मुंबई महापालिका वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमणार मार्शल
एखाद्या भागात किंवा रस्त्यावर बेकायदा उभी असणारी वाहने वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आता मुंबई महापालिका मार्शल नेमणार आहे. अवैध वाहनतळे आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा पर्याय महापालिकेने निवडला आहे.
स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याचे नियोजन आणि पूर्वतयारीसाठी गुरुवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत वाहने उभी करण्यास परवानगी नसलेल्या ठिकाणी उभी वाहने शोधून वाहतूक पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यासाठी मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईत रस्त्यांच्या कडेला अवैधरीत्या वाहने उभी केली जातात. परिणामी, नागरिकांची गैरसोय होते. वाहतुकीला अडथळा होण्यासह कचऱ्याचीही समस्या निर्माण होते. यामुळे ठरवलेले वाहनतळ सोडून अन्यत्र कोठेही वाहने उभी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी विभाग पातळीवर मार्शल्सची नेमणूक करण्यात येईल, असे इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
या वेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त चंदा जाधव यांच्यासह संबंधित परिमंडळांचे सहआयुक्त, उपआयुक्त आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत