भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण भाग ६०

धम्म म्हणजे काय?

तृष्णा-त्याग म्हणजे धम्म

धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, “सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे. कारण तसा अर्थ करणे बुद्धांच्या इतर सर्व शिकवणुकींविरूद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु नये, असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करतात.
जेव्हा बुद्ध म्हणतात की, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये.
भिक्खू रठ्ठपाल म्हणतो:
“माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की, ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही.”

महानिदान सूक्तांत बुद्धांनी आनंदाला लोभ-संयमनाची महती सांगितली आहे. (necessity of controlling greed) तेथे ते म्हणतात:
“आनंद, लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते, आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेत पर्यवसान होते, आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात:
“पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यांत आहे.” वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही.
म्हणूनच भगवान बुद्धांनी, लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला.

सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म

अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत.
१. अनेक तत्त्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. अनेक तत्त्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेत. सर्व वस्तु ह्या हेतु आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की, वस्तुचे अस्तित्व उरत नाही.
२. व्यक्तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे. सजीव प्राण्यांचे शरीर पृथ्वी, आप, तेज, आणि वायू या चार महाभुतांचा परिणाम आणि जर या चार महाभुतांचे पृथक्करण झाले तर हा प्राणी, प्राणी म्हणून उरत नाही. जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता, तोच प्राणी वर्तमानकाळात असू शकत नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही.
३. प्रतीत्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्त्व अनित्य आहे.
प्रतित्य म्हणजे निर्माण होऊन नष्ट होणे, तर समुत्पन्न किंवा समुत्पाद म्हणजे निर्माण होऊन नष्ट होणारी क्रिया. म्हणजेच पुन्हा पुन्हा होणे. हे तत्त्व अनित्य आहे म्हणजे बदलते आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे- सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे.
अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की, ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे, त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता, तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती.
शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती.
परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदूसमान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही.
भगवान बुद्धाचा उपदेश असा की, सर्व वस्तू अनित्य आहेत.
या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की, कोणत्याही वस्तूसंबंधी, व्यक्तीसंबंधी आसक्ती राखू नका.
लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादीसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की, सर्व वस्तू अनित्य आहेत.

संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.११.२.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!