा।
येतो कळवळा म्हणोनिया।
जनतेला ब्राह्मणी गुलामगिरीतून बाहेर काढणे हे त्यांचे जीवितकार्य होते. त्यामुळे ते जबाबदारी सोडून इहलोक सोडून जाणारे नव्हते. ते उपास-तापास जप-जाप्य करणारे नव्हते.
नको सेवू वन।
नको सांडू अन्न।
अन्नत्याग करणे आणि वनांत जाणे, याला संत तुकाराम महाराजानी विरोध केला.
संत तुकाराम महाराजानी स्वतः स्वर्ग, वैकुंठ, मोक्ष नाकारलेला आहे. ते म्हणतात
येथे मिळतो दहिभात।
वैकुंठी त्याची नाही मात।
पृथ्वीवर काबाडकष्ट केले तर दहीभात-भाजीभाकरी तर मिळेल, पण वैकुंठात जे कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी सांगितले जातात ते धादांत खोटं आहे.ते म्हणतात
भय नाही जन्म घेता।
मोक्षपदा हाणो लाथा।
तुका म्हणे आता।
मज न लगे सायुज्यता।
संत तुकाराम महाराज म्हणतात "या जन्माची मला भीती नाही, म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते, मोक्षाला लाथा घाला" असे म्हणून ते मोक्ष(वैकुंठ) नाकारतात. जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?. तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे सायुज्यपद आहे, असे वैदिक परंपरा सांगते, त्या सायुज्यपदाला तुकाराम महाराज नाकारतात. म्हणजे जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?. तुकाराम महाराज म्हणजे
बोले तैसा चाले।
याची वंदावी पाऊले।
या विचारांचे जसे बोलायचे तसे वागायचे, असे होते. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत, हे त्यांच्याच अभंगावरून/विचारावरून स्पष्ट होते. मग तुकाराम महाराजांचा वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला?
संत तुकाराम महाराजांचा लढा सनातनी व्यवस्थेविरुद्ध होता. त्यांनी तुकाराम महाराजाना खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते, तर, सनातनी त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करत होते. त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे, त्यांची बदनामी करणे, या बाबी सनातन्यांनी संत तुकाराम महाराजांची घातपात करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले, अशी अफवा पसरवली. अफवा पसरवण्यात सनातन्यांचा हात जगात कोणीही धरणार नाहीत.
सर्वात महत्वाचे -संत तुकाराम महाराजांनाच विमान न्यायला आले, तर मग आद्य शंकराचार्य, संत एकनाथ, रामदास यांना न्यायला विमान का आले नाही?. 17 व्या शतकात वैकुंठाला नेणारे सोडाच, पण चंद्रावर घेऊन जाणारे तर विमान भारतात होते का? वैकुंठाला खोटं ठरवणारे संत तुकाराम महाराजच वैकुंठाला गेले, असा प्रचार करणे, ही बाबच त्यांचा शेवट कसा झाला, हे स्पष्ट करते.
-डॉ.श्रीमंत कोकाटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत