मुंबई विद्यापीठाच्या परीक्षे अगोदरच पेपरफुटी प्रकरण

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राअंतर्गत ‘कॉमर्स – ५’ (एमएचआरएम) या विषयाची परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका आल्याचा प्रकार ऑक्टोबर महिन्यात उघड झाला होता. सदर पेपरफुटीचे प्रकरण भिवंडीतील कोनगाव येथील गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयात झाले असल्याचे विद्यापीठाला आढळले. फोर्ट येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राअंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास ‘कॉमर्स- ५’ या विषयाची परीक्षा होती. त्यासाठी परीक्षा केंद्राचा वॉटरमार्क क्रमांक ठरलेला होता. परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक म्हणून कर्तव्य बजावत असलेले सिद्धार्थ महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने (३५) यांना एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअॅपवर ‘कॉमर्स- ५’ या विषयाची प्रश्नपत्रिका आणि बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे असल्याचे निदर्शनास आले. माने यांनी मोबाइल ताब्यात घेत प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क तपासला असता तो क्रमांक माने यांच्या परीक्षा केंद्राचा नसून अन्य परीक्षा केंद्राचा असल्याचे स्पष्ट झाले. सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमाअंतर्गत आझाद मैदान पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. आरोपी परीक्षार्थी गिरगावमधील भवन्स महाविद्यालयात शिकत असून त्याला ही प्रश्नपत्रिका त्याचा मित्र व गुन्ह्यातील सहआरोपी सूरज याने सकाळी ९.३७ वाजता व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून तात्काळ मुंबई विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली होती.
पेपरफुटीचे प्रकरण मुंबई विद्यापीठाच्या ‘अवैध साधन चौकशी समिती’च्या १८ नोव्हेंबर, २०२३ च्या बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. सदर समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने भिवंडीतील गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयातील परीक्षा केंद्र पुढील दोन वर्षांकरिता प्रतिबंधित केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत