उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्याच्या सहा विभागांतील धरणांतील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच वेळी ८७.१० टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.
सध्या राज्यातील कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ८२.६३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागात याच वेळी ८३.१५ टक्के पाणीसाठा होता. छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या ३७.६३ टक्के एवढा राज्यातील नीचांकी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या भागात ८७.३१ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागात ७१.७८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ७९.४६ टक्के होता.
राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण या सहा विभागांमध्ये २५९५ लहान, मध्यम आणि मोठे धरणप्रकल्प आहेत. धरणांमधील पाणी राज्यातील शेती, नागरिकांना पिण्यासाठी, तसेच औद्योगिक कारणांसाठी वापरण्यात येते. यंदा काही अपवाद वगळता बहुतांश धरणे १०० टक्के भरलीच नाहीत. अमरावती गेल्या वर्षी ९१.५२ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७५.६२ टक्के आहे. पुणे विभागातही पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी या विभागात ८८.०८ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७०.३९ टक्के आहे. नाशिक विभागात गेल्या वर्षीच्या ८९.८९ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत सध्या ७०.६१ टक्के साठा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत