
मागील भागात दहा पारमितांपैकी शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म, विर्य व शांती या सहा गुणांची माहिती घेतली. आता त्यापुढील गुणांची माहिती घेऊया.
७) सत्य
सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलू नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.
सत्याशिवाय शीलाचे पालन करता येत नाही. कुशल कर्माच्या प्राप्तीसाठी सत्याचे आचरण करावे लागते. वैज्ञानीक दृष्टीकोणातून जे सिध्द करता येते ते सत्य होय.
८) अधिष्ठान
अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय होय. यालाच अथक प्रयत्न, दृढ संकल्प असेही म्हणता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात कितीही संकटे आलीत तरीही हाती घेतलेले काम न डगमगता पार पाडले. मग तो महाड येथील चवदार तळ्याचा २० मार्च १९२० चा सत्याग्रह असो किंवा २५ डिसेंबर १९२७ चा मनुस्मृतीदहन आंदोलन असो किंवा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा ५ वर्षे चाललेला दीर्घ सत्याग्रह असो ते सर्व दृढ निश्चयाने पार पाडलेत.
९) करुणा
करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता होय. सर्व प्राणीमात्रावर दया करणे, दयाभाव बाळगणे, दयेला प्रेमाची जोड देणे म्हणजे करूणा होय. करूणा ही पुत्रवत प्रेमासारखी असावी. करूणेमुळे प्राणीमात्रांचे जीवन फुलते, निर्भय बनते. प्रेमयुक्त दयेला कृतिची जोड असणे म्हणजे करूणा होय. विश्वातील समस्त दुःखीतांप्रती बुध्दाच्या मनात करूणा जागली व म्हणूनच बुध्दाने शुध्द असा बुध्द धम्म जनकल्याणासाठी प्रर्वतीत केला. म्हणून बुध्द हे करूणेचे प्रतिक होते. करूणादर्श होते. महाकारुणिक होते.
जेथे दारिद्र्य आणि दु:ख आहे त्याकडे लक्ष देऊन ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक आहे. प्रज्ञा आणि शीलासोबत करुणेची जोड असते. म्हणून प्रज्ञा-शील-करुणा असे म्हटल्या जात असते.
देवदत्ताने घायाळ केलेल्या पक्षाला सिध्दार्थ गौतमाने वाचविले. म्हणून मारणार्यापेक्षा वाचविणारा अधिक श्रेष्ठ असतो हे त्यांनी सिध्द केले.
एकदा एका भयानक दुर्गंधी येणार्या रोगाने त्रस्त झालेल्या, वयस्कर असलेल्या भिक्खूजवळ कोणी जात नसताना भगवान बुध्दांनी त्याला आंघोळ घालून धुवून स्वच्छ केले व त्याच्यावर उपचार केले. बुध्दाच्या ठायी असलेली करूणा ही अथांग सागरा समान होती. म्हणून भगवान बुध्दांना करुणेचा महासागर म्हटल्या जाते.
१०) मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे होय. तसेच शत्रूंविषयी देखील बंधुभाव ठेवणे होय. माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे. केवळ प्रेम करणे पुरेसे नाही तर खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. मैत्री ही केवळ मानवापुरती मर्यादित नाही. आपले मन नि:पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. आपणा स्वत:ला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना अशा मैत्रीमुळेच मिळू शकते.
भगवान बुध्दांच्या करुणा व मैत्रीमुळेच देशा-देशात, माणसा-माणसात संघर्ष निर्माण होणार नाही. जगातील युध्दाची भाषा नष्ट होत जाईल व त्यामुळे जगाचा विनाश टळेल. आज जगाला युध्द नको तर बुध्द हवे अशीच भुमिका सर्व विचारवंत घेत आहेत.
या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुध्दीची जोड दिली पाहिजे. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुध्दीला प्रज्ञा असे म्हणता येईल. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक आहे, याचे आणखी कारण असे आहे की, दान आवश्यक आहे; परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे; परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.
अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा दिसणार नाही. म्हणूनच प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे.
आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने आपल्या दैनंदीन जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेल्या या दहा पारमिताचे-सद्गुणांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन निष्कलंक राहण्यास मदत होईल. परिणामत: आपण सुखी, समाधानी व आनंदीत राहू शकतो. म्हणूनच या दहा सद्गुणांना पारमिता म्हणतात. पारमिता म्हाणजे पूर्णत्वाच्या अवस्था होय.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दूर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व इतरांना धम्मदिक्षा देवून मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमिवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हेतर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२४.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत