स्वच्छता मोहिमेचा पॅटर्न राज्यातल्या इतर शहरांमधेही राबवण्यात येणार…

मुंबईच्या विविध भागात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्यमंत्र्यांनी आज सहभाग घेतला आणि परिसराची तसंच स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली.मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं स्वरुप आलं असून हा पॅटर्न राज्यातल्या इतर शहरांमधेही राबवण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. मुंबईत दर आठवड्याला विविध प्रभागात ही मोहीम राबवण्यात येत असून स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत. प्रत्येक चौकात झाडं लावणं, अर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरीत क्षेत्र वाढविणं ही कामंही केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या माध्यमातून आजुबाजूच्या प्रशासकीय विभागांतलं मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन, एअर प्युरिफायर, मिस्ट मशीन अशा आधुनिक साधनसामुग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई , अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदींच्या सफाईची कामं केली जात आहेत. यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून ते या मोहिमेचे खरे हिरो आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यांच्या इतर अडचणी देखील दूर करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत