भगवान बुद्धांची शिकवण भाग ४५
तथागत भगवान गौतम बुद्ध देवाविषयी काय म्हणतात?
ईश्वराला कुणीही पाहिलेले नाही.
लोक फक्त ईश्वराविषयी बोलतात.
ईश्वर अज्ञात आणि अदृष्य आहे.
हे जग ईश्वराने निर्माण केले असे कोणीही सिद्ध करु शकत नाही.
जग हे रचलेले नसून ते विकास पावलेले आहे.
ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काहीही लाभ नाही.
ईश्वराच्या आधीन असलेले धर्म हे कल्पनेवर आधारलेले धर्म आहेत.
सगळं काही जर ईश्वराने निर्माण केलं आहे तर मग सगळं अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे ?
जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे, सृष्टीचे तो जर बलवत्तर कारण आहे तर मग माणसाच्या मनात काही करण्याची इच्छा असणे शक्य नाही, त्याला काही करण्याची आवश्यकता नाही, तो निष्क्रीय ठरेल, तर मग ईश्वराने माणसाला निर्माण का केले?
ईश्वर जर शिवस्वरुप म्हणजे कल्याणकारी आहे तर मग माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे.
ईश्वर जर न्यायी, दयाळू आहे तर मग जगात इतका अन्याय का?
ब्रह्मा किंवा ईश्वर आपली किळसवाणी रचना का सुधारत नाही?
जो जर सर्वशक्तीमान आहे तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत?
त्याने निर्माण केलेली सृष्टी दुखोपभोगात का बुडालेली आहे ?
तो सर्वांना सुख का देत नाही?
अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलावत रहाते ?
असत्य सत्यावर का मात करते ?
सत्य आणि न्याय पराभूत का होतात?
अन्यायाला आश्रय देणारा सर्वशक्तीमान ब्रम्हा ( ईश्वर) परम अन्यायी ठरतो.
अशा गोष्टी घडतात याचा अर्थ एकतर माणूस त्याच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा ईश्वर न्यायी आणि चांगला नसावा वा तो आंधळा असावा.
ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. ईश्वर या संकल्पनेमुळे धार्मिक क्रियाकलाप तयार होतात.
हे धार्मिक क्रियाकलाप भ्रामक समजुतींना जन्म देतात.
ईश्वर हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे.
पूजा आणि प्रार्थना याच्यामुळे पुरोहितपद उत्पन्न होते.
पुरोहित सर्वप्रकारच्या खुळ्या समजूतींना निर्माण करतो.
ईश्वराने सृष्टी निर्माण केली असे सांगितले जाते, मग त्याने सृष्टी कशी निर्माण केली?
ईश्वराने सृष्टी काही पदार्थापासून निर्माण केली की शून्यातून निर्माण केली?
‘काही तरी’ हे ‘काहीच नाही’ मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही.
जर काहीतरी मधून निर्माण केले असेल तर याचा अर्थ काहीतरी हे ईश्वराच्या अगोदर अस्तित्वात असले पाहिजे.
म्हणून ईश्वराला काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही.
शेवटी बाबासाहेब म्हणतात –
ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदृष्ट असल्याने तो अधर्म आहे.
हा विश्वास म्हणजे असत्यावरील विश्वास ठरतो.
(संदर्भ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत- ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, तृतीय खंड भाग चवथा )
क्रमशः आर.के.जुमळे
दि.२७.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत