
एका भारतीय नागरिकाला त्याच्याविरुद्ध गुजरातमध्ये दाखल असलेला एक फौजदारी गुन्हा काढून टाकण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर त्याने या कटासाठी सहमती दर्शवली, असा आरोप अमेरिकेतील संघराज्य अभियोक्त्यांनी (फेडरल प्रॉसिक्युटर) केला आहे.
एका अमेरिकी नागरिकाची न्यू यॉर्कमध्ये हत्या करण्याच्या फसलेल्या कटातील सहभागाबद्दल निखिल गुप्ता (५२) यांच्यावर खुनासाठी हल्लेखोर नेमण्याचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे न्यू यॉर्कमधील यू एस डिस्ट्रिक्ट कोर्टात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
या आरोपपत्रात हत्येच्या कारस्थानाचे लक्ष्य असलेल्या अमेरिकी नागरिकाचे नाव घेण्यात आले नाही. तथापि, ‘सिख्स फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित संघटनेचा फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिका अधिकाऱ्यांनी हाणून पाडला आणि याबाबत भारत सरकारला सूचित केले, असे वृत्त ‘दि फायनान्शिअल टाइम्स’ने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने गेल्या आठवड्यात दिले होते.
तुमच्याविरुद्ध गुजरातमध्ये प्रलंबित असलेला एक फौजदारी गुन्हा खारीज केला जाईल अशी हमी मिळाल्यानंतर गुप्ता याने कशाप्रकारे या कटासाठी संमती दिली याचा आराखडा सरकारी वकिलांनी आरोपपत्रात मांडला आहे. त्यात त्यांनी नवी दिल्लीतील एक भारतीय सरकारी कर्मचारी आणि निखिल गुप्ता यांच्यातील दूरध्वनी आणि इलेक्ट्रॉनिक संभाषणाचाही उल्लेख केला आहे.
एका गुप्त सूत्राने गुप्ताची एका कथित हल्लेखोराशी भेट करून दिली, जो प्रत्यक्षात अमेरिकेच्या अमली पदार्थविरोधी प्राधिकरणाचा (डीईए) हेर होता. या हेराला हत्येसाठी १५ हजार डॉलर्स आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत