राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता ; ३ डिसेंबर रोजी मतमोजणी
छत्तीसगडची सत्ता काँग्रेस कायम राखण्याचा अंदाज असून तेलंगणमध्ये बहुतेक सर्व संस्थांनी काँग्रेसला बहुमत दाखविले आहे. मात्र पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले असून बहुतांश सर्वेक्षणांमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मिझोरममध्ये स्थानिक आघाड्यांमध्येच चुरस रंगण्याची शक्यता आहे. मात्र चार मोठ्या राज्यांमध्ये प्रचाराच्या काळात निकालाबाबत असलेली संदिग्धता मतदानोत्तर चाचण्यांनंतरही कायम राहिली आहे. आता रविवार, ३ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
७ नोव्हेंबर ते गुरुवार, ३० नोव्हेंबर या कालावधीत मध्य प्रदेश, राजस्थान (२०० जागा), तेलंगण (११९ जागा), छत्तीसगड (९० जागा) आणि मिझोरम (४० जागा) या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव गेली १० वर्षे सत्तेत आहेत. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांनुसार राजस्थान व तेलंगणमध्ये सत्तांतराची शक्यता असून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. मिझोरममध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फारशी संधी नसल्याचे चित्र आहे. तेथे सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) आणि नव्याने स्थापन झालेल्या झोराम पिपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) यांच्यात चुरस आहे.
दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. छत्तीसगडमध्ये बहुतांश संस्थांनी काँग्रेस व भाजपमध्ये अटीतटीची लढाई असल्याचे भाकीत केले असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काँग्रेस सत्ता कायम राखेल असे म्हटले असताना माजी मुख्यमंत्री व भाजप नेते रमणसिंह यांनी सत्तांतराचा दावा केला आहे. तेलंगणमध्ये बहुतेक सर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसला सत्तेचा अंदाज वर्तविण्यात आला असताना बीआरएस नेते के. टी. रामाराव यांनी आपल्या पक्षाला ७०पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत