निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय रणनिती आणि सोशल इंजिनिअरिंग कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं ! – आयु. विजय बनसोडे

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय रणनिती आणि सोशल इंजिनिअरिंग कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं !

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय रणनिती आणि सोशल इंजिनिअरिंग कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे आणि त्याच बरोबर राज्यातील मुळातच मनुवादी आणि गांधीवादी असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे आंबेडकरी चळवळ व नेतृत्व संपविण्याचे विषारी षडयंत्र सुद्धा समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

महाराष्ट्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून चौरंगी आणि पंचरंगी लढतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि ‘आघाडी शिवाय पर्याय नाही‘ म्हणणाऱ्यांनी समजून घ्यावे की, राजनितीच्या सारिपाठावर “राजकीय यश” बेरजेच्या समीकरणावर आधारित आहे. सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या अंगाने वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्या रणनीतीच्या बाबतीत भरपूर चर्चा करण्यात येत आहेत, ज्या सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा आहेत. बाळासाहेबांच्या राजकीय रणनीतीच्या बाबतीत नकारात्मक चर्चा करणारे एक तर आपल्या मालकांप्रती एकनिष्ठ आहेत किंवा अर्ध गाबोळे आंबेडकरवादी आहेत.

बाळासाहेबांनी मागच्या सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राजकीय आणि सामाजिक मंथन घडवून आणले, ते सामाजिक अर्थात “सोशल इंजिनिअरिंग” आहे. त्यामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रातील विविध जाती समूहांचा बाळासाहेबांना पाठिंबा आहे. हे सर्वांनी सर्वप्रथम लक्षात घ्यावे. त्यामुळे बाळासाहेबांनी या लोकसभा निवडणुकीत आघाडीमध्ये जाण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा निर्णय जरी विचाराधीन असेल परंतु समोरच्या बाजूला असलेल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांना मात्र ‘आंबेडकरवादी विचाराच्या राजनीतीचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण होऊ नये‘ यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त प्रयत्न करावे लागत आहेत. अर्थात सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सरळ नाही. ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे.

तरीसुद्धा भारताचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी लोकसभेच्या जागांची केलेली मागणी असेल किंवा स्वतः आपल्या पक्षाच्या ताकतीची फरफट होत असलेली पाहून अगदी समय सूचकतेने लोकसभा जागांची स्वतःच्या पक्षाची जाहीर केलेली उमेदवार सूची असेल, याकडे पाहता असंच लक्षात येते की, बाळासाहेब आंबेडकर अर्थात वंचित बहुजन आघाडी संविधानाच्या बाजूला लढण्यासाठी इच्छुक असतानाही महाराष्ट्रातील काँग्रेस, उबाठा, शरद पवार ही चांडाळ चौकडी मात्र आंबेडकरी विचाराची राजनीती मजबूत होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. मग यासाठी त्यांना भारतीय संविधान आणि लोकशाही पणाला लावावी लागली तरी चालते !

अशा परिस्थितीत जर आंबेडकरीवादी विचाराच्या स्वाभिमानी राजकारणाची फरफट होत असेल तर ते आपण सहन करणार नाही असे बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले आणि महाराष्ट्रातील 48 पैकी 20 जागांवर आपले उमेदवार ही घोषित केले. खरं तर ही बाब फुले,शाहू,आंबेडकरी विचाराच्या राजनीतीचा पहिला विजय आहे असे मानायला काहीच हरकत नाही. (शर्त एवढीच आहे की बाळासाहेबांनी ज्या जागा घोषित केले आहे तिथल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अगदी तन-मंधनाने बहुजन समाजातील विविध घटकांना व त्यांच्या मतांना वंचित बहुजन आघाडीची जोडण्याचं काम केलं पाहिजे.) कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये किमान चौरंगी आणि जास्तीत जास्त पंचरंगी लढती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एकूण शक्ती आणि बहुजन समाजातील विविध घटकांचा वाढता पाठिंबा पाहता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय योग्यचं ठरतो. (त्यात काही बदल ही होईल.) त्यामुळे या चौरंगी आणि पंचरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या जागा कायम करून महाराष्ट्रातील शोषित पीडित आणि वंचित समूहाला नैसर्गिक “न्याय” आणि भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणात आपली महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणाऱ्या यंत्रणा पासून सावधान होऊन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व प्रचारकांनी बाळासाहेबांच्या प्रत्येक निवडणूक धोरणाकडे सकारात्मक आणि डोळसपणे पाहिले पाहिजे आणि आंबेडकरी समाजातील विविध विश्लेषकांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या यंत्रणेचा भक्कमपणे मुकाबला केला पाहिजे.

महाराष्ट्र तथा देशाच्या राजकारणामध्ये जर आपण इतिहासाचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, ज्या ज्या वेळी या देशांमध्ये चौरंगी आणि पंचरंगी लढती झालेल्या आहेत, अशावेळी (मत विभाजनाच्या समीकरणामुळे) परिवर्तनवादी विचारसरणी मोठ्या ताकतीनं विजयी होऊन देशाच्या राज सत्तेमध्ये स्थिरावलेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे.

भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी आणि भाजप+RSS मुक्त भारत करण्यासाठी बाकी समाजवादी आणि परिवर्तनवादी राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढली पाहिजे. ही बाब जरी सत्य असली तरी ही “आत्मसन्मान व स्वाभिमान गहाण ठेवून एकत्रित येण्यात कोणते शहाणपण नसते” हे ही तितकेच मोठे सत्य आहे. भारताच्या सध्याच्या एकूण राजकीय राजनीति मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर राजनीती करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि महाराष्ट्रातील बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची राजकीय शक्ती सध्याच्या काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतानाही जाणीवपूर्वक मोठ्या षडयंत्र पूर्ण धोरणाने फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या राजनीतीला संसदेतून बाहेर ठेवण्यासाठी सन्मानजनक वागणूक दिली जात नाही.

अशा गंभीर परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशात बहन मायावती आणि महाराष्ट्रात बाळासाहेब एकत्र येत नाहीत, हा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे लक्षात घ्यावे की, उपरोक्त प्रकारचा आरोप हा बाळासाहेबांचे खच्चीकरण करण्यासाठीचे षडयंत्र आहे आणि वंचितची राजकीय ताकद नाकरण्याचा प्रस्थापितांचा नालायकपणा सुद्धा आहे. हे ही आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे.

तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, भारतामध्ये या दहा वर्षांमध्ये मानवतेला काळीमा फासणाऱ्या कित्येक भयानक अशा घटना घडल्या. तसेच भारतीय नागरिकांच्या हक्क आणि अधिकारावर घाला घालण्यात आला. देशातील गोरगरिबांच्या शिक्षणावर गदा आणली,पावला पावलावर भारतीय संविधानाचा अपमान केला. भारतीय लोकशाहीला काळीमा फासला आणि लोकशाहीचा गळा घोटत असताना सुद्धा स्वतःला खूप मोठे राजकीय नेते समजणारे किंवा स्वतःच्या राजकीय पक्षाला बलाढ्य समजणारी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे शिवसेना असेल किंवा शरद पवार राष्ट्रवादी असेल यांनी RSS प्रणित भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात किती मार्च काढले ? किती विराट सभा घेतल्या ? तर ह्याच दोन तोंडी गांडूळ असलेल्या राजकीय मंडळींनी 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारीला संविधानाच्या आणि लोकशाहीच्या सन्मानार्थ कोणते ही भरीव कार्यक्रम घेतले नाहीत. असे हे नकली दुटप्पी लोक भारतीय संविधान आणि लोकशाहीचं समर्थन करतील का ? केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी लोकशाही आणि संविधानाची भाषा ही मंडळी करत आहे. परंतु हे सुद्धा विषारी नागच आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या देशातल्या महिलांची आब्रू लुटली जात असताना यांनी किती आंदोलने केली ? काय भूमिका घेतल्या ? तरी ही मंडळी सध्या सांगत आहे की, भारताचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मागच्या दहा वर्षात सातत्याने भाजपा सरकार संविधानाला कमकुवत आणि कमजोर करत असताना सुद्धा राहुल गांधीनी “भारत जोडो यात्रा” काढली पण लोकशाही बचाव आणि संविधान संरक्षणाची रॅली कधीच काढली नाही. हा इतिहास आपण का विसरता हे समजत नाही! अशी ही आपली स्वतःची संपत्ती वाचवण्यासाठी राजकीय पक्षाची दुकानदारी चालविणारे चमडी चोर नेते मंडळी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप करतात हे किती हास्यस्पद आहे..!

आजच्या घडीला देशाची लोकशाही व संविधान वाचवणे हे भाजपा+आर.एस.एस वगळता सर्वांचेच लक्ष असायला पाहिजे. परंतु त्यासाठी आपलीच अर्थात फुले,शाहू, आंबेडकरवादाचीच फरफट का ? याचा विचार करून आपण ‘बाळासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून आंबेडकरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या अर्धगाबुळ्या आंबेडकरवादी आणि प्रस्थापित राजकीय पक्षांच्या चेल्यांना‘ समर्पक आणि सडेतोड उत्तरे दिली पाहिजे.

दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की, महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षाची अवस्था पाहता वंचितची शक्ती मोठी असताना आणि बाळासाहेब आघाडी करण्यास इच्छुक असतानाही राज्यातील राजकीय तहात बाळासाहेबांना कमजोर ठेवण्याचे षडयंत्र जर उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले ही प्रस्थापित मंडळी करत असतील तर आपण ही लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंचरंगी व चौरंगी लढतीत विजयश्री खेचून आणलाच पाहिजे. कारण भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे महाराष्ट्रातील परिवर्तनवादीच जिवंत नाही राहिलो तर काय उपयोग ? त्यामूळं या षडयंत्रकारी राजकीय पक्षाकडून आपला राजकीय खून होण्यापेक्षा, आपण सध्या होत असलेल्या चौरंगी आणि पंचरंगी निवडणुकीत हिंमतीने लढून लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी अविरतपणे संघर्ष करू शकतो. खरंच जर या तुटलेल्या उद्धव ठाकरे,शरद पवार आणि राहुल गांधी यांना भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर बाळासाहेब यांच्या महाराष्ट्रातील राजकीय शक्तीचा आदर करणे अत्यंत गरजेचा आहे.

त्यामुळे बाळासाहेबांच्या शिलेदारांनों एक गोष्ट लक्षात घ्यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, “आपली झोपडी शाबूत ठेवा म्हणजे लोक तुमच्या आश्रयाला येतील.” आणि आज वंचित बहुजन आघाडी नावाची आपली झोपडी राजमहालासारखी मजबूत झाली आहे. त्यामुळे समाजामध्ये अर्धवट गाबुळ्या लोकांकडून होणाऱ्या चुकीच्या प्रसार आणि प्रचाराला आपण बळी न पडता आंबेडकरी समाजाला अर्थात आपल्या मजबूत वोट बँकेला सुद्धा ‘जाणीव पूर्वक निर्माण करण्यात येत असलेल्या या संभ्रमापासून दूर ठेवणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे‘ हे आपण नीटपणे लक्षात घ्यावं.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090

जि.संघटक भारतीय बौद्ध महासभा, उस्मानाबाद

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!