दैनिक वृत्तरत्न सम्राटकार बबन कांबळे अमर रहे!!!
डी एस सावंत.
दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक आदरणीय बबनरावजी कांबळे यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष आज होत आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एक प्रचंड पोकळी, एक प्रचंड उणीव भासत आहे. सगळा प्रवासच दिशाहीन झालाय की, काय? असे वाटावे. कारण तुम्ही होता तेव्हा मार्गदर्शन होते. तुम्ही होता तेव्हा एक विश्वास होता. तुम्ही होता तेव्हा एक भरोसा होता. तुम्ही होता तेव्हा आधार होता. तुम्ही होता तेव्हा सगळं जग पाठीशी आहे. असा भास होत होता. पण आज सगळं विराण दिसत आहे. आज सगळं भकास दिसत आहे. तुम्ही होता तेव्हा खरंच बहार होता. तो बहार नुसता निसर्गाचा नव्हता तर जित्या जगत्या माणसांचा गोतावळा होता, तो आज विस्कटल्यासारखा दिसत आहे. कारण आजच्या दिवशीच आपल्या सम्राटच्या लाडक्या, ध्येयवादी, प्रज्ञावंत आणि बहुश्रुत संपादक बबन कांबळेसाहेब साहेबांनी आपला कायमचा निरोप घेतला. साहेब तुम्ही फार लवकर गेले, तुमच्या संघर्षशील वृत्तीने तुम्ही खूप काही शिकला होता. सर्व समाजाचे अंतरंग जाणून होता. समाज उत्कर्षाचे खूप काही इंगीते तुमच्याकडे होती, ती न देताच निघून गेलात की काय? असे आम्हाला वाटत आहे. ही उणीव आता कोण भरून काढेल? कशी भरून काढेल? हा यक्ष प्रश्नच नाही काय? आम्ही प्रत्येक वेळेला आमच्या परम मित्राला, मार्गदर्शकाला म्हणजेच संपादक बबन कांबळे साहेबांना सम्राट बरोबरच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या होत्या परंतु, काळाने आमच्या सदिच्छा वरती कुरघोडी केली आज मात्र ते हयात नसल्याने अत्यंत दुखद अंतकरणाने म्हणावेसे वाटते की तुमचे हे भरीव सामाजिक कार्य समाज कदापिही विसरणार नाही आणि हीच तुम्हाला आदरांजली ठरावी!
सुमारे दोन दशकांचा हा प्रवास म्हणावा तितका सोपा अजिबात नव्हता आणि नाही. संत तुकोबारायाच्या उक्तीप्रमाणे “रात दिन आम्हा युद्धाचा प्रसंग” ही म्हण सम्राट च्या बाबतीत अत्यंत समर्पक ठरावी. दैनिक वृत्तरत्न सम्राट केवळ आंबेडकरी समाजाचे नव्हे तर संपूर्ण आंबेडकरी, बहुजन, शोषित, वंचित, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाजाच्या समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यांना सोडवणूक करण्यासाठी अखंडपणे, निडरतेणे, निष्पक्षपणे आणि अविरत प्रयत्न केले, आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, करत आहे आणि करत राहणार! आज सम्राट प्रबुद्ध भारताच्या निर्मितीप्रक्रियेतील मूकनायकाचा खरा वारसदार ठेरलेला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये! अशा आपल्या लाडक्या दैनिक वृत्तरत्न सम्राटला उदंड आयुष्य लाभो आणि सम्राटकडून समाजाची अविरतपणे सेवा घडो ही शुभकामना करतो.
दैनिक वृत्तरत्न सम्राटचा जन्म झाल्यापासून केवळ आंबेडकरी समाजातच नव्हे तर बहुजन समाजात एक प्रकारचे चैतन्य पाहायला मिळते. दैनिक वृत्तरत्न सम्राट मुळे समाजात ऊर्जा निर्माण झालेली आहे. समाजात चेतना निर्माण झालेली आहे, कारण समाजातील प्रश्नांना मार्गी लावण्याचे सम्राट महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. समाजाला सम्राटरुपी अत्यंत मौलिक आणि आपला कैवार घेणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ मिळाल्यामुळेच लोकांमध्ये चैतन्य निर्माण होणे क्रमप्राप्त आहे.समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडून गेली वीस वर्ष सम्राटने मोठे योगदान दिले आहे हे कोणीच नाकारू शकत नाही! वंचित समाजातील अनेक प्रश्नांना ऐरणीवर आणून त्याची सोडवणूक करण्यात सम्राटचे मोलाचे योगदान काळालाही विसरता येणार नाही.
सम्राटच्या निर्मितीमुळे अनेक लेखक घडले अनेक विचारवंतांना, अभ्यासकांना, संशोधकांना लिहिण्याचा हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला, त्यामुळे त्यांना आपले विचार जसेच्या तसे समाजापुढे मांडत आले. अनेक बातम्या,अनेक घडामोडींना तसेच अनेकांना विनासायास प्रसिद्धी दिली गेली.अन्यथा आम्ही प्रसिद्धीपासून कोसो दूर होतो हे आपणाला विसरता कसे येईल! सम्राट मुळे कित्येकजण घडले गेले, अनेकांचे प्रश्न सोडवण्यास मदत झाली.
दैनिक वृत्तरत्न सम्राट आंबेडकरी चळवळीसाठी तर अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त माध्यम ठरले आहे, हे सांगणे न लागे! चळवळीतील बातम्या, चळवळीचे मोर्चे, निदर्शने इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टीचा इतंभूत आढावा सम्राटने कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता, केवळ आंबेडकरी चळवळीला पोषक वातावरण निर्माण व्हावे. समाजाला न्याय मिळावा आणि आंबेडकरी चळवळ समृद्ध व्हावी म्हणून अत्यंत प्रामाणिक पणे केला आहे,त्यामुळे दैनिक वृत्तरत्न सम्राट समाजाचे मुखपत्र पत्रक केव्हा झाले हे कळलेच नाही, त्या पाठीमागे संपादक बबन कांबळे साहेबांची चळवळीप्रती असणारी आस्था आणि तळमळ होती याबद्दल दुमत नसावे. समाजातील शेवटच्या माणसाचे भले झाले पाहिजे ही प्रामाणिक भूमिका होती आणि म्हणूनच ते एवढ्या प्रगल्भ समाजाचे अविरतपणे प्रबोधन करू शकले.
दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या झंझावातामुळे प्रस्थापित वर्तमानपत्रांनासुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे तसेच महापरिनिर्वाण याची दखल घ्यावी लागली तसेच परिवर्तनाच्या चळवळीतील सर्व महापुरुषांची दखल सर्वच प्रस्थापित वर्तमानपत्रे आज घेताना दिसत आहेत. अन्यथा सम्राटपूर्वी पुरेशी दखल घेतली जात नसे हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
जाहिराती विना चालणारे दैनिक वृत्तरत्न सम्राट हे वर्तमानपत्र भारतातीलच नव्हे, तर जगामधले केवळ एक मात्र वर्तमान पत्र आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. जे वर्तमान पत्र केवळ आणि केवळ सहा पाने बातम्या, घटना, माहिती,आंबेडकरी चळवळ, पुरोगामी चळवळ,परिवर्तनवादी चळवळ आणि इतर जागतिक घटनांची इतंभूत माहिती देते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सर सम्राट ने कमालच केली डॉ बाबासाहेबांच्या सन्मानार्थ 125 पानाचे वर्तमानपत्र काढणारे जगातले पहिले आणि एकमेव वर्तमानपत्र दैनिक सम्राट ठरले आहे. तसेच 125 पानाचे वर्तमानपत्र काढणारे बबन कांबळे हे एकमेव संपादक ठरले आहेत. आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या अस्मितेची जाणीव लोकांना कशी करून द्यावी हे यांच्याकडून शिकावे. सम्राटमुळे लोकांना वाचण्याची गोडी अधिकच लागली. लोक आंबेडकरी साहित्याचा विविध संदर्भासाठी प्रचंड अभ्यास करू लागले ही किमया सम्राट मुळेच घडली. आंबेडकरी समाजातील सामान्य वर्ग सुद्धा खऱ्या अर्थाने प्रगल्भतेकडे वाटचाल करू लागला. लोकांच्या जागृतीमुळे आणि प्रगल्भतेमुळे खोट्या बातम्या, खोट्या माहितीचा खोट्या इतिहासाचा लोक तत्परतेने पर्दाफाश करू लागले.
सामाजिक बांधिलकीने वागून समाजासाठी एवढे प्रचंड योगदान देणारा सम्राट मात्र कर्जाच्या ओझ्याखाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करतो आहे हे अनेकांच्या गावीही नाही. तसे कोणतेही वर्तमानपत्र चालवणे प्रस्थापित समाजाच्यासुद्धा आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. कारण साधनसूचीतेच्या अभावामुळे, आर्थिक विवंचनेमुळे अनेक वर्तमानपत्रे जन्मास येतात व अल्पायुषी ठरतात परंतु कोणतीही आर्थिक संपन्नतेची पार्श्वभूमी नसणाऱ्या दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या बहाद्दर संपादक बबन कांबळे साहेबांनी हे भीमधनुष्य मोठ्या लिलया पेलले आहे हे
करत असताना त्यानी विरोधकावरती कुठल्याही रागालोभाची परवा पर्वा न करता समाज हितासाठी प्रहार केले आहेत. व विरोधकांना तसेच दुष्मनाना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे. हे प्रहार करण्याचे काम मोठ्या हिमतीने करत होते परंतु हे जिकीरीचे काम करत असताना अनेक तान तनाव मुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत त्यांना अनेक व्याधींनी घेरले होते तरीही जीवाची पर्वा न करता ते समाजासाठी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत कष्टाने करत होते. त्याचमुळे एवढ्या लवकर काळाने त्यांच्यावर झडप घातली खरंतर हे समाजासाठी केलेलं बलिदानच नव्हे काय?
समाजातील कोणत्या प्रश्नाला सम्राट हात घातला नाही असे नाही. अनेक प्रश्न सम्राटमुळे सरकार दरबारी आणि इतर महत्त्वपूर्ण ठिकाणी रेटले गेले. मग समाजातील विद्यार्थ्यांचा ऍडमिशनचा प्रश्न, स्कॉलरशिपचा प्रश्न, अतिरिक्त सीट्स जागेचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन केंद्र, समाजातील नोकर भरतीचे प्रश्न, त्यांचे रिझर्वेशन त्यांचे प्रमोशन इत्यादी प्रश्न सम्राट धसास लावले आहेत. अन्याय, अत्याचार दूर करण्यास संबंधित यंत्रणाला भाग पडले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांवरील अन्यायअत्याचाराचे प्रश्न ,सोबत महिला उत्पिडणाचे प्रश्न असोत अगदी खैरलांजी पासून ते जवखेडा, खर्डा, शिर्डी, नगर तसेच चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अन्याय अत्याचाराच्या घटना सम्राट ने धसास लावून सत्ताधाऱ्यांची झोप उडवण्याचे काम काम केले आहे. समाज वरती झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सम्राट प्रस्थापितांना धारेवर धरले आहे, त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंत्या, महापरिनिर्वाणदिन, विविध सत्याग्रह, वर्धापन दिन साजरे व्हावेत व समाजामध्ये आपल्या इतिहासाचा विसर पडू नये म्हणून अविरतपणे प्रबोधन केले आहे. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कदापीही इतिहास घडू शकत नाही! ही भूमिका सम्राटने अगदी पहिल्या दिवसापासून मांडली आहे आणि क्रांतीची मशाल सम्राटने अखंडितपणे प्रज्वलित ठेवली आहे.
सुरूवातीपासूनच सम्राट आर्थिक विवंचनेत आहे अनेक आर्थिक प्रश्नांना तो तोंड देत आहे तरीही त्याचे भांडवल न करता अविरतपणे आपले काम करीत आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात समाजामध्ये संपूर्ण लॉकडाऊन असताना समाजामध्ये कोविड बद्दल जनजागृती करणे, समाजाला धीर देणे, समाजाला खरी माहिती पुरवण्याचे काम सम्राट ने केलेले आहे. कोणतेही उत्पन्न नसताना अखंडपणे पीडीएफच्या माध्यमातून ऑनलाइन पेपर चालू ठेवला. साधारण नऊ ते दहा महिने कुठलीही जाहिरात नाही, कुठले उत्पन्न नाही तरीही घरून काम करून त्यामध्ये कामगारांचे वेतन व इतर एस्टॅब्लिशमेंट खर्चाची झळ सोसून हे काम सम्राटने अविरतपणे समाजासाठी चालू ठेवले.
सम्राटकारावर अनेक मोठी मोठी संकटे आलेली आहेत जसे की सम्राटचे कार्यालय असलेल्या ड्रीम मॉल लागलेल्या आगीमुळे सम्राटाचे कार्यालयाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व टेबल्स, कॉम्प्युटर कॅबल्स व इतर महत्त्वाच्या दस्तऐवजाचे अपरिमित हानी झालेली आहे, त्यामुळे अधिकच आर्थिक विवंचनेला सम्राट तोंड देत आहे. एवढे नुकसान होऊनही सम्राट ने आपले काम बंद केले नाही रात्रंदिवस मेहनत करून सर्व सहकाऱ्यांना कोऑर्डिनेट करून सम्राट अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे काम करत आहे, हे समाजाप्रती असणाऱ्या निखळ बांधिलकी शिवाय शक्य नाही! आज सम्राटला समाजाची ताकत म्हणून उभा ठाकला कला आहे. अन्याय अत्याचाराचा कर्दनकाळ झाला आहे. अशा वेळेला बबन कांबळे साहेबांनी अवेळी निघून जावे हे धक्कादायक आणि असहनीय आहे आता साहेबांच्या सुविद्य पत्नी, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे दुःखाचा डोंगर अंगावर कोसळूनही, हृदयावर दगड ठेवून काम करीत आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव कुणाल कांबळे सुप्रिया कांबळे हे जीवाची पर्वा न करता निडरपणे समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. त्यांची सर्व टीम हिरीरीने ही जबाबदारी उचलत आहे. विशेष म्हणजे त्या सर्वांना साथ त्यांची आठ वर्षाची नात चिरंजीव कुमारी विदिशा देत आहे त्यामुळेच आज सम्राट आपल्याला अध्यावत माहितीने परिपूर्ण करीत आहे, त्यामुळे सम्राट जगला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे म्हणून समाजातल्या धुरीणांनी सम्राटला सढळ हस्ते आर्थिक मदत केली पाहिजे. अगदी मदत देता आले नाही तर आपल्या घरातील वाढदिवसाच्या तसेच इतर समारंभाच्या प्रसंगाच्या जाहिराती देऊन सम्राटला मदत करावी सम्राट आंबेडकरी चळवळीला तसेच पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीला अत्यंत पोषक आहे हे जाणले पाहिजे आणि आपण सम्राट ला मदत केली पाहिजे अन्यथा समाजाची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होईल अशी भीती वाटते आपल्या मदतीवर आपल्या जाहिरातीवर आणि आपल्या सद्भावनेनेवरती सदिच्छा वरतीच सम्राटचे दीर्घायुष्य अवलंबून आहे सम्राटला जिवंत ठेवणे हीच बबन कांबळे साहेबांना खरी आदरांजली ठरेल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आयुष्याच्या शेवटपर्यंत जगलेले , कृतीत उतरवणारे व्यक्तिमत्व,
आम्ही पाहिलेले, अनुभलेले आदरणीय बबन कांबळे साहेब आज आम्हास सोडून जाऊन 1 वर्ष झाले, याचा विश्वासच बसत नाही, पण ते आपल्यात नाहीत हे सत्य स्वीकारून, त्यांनी चालवलेल्या वृतरत्न ” सम्राट “या दैनिक वृत्तपत्रास आपण साथ द्याल अशी आशा व्यक्त करून बबन कांबळे साहेबांना शब्दरूपी आदरांजली वाहतो…….आणि हो not but least डी एस सावंत साहेब आपण तमाम आंबेडकरी व्यक्तींच्या मनामध्ये असणारे बबन कांबळे साहेबांच्या विषयीचे विचार व शब्दरूपी आदरांजली आपल्या “जागृत भारत” या (डिजिटल मुखपत्र )च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून व्यक्त केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद…….धी. सागर शांतीलाल मोटे, मुंबई.8828547226
thank you