आधुनिक तत्वज्ञान सांगणारे डॉ. बाबासाहेब – सुधीर कांबळे
चैतन्य वाद विरूद्ध भौतिक वाद हा जागतिक विचार क्षेत्रातील एक प्रमुख झगडा आहे. भारतातील चैतन्य वादी मताप्रमाणे विश्वाची अंतिम अवस्था ही ब्रम्ह आहे. काहींच्या मते ब्रम्ह हे निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य आणि स्थिर आहे. परंतु याउलट भारतीय जडवाद असे मानतो की, जडाशिवाय चैतन्य असूच शकत नाही. जडवाद हे गतिशिल तत्वज्ञान असल्यामुळे आणि विश्वाच्या गतीची प्रक्रिया गतिमान असल्यामुळे जडवाद विश्व उत्पत्तीचे व इतिहासाच्या मिमांसेचे शास्त्र निर्माण करू शकला. उपनिषद ( वेदांत ) काळा नंतर भगवान बुद्धांनी या जडवादाला आणि चैतन्य वादाला भौतिक वादाचा अर्थात विज्ञान वादाचा सैद्धांतिक पाया दिला. त्यांनी तर रूप ( जड ) आणि चैतन्य ( spirit ) यांना एकच म्हणजे एकतत्व मानले. परंतु …
पुढे चैतन्यवाद हा स्थितिशिल विचार असल्याने तो अध्यात्मवाद झाला. या अध्यात्मवादाचे रूपांतर ज्याक्षणी धर्मशास्त्रात झाले तेंव्हा ते गूढ, पवित्र ज्ञान आणि ईश्वराची निर्मिती झाले आणि त्याचक्षणी ते विषमतावादाचे तत्वज्ञान झाले. या तत्वज्ञानाला धर्माची मान्यता मिळाली. मनुस्मृतीने या चैतन्य वादाचे समर्थन केले आणि संपूर्ण भारतीय समाज ( वर्ण- जातींचा ) हा शोषणावर आधारित स्थितिशील ( states co ) समाज बनला. खरे तर वेदात कसलेच तत्वज्ञान नाही. त्यात ऋषींनी रचलेले मंत्र आहेत आणि आर्य- आर्येतर संघर्ष याचे वर्णन आहे. महत्वाचे म्हणजे चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रक्षेपित सिद्धांत ऋग्वेदात आहे.
धर्मानेच हा स्थितीवाद स्वीकारल्यामुळे इथले आधुनिक काळातील विद्वान सुद्धा या गतिमान जगाची मीमांसा करू शकले नाहीत. खरे तर बाबासाहेब म्हणतात, तत्वज्ञान हे स्थिर असते तर धर्म हा गतिमान असतो. धर्माने काळानुसार बदल घडवून आणले पाहिजेत. परंतु इथल्या धर्ममार्तंडानी व विद्वानांनी स्वार्थासाठी धर्मालाच गतीहीन करून टाकले. धर्माला चालीरिती आणि कर्मकांडानी युक्त असा माणसाचा कायदाच बनवून टाकले. या गतिमान जगाची वस्तुस्थिती माहीत असताना देखील इथल्या वेदान्त मानणाऱ्यानी जडवाद मान्य केला नाही. टिळक, गांधी इत्यादीनीं वेदांताचे गोडवे गात असताना केवळ प्राचीन संस्कृतीचा ( चातुर्वर्ण्य – जाति व्यवस्था आधारित ) गौरव केला आणि आधुनिक विचार प्रणालीचा विरोध केला.
गोळवलकर यांनी तर – ‘ शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणारा कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील ‘ ही महाभारतातील आदिम काळातील साम्यवादी कल्पना श्रेष्ठ मानून – शोषणमुक्त, शासन विहिन समाजवादी तत्व नाकारले आणि समाजपरिवर्तनाला प्रेरणा मिळणार नाही असे विचार विचारधनात मांडले. सावरकरांनी मांडलेले हिंदुत्व तत्वज्ञान हे तर चक्क उच्चवर्णीय यांची बटिक असलेली शासनव्यवस्था निर्माण करण्याचे आणि ते हस्तगत करण्याचा एक प्रायोजित राजकीय आराखडा तयार केला होता, हे आज सुस्पष्ट झालेले आहे. बाबासाहेब म्हणतात त्यांनी कल्पलेल्या सैनिकी अधिपत्याखालील हिंदू राष्ट्रात मुसलमानांना कसलेच स्थान नाही. मग हे राष्ट्र कसे बनू शकते ? मुस्लिम, ख्रिचन वगळून इतर जे बहुजन आहेत त्यांच्यावर सवर्णांनी राज्य करण्याचे सावरकरांचे विचार बाबासाहेबांना मुळीच मान्य नव्हते. कारण फॅसिस्ट विचारसरणीमूळे देश विषमता ग्रस्त राहील याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
जर्मन तत्वज्ञ नीतशे याने जरी ‘ परमेश्वर मेला आहे, God is dead ‘ असे जाहीर केले असले तरी त्याने स्वतःच मनुस्मृती हा ग्रंथ आपला प्रेरणा स्त्रोत्र असून त्याने कल्पलेली अतीमानवाची ( सुपरमॅन ) ही कल्पना मनुस्मृतीतून घेतली आहे असे कबुल केले आहे. नीतशेने आधीभौतिक वाद अर्थात जडवाद स्वीकारला होता. लोकमान्य टिळकांना सुद्धा नितशेचे आकर्षण वाटत होते. प्राचीन ऋषी – मुनींनी सांगितलेला कर्मयोग हा एकप्रकारे जडवादच आहे आणि तो वेदांताने ग्राह्य मानला होता असा वेदांताला पूरक अर्थ त्यांनी लावला. खरे तर ऋषी मुनींनी सांगितलेली वेदातील अगदी सुरुवातीच्या काळातील व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना मात्र त्यांनी त्याज्य ठरविली. कारण टिळकांना वास्तव आणि तत्वज्ञान यात अंतर ठेवायचे होते. त्याशिवाय जडसृष्टी आणि ब्रम्हसृष्टी वेगळी करता आली नसती आणि चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील विषमतेचे समर्थन करता आले नसते. त्यांनी या इहलोकातील मानवी कल्याणचे सर्व आधीभौतिक मार्ग तुच्छ मानले. नीति अनितीचा विचार हा इह लौकिक म्हणून त्याज्य मानला आणि सारे लक्ष ब्रम्हसृष्टीवर केंद्रित केले. माणसाचे मन आणि बुद्धी यांच्यापासुन आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व माननारे उपनिषद् व त्याला वेदान्त ठरवणाऱ्या धर्मशास्त्राची भूमिका केवळ अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला पोसणारी आहे हे त्यांच्या लक्षात का नाही आले ? कारण …
नितशेने माणसातील सर्व गुणांचा विकास फक्त महाजन सत्तेतच ( aristocratic societies ) शक्य मानले. याचा अर्थ असा आहे की, इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाच्या भावनेला मान्यता मिळवण्याच्या इच्छेतून व्यक्तीला खरे स्वातंत्र्य लाभते आणि व्यक्तीच्या सर्जन क्षमतेचा विकास होतो. जरी सर्व माणसे जन्माने समान असली आणि त्यांना एकमेकांसारखे होण्याची इच्छा असली तरी त्यांना स्वतःच्या मर्यादा ओलांडून तसे बनता येणार नाही. त्यांनी श्रेष्ठ जणांच्या अधीन राहूनच जीवन जगावे. किती कठोर निर्भतस्ना करावी असल्या तत्वज्ञानाची. असे तत्वज्ञान निर्माण करणारा आणि ते बहुजनांवर थोपवणारा भारत देश कसा विश्र्वगुरु होईल हे काळच जाणेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत