महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रुपी अस्तित्व चिरकाल टिकवण्यासाठी संघटित होऊया..!
पृथ्वीराज कल्लाप्पा चिलवंत (सामान्य कार्यकर्ता ) धाराशीव मो.9923 51 7120
महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याला, त्यागाला आणि विचाराला कोटी कोटी प्रणाम.
आज सकाळी समाज माध्यमावर दीपक डावरे सरांची एक चित्रासह पोस्ट पाहिली. त्यात एका बाजूला सामान्य जनता व त्यांच्या दिशेने समोरून धर्मवाद, मनुवाद, जातीयता, असमानता आणि वर्ग रुपी बाणांचा मारा होत आहे. या दोघांच्या मध्ये एका हातामध्ये संविधान रुपी ढाल तर दुसऱ्या हातामध्ये लेखणीचे शस्त्र घेऊन लढणारे बाबासाहेब अशा स्वरूपाचे अतिशय बोलके चित्र होते. त्याखाली मजकूर लिहिलेला होता की, “बाबासाहेब आज हयात असते तर आज त्यांच्या लढायांचे स्वरूप काय असते याचे आकलन होऊन ती लढाई काल सुसंगत करणे हेच महामानवास खरे अभिवादन होईल.” अशा आशयाचा मजकूर होता; अर्थात संदेश होता. या एका चित्राने आणि या मजकुराने बाबासाहेबांच्या ज्ञानार्जनाच्या त्यागाची, त्यांच्या अनेक सामाजिक समानतेच्या हक्कासाठी जी लढाई लढली यांची जणू कांही चित्रफितच डोळ्यासमोरून गेली. आज आपल्या घरातील एखाद्या लहान मुलासोबत घरी, शाळेत अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी अपमानित होण्याचे एक दोन जरी प्रसंग आले तर ते लहान मुल आपला संयम सोडते आणि तात्काळ आपली प्रतिक्रिया देते. याच्या उलट बाबासाहेबांना त्यांच्या अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते त्यांच्या संसदीय कारकिर्दी पर्यंत पदोपदी अपमानित केले गेले त्यांना शाळेच्या बाहेर किंवा इतर विद्यार्थ्यापासून खूप अंतरावर बसवणे, शाळेतील सार्वजनिक माठा मधून पाणी पिण्यास मज्जाव करणे, अस्पृश्यतेची वागणूक देणे, शिक्षणाने उच्चविद्याविभूषित झाल्यावर देखील राहण्यासाठी भाड्याने घर न मिळू देणे, शिपायाकडून कार्यालयीन कागदपत्रे दुरूनच फेकून देणे, बॅरिस्टर असताना सार्वजनिक हॉटेलमध्ये पाणी सुद्धा नाकारणे हे आणि असे असंख्य प्रसंग आहेत जे बाबासाहेबांना अपमानित करण्याचे दाखले देतात. तरी परंतु बाबासाहेबांच्या ध्येयाच्या आड कुठलेच प्रसंग अडचण आणू शकले नाहीत हे तितकेच सत्य आहे. यावरून बाबासाहेब केवळ ज्ञानाचे धनी नव्हते तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या कृतीवर करायचे, संयमाने निर्णय घेऊन ध्येय प्राप्तीकडे मार्गक्रमण करायचे. आता त्यांची ध्येय काय चांगल्या पगाराची नोकरी पत्करणे ऐशो आरामाचे जीवन जगणे आणि आपल्या कुटुंब कुटुंबात रममान होणे हे होते का? तर नक्कीच नाही. एवढे शिक्षण पदव्या घेऊन जर त्यांना अशी हीन दर्जाची वागणूक दिली जात असेल तर पददलित लोकांची काय अवस्था असेल? तर ही अवस्था बदलणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देणे हे ध्येय समोर ठेवून त्यांनी काम केले. या कामांमध्ये त्यांनी त्यांची गंगाधर, रमेश, इंदू, राजरत्न ही चार पोटची लेकरं उपचारा अभावी गमावली तसेच ज्या सहचरणीच्या त्यागावर बाबासाहेब हे विश्व निर्माण करू शकले त्या माता रमाई यांची साथ सुद्धा अर्ध्यावर सुटली. एवढा त्याग कोणासाठी होता तर तो सर्व बहुजन वंचित लोकांसाठी याच्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी व मानवतेसाठी हा त्याग होता !
महामानव बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या लढ्यांचा आपण थोडक्यात आढावा घेतला तर त्यातून असे लक्षात येईल की बाबासाहेबांनी तत्कालीन सरकारला एकाच देशातील वेगवेगळ्या लोकांच्या गटांची ओळख करून दिली. विशिष्ट काहींना वेगवेगळे अधिकार असणे अथवा काहींना कसलेच अधिकार नाकारणे अशा लोकांची ओळख करून दिली. उदाहरणादाखल आपण चवदार तळ्याचा सत्याग्रह पाहूया. महाड मधील ज्या सार्वजनिक संबोधल्या जाणाऱ्या तलावात जनावरांना पाणी पिणे शक्य होते त्यामध्ये जनावरांना धुतले जात होते, त्या तलावात माणसांचा एक असा वर्ग होता की त्या वर्गाला पाणी पिण्याची परवानगी नाकारली होती. दिसायला माणूस पण त्यांना वागणूक मात्र जनावरांपेक्षाही ही हीन होती तो वर्ग म्हणजे तत्कालीन अस्पृश्यवर्ग होय. या वर्गाची स्वतंत्र ओळख निर्माण करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी द्यावी या हेतूने केली जाणारी चळवळ बाबासाहेबांनी सुरू केली होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत हजारो सहकारी असले तरी बाबासाहेब विद्वत्तेची लढाई एकटेच लढत होते. अगदी वर उल्लेख केलेल्या चित्राप्रमाणे..!
एक योद्धा आपल्या ज्ञानाच्या बळावर देशातील सर्वच नागरिकांना एकाच रांगेत आणण्याचा प्रयत्न करीत होता आणि संविधानातील कलमान्वये तसेच झाले ही, परंतु संविधानाची जशास तशी अंमलबजावणी करण्यास कोणते शासन पूर्णपणे यशस्वी झाले आहे का? असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर “कोणतेही शासन नाही” असेच येईल. संविधान स्वीकृतीच्यापूर्वी दलित समाज दयनीय अवस्थेत जीवन जगत होता. 26 जानेवारी 1950 ला संविधान अंमलबजावणी झाल्यानंतर निश्चितच काही प्रमाणात दलितांच्या परिस्थितीत अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते, परंतु या प्रगतीची दुसरी बाजू देखील तपासली पाहिजे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग यांनी नुकताच त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा अर्थात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येईल भारत देशात सदर कायद्यान्वये 15,368 गुन्हे घडणारे राज्य उत्तर प्रदेश प्रथम स्थानावर आहे. तर पुरोगामी म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र 2,743 गुन्ह्यासह सहाव्या क्रमांकावर आहे. यावरून हेच दिसून येईल की संविधान लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात संविधान अमृत महोत्सवी वर्षांमध्ये देखील सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकली नाही. या परिस्थितीस अनुसरून बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी च्या संविधान सभेमध्ये संसदेतील केलेल्या भाषणाचा काही अंश आठवतो. बाबासाहेब म्हणतात की, “आपण राजकीय स्वातंत्र्य जरी मिळवले असले तरी सामाजिक आर्थिक आणि विविध विषमतेच्या स्वतंत्र देशांमध्ये प्रवेश करीत आहोत. हे संविधान देशाला अर्पण करीत असताना एवढेच सांगेन की संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक चांगले असले तर हे संविधान चांगले सिद्ध होईल. आणि राबविणारे लोक जर वाईट असतील तर हे संविधान देखील वाईट सिद्ध होईल !” महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णवादी प्रवृत्तीच्या काळामध्ये एकट्याने संघर्ष करून भारतातील तमाम वंचित घटकाला न्याय मिळवून दिला. त्यांच्या पश्चातच्या काळात लोकांनी असंख्य सुख सुविधा उपभोगल्या व आपली, आपल्या परिवाराची प्रगती करून घेतली. परंतु बाबासाहेबांच्या पश्चात प्रगती केलेला वर्ग मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला अर्थात बाबासाहेबांच्या उपकाराचे असंख्य लोक लाभार्थी झाले मात्र एकूण संख्येचा विचार केला तर त्यांच्या विचाराचे लाभार्थी-प्रामाणिक अनुयायी फारच कमी तयार झाले. बाबासाहेबांच्या फोटोसमोर त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणारे अधिक पण वैचारिक वारसा जपणारे त्यांच्या विचारांचा प्रामाणिक प्रचार प्रसार करणारे मोजकेच लोक दिसून येतात. अशा प्रामाणिक लोकांना वंदनच आहे. मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे असो.
सबंध देशातील सध्याची जी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती पाहता येणारा काळ बहुजनांसाठी खूपच कठीण असू शकतो हे ओळखून बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन येणाऱ्या काळाशी सामोरे गेले पाहिजे. यासाठी एक सामूहिक कृतीशील कार्यक्रम आखला पाहिजे. महामानव बाबासाहेबांना अवघे 65 वर्ष आयुर्मान मिळाले. त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी सर्व जाती धर्माचे लाभार्थी अथवा वैचारिक वारसदारही काहीच करू शकत नव्हते परंतु त्यांचे संविधान रुपी अस्तित्व चिरकाल टिकवण्यासाठी आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकास हक्क आणि न्याय मिळवून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या उपकाराच्या प्रत्येक लाभार्थ्यांनी तसेच वैचारिक अनुयायांनी देखील संघटित होऊन मार्गक्रमण करायला हवे हेच खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल.!
जय भीम .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
महामानवाला विनम्र अभिवादन.
अप्रतिम वास्तव वादी लेख.
Thank you sir