जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका!!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी म्हणाले होते की, “जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका”! समाजाने सतत जागृत राहावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे नियतकालिक सुरू केले. त्यांचा बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत पर्यंतचा प्रवास सर्वांना सर्वश्रुत आहे. समाज जागृतीचा, समाज शिक्षणाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी अविरतपणे चालू ठेवला आणि त्यामुळे अनेकजण जागृत झाले. जागृत झाल्यामुळे संवेदनशील झाले. संवेदनशील झाल्यामुळे चांगल्या वाईटचा फरक कळू लागला आणि फरक कळाल्यामुळे आपल्या प्रगतीचे स्वप्न पाहू लागला. प्रगतीचे स्वप्न पाहत असताना, प्रगतीला लागणारे, आवश्यक असणारे शिक्षण घेऊ लागला. म्हणजेच तो वाघिणीचं दूध पिऊ लागला!! आणि मग सगळ्या जगावरती तो गुरगुरायला लागला.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अमोघ कष्टाने बहिष्कृत भारतला प्रबुद्ध भारत बनवले. शुद्ध बुद्ध धम्माची ओळख पुन्हा नव्याने या भारताला करून देण्याचा महत्तम कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपण प्रबुद्ध झालो. समता, स्वतंत्रता आणि बंधुतेचा उद्घोष करणार बाबासाहेबांनी आपल्याला मौल्यवान संविधान दिलं आणि संविधान देऊन आपणाला आणखी प्रबुद्ध केलं. आपल्या हक्क अधिकाराची जाणीव करून दिली आणि ते हक्क अधिकार कोणी हिरावून घेऊ नयेत म्हणून बाबासाहेबांनी जागृत राहायला सांगितलं. तसेच इतरांनाही जागृत करायला सांगितलं. तीच नाळ, तीच मशाल, तीच धुरा आणि तोच विचार आपण “जागृत भारताच्या” निर्मितीने पुढे चालवण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहोत
कठीण परिस्थिती असताना. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज जाणीवपूर्वक दाबला जात असताना. लढायच्या वेळेला बिळात लपून बसणारी अवलाद आंबेडकरी असू शकत नाही. लोकशाही, समाजवादी संरचना, धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी आम्ही “जागृत भारत” च्या निमित्ताने मैदानात उतरलो आहोत! मायबाप समाजाने आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा करतो!
आपला डी एस सावंत
जय भीम!! जय भारत!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत