एनडिए च्या 75 व्या वर्षांनिमित्त दीक्षान्त संचलनात महिलांविषयी काय म्हणाल्या महामहिम द्रोपदी मुर्मू

छात्रांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, की आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दीक्षान्त संचलनात महिलांचा सहभाग कौतुकास पात्र आहे. तरुणांसाठी तुम्ही एक ‘रोल मॉडेल’ आहात. ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद कायम स्मरणात ठेवा.
प्रथम सिंग हा राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. जतिन कुमार रौप्यपदकाचा, तर हर्षवर्धन भोसले कांस्यपदकाचा मानकरी ठरला. ‘ज्युलियट स्क्वॉड्रन’ने ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पटकाविला. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
देशाच्या संरक्षणासाठी समर्थ अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए ) ७५ वर्षांच्या इतिहासात दीक्षान्त संचलनात (मार्चिंग) महिलांच्या तुकडीने गुरुवारी प्रथमच पदसंचलन केले. ही ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या संचलनातील सहभागाची प्रशंसा केली.
देशसेवेचे स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण, भविष्यातील आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास बाळगत लष्करी बँड पथकाच्या ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतांच्या तालावर शिस्तबद्धरीत्या चालणारी पावले या वैशिष्ट्यांसह राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन गुरुवारी दिमाखात पार पडले. राष्ट्रपती मुर्मू यांनी मानवंदना स्वीकारली. राज्यपाल रमेश बैस, सरसेनाध्यक्ष (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल मनोज डोग्रा या वेळी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत