भगवान बुद्धांची शिकवण भाग ६२
अधम्म म्हणजे काय?
दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नाही जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्यमात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात की, कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य (परिणाम) हे कारणापासून इतके दूर असते की, तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की, ही घटना घडली कशी?अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की, ही घटना काही तरी दैवी कारणाने (supernatural cause) म्हणजे चमत्काराने घडली असावी.भगवान बुद्धांचे म्हणणे असे की, प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा, नियमांचा परिणाम आहे. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की, एखाद्या घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते कारण त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही.दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे तीन हेतू होते.त्यांचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. (To lead man to the path of rationalism)त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, त्यांचे उगमस्थान नष्ट करणे.यालाच बुद्ध धम्माचा कम्मसिद्धांत अथवा हेतूवाद म्हणतात. (Law of Kamma or Causation)हा हेतूवाद बुद्ध धम्माचा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. तो बुद्धीवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही.याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली नाही.*ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे*हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे.जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तीमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ म्हणजे जो सर्वकाही जाणतो, असे करतात.ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की, ईश्वर न्यायी, आणि दयाळू आहे.बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. भगवान बुद्ध प्रवचनात म्हणतात, “कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करु शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. (The world has evolved and is not created.) ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रीत धर्म आहेत. (a religion based on God is based on speculation.) म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्यांचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. (creating superstition)” बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नांच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक कारणे आहेत. त्यांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्यांनी वासेट्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राम्हणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेट्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रम्ह याच्या उत्पतीसंबंधी चर्चा करीत असताना बुद्ध भारद्वाज आणि वासेट्ठ यांना उद्देशून म्हणाले: “तुझे म्हणणे असे आहे की, मी ब्रम्ह आहे, महाब्रम्ह आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे; आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की, जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रम्ह हा पिता आहे. तर मग त्या ब्रम्हाने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो?”ह्या प्रश्नाला वासेट्ठाजवळ उत्तर नव्हते.बुद्धांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तीमत्तेसंबंधी होता. “जर ईश्वर सर्वशक्तीमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही, असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे, तर ब्रम्ह्याने माणसाला निर्माणच का केले?” यालाही वासेट्ठाजवळ उत्तर नव्हते.बुद्धांचा चवथा विचार असा होता की, “जर ईश्वर शिवस्वरुप (कल्याणकारी) आहे, तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे?”बुद्धांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. “जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो?” असा प्रश्न बुद्धांनी केला. ते पुढे म्हणाले, “ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणे दृश्य दृष्टीस पडेल. ब्रम्ह आपली रचना का सुधारीत नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल, तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वाना का सुख देत नाही? अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलावत असते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रम्हा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणिमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणिमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा.”बुद्धांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की, ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. बुद्धांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही. ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे.बुद्ध ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाविरूद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. बुद्ध धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. या विरूद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते. आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील महत्त्वाच्या तत्त्वाच्या म्हणजेच सम्मादिठ्ठीच्या (सम्यक दृष्टी) शत्रू आहेत. (भ्रामक समजुती सम्यक दृष्टीसाठी हानिकारक आहेत.)बुद्धांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरूरीतून पुरोहितपद उत्पन्न होते. आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की, तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिठ्ठीचा (सम्यक दृष्टी) विकास अशक्य होतो.ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधम्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो.
क्रमशः आर.के.जुमळेदि.१३.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग चवथा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत