तुम्हाला माहिती आहे का ?

तुम्हाला माहिती आहे का की, जगात ख्रिश्चन आणि मुस्लिमांनंतर तीन नंबरची लोकसंख्या निधर्मी लोकांची आहे. त्यात Atheist, Agonist, Humanist, Freethinkers, Rationalists असे सगळे येतात. त्यात, Ex Muslim वर्ग वाढत आहे, आणि ख्रिश्चन धर्मीय नास्तिक (हा विरोधाभास आहे) खरं म्हणजे ख्रिश्चन धर्म सोडून आलेले नास्तिक यांची संख्या जास्त आहे. त्यांना Ex Christian म्हणलं जातं
(Ex Muslim वर्ग वाढत आहे.)
ख्रिश्चन धर्मावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि येशूची खिल्ली उडविणाऱ्या इंटरनेटवर हजारो साईट्स आहेत. फेसबुक ट्विटर इन्स्टाग्रामवर कित्येक पेजेस आहेत, की जी पोस्ट्स टाकण्याव्यतिरिक्त अनेक मिम्स अन कार्टून्स देखील बनवत असतात. तिथं बरीच डिबेट किंवा शाब्दिक चकमकी चालू असतात. पण दोन गोष्टी विशेष आहेत ज्या ते मिम्स आणि पोस्ट्स वरच्या कॉमेंट्स वाचताना सहज लक्षात येतात
पहिलं म्हणजे, “जरा मुस्लिमांवर पण बोला की” असला सल्ला देणारे क्युट लोक तिथे नसतात. ज्या धर्माला सोडून लोक आलेत (म्हणजे नास्तिक झालेत) त्या धर्माविषयीच ते बोलणार, हे तिथं गृहीतच धरलेलं असतं आपल्या बापाचं आणि आपलं पटत नाही म्हणून घर सोडून जाणारा पोरगा स्वतःच्या बापाविषयीच बोलणार, इतकं बेसिक नॉलेज तिथं सगळ्यांना असतं! त्यामुळं जरा मुस्लिमांवर बोला की, जरा यहुदींवर बोला की, असले उपटसुंभ सल्ले तिथं नसतात. (बाय द वे, हिंदू तर त्यांच्या खिजगणतीतही नसतात! कारण Ex Hindu नास्तिकांची संख्या जगाच्या तुलनेत नगण्य आहे.)
दुसरं म्हणजे, काही काही मिम्स आणि कार्टून्स इतके जहाल असतात की त्या तोडीचे कार्टून्स इथं जर कोणी (मुस्लिम तर सोडाच, पण) हिंदू धर्माविषयी जरी बनवले तरी त्याच्यावर धडाधड केसेस पडतील, किंवा राडे होतील. (अन म्हणे आपण सर्वात सहिष्णू !!)
मुस्लिमांच्यात नास्तिक बनणं खूप अवघड आहे. म्हणजे, मला म्हणायचंय, नास्तिक बनणं सोपं आहे, पण तसं दाखवणं किंवा डिक्लेअर करणं अवघड आहे. जरा डोळे उघडे ठेवून स्वतःची बुद्धी वापरणारा माणूस त्यांच्यात नास्तिक बनू शकतो, पण तसं दाखवू मात्र अजिबातच शकत नाही. कारण समाजात तर सोडाच पण त्याला त्याच्या घरातले लोक देखील नीट जगू देणार नाहीत.. आणि कुराणात तर इस्लाम सोडणाऱ्याला देहदंडाची शिक्षा फर्मावलीये ते वेगळेच.
जितका धर्म रिजिड असतो तितका सामाजिक दबाव जास्त असतो, आणि मुस्लिम कम्युनिटीत असलेल्या या सामाजिक दबावामुळेच स्वतःची बुद्धी वापरणारे कित्येक लोक गप्प राहणेच पसंत करतात. आतापर्यंत मला इनबॉक्स मध्ये येऊन किमान आठ ते दहा (मला माहितीये आकडा फारच कमी आहे तरीही,) मुस्लिम मुलामुलींनी ते नास्तिक बनत चालले आहेत, अशा अर्थाचं कथन केलं आहे. आमच्या धर्मातल्या अमुक प्रथा अजिबातच आवडत नाहीत, तमुक गोष्टी बंद व्हाव्यात असं वाटतं, इथपासून ते तुम्ही (Ex-hindu atheist) किती लकी आहात, तुम्ही उघडपणे बोलू तरी शकता, इथपर्यंतचं कथन असतं.. त्या लोकांचे फेसबुक प्रोफाइल पाहिले तर ते पानाफुलांवर फोटो टाकतील, इतर काहीही शेअर करतील पण अ-धार्मिक भूमिका ते उघडपणे घेऊ शकत नाहीत. असे कितीतरी छुपे नास्तिक त्यांच्यात असतील.
पण आता 2019 पासून एक नवी चळवळ जोर धरत आहे. नॉर्थ अमेरिकेतून सुरू झालेला awesome_without_allah हा ट्रेंड तिकडे ट्विटरवर खूपच ट्रेंडिंग आहे. तिथल्या दर चौथ्या मुस्लिम व्यक्तीने धर्म सोडला आहे. शांतीसाठी, प्रगतीसाठी आणि इज्जतीत जगण्यासाठी आम्ही असं करतोय हे बहुतांश जणांचं प्रतिपादन आहे. आता हे लोन जगातल्या वीसेक देशात पसरलेलं आहे. फेसबुक इन्स्टाग्राम वर Ex मुस्लिम किंवा “awesome without allah” असा सर्च करून पाहा. गुगल युट्यूब वर पण अनेक व्हिडीओ दिसतील, मुलाखती दिसतील, मिम्स दिसतील. (काहींच्या लिंक्स कॉमेंटस् मध्ये देतोय). असो..
खरंतर जागतिक निधर्मी लोकांच्या तुलनेत Ex Hindu लोकांची टक्केवारी खूपच नगण्य आहे, तरीपण नास्तिक लोक फक्त हिंदू धर्मातच तयार होतात, किंवा ते फक्त हिंदूंबद्दलच बोलतात, असा गैरसमज घेऊन अनेक ‘तुचीयम सल्फेट’ लोक वावरत असतात, त्यांच्या माहितीसाठी जग किती मोठं आहे आणि जगात काय काय चालू आहे याची कल्पना यावी म्हणून हा छोटासा लेखनप्रपंच आहे. बाकी अभ्यास ज्याचे त्याने करायचा आहे. अन ज्यांना फक्त गलका करत उरावरच बसायचे आहे त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काही नाही.
आपल्या घरातली लाईट गेली की, बाहेर जाऊन दुसऱ्याच्या पण घरातली लाईट गेलीय हे बघून खुश होणाऱ्या लोकांच्या देशात रहात असल्यामुळं मला माझ्या प्रत्येक नास्तिकतेबद्दलच्या लेखात हिंदूंच्या जोडीने मुस्लिमांबद्दलही बोलावं लागतंय. अन्यथा माझा त्या धर्माचा कसलाही अभ्यास नाही, आणि करायची इच्छा देखील नाही. असो..
जसं जसं सायन्स प्रगत होऊन अजून काही प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे, तसं तसं धर्मग्रंथातल्या बाबी अजूनच फोल ठरत जाणार आहेत, आणि त्यांच्याविषयीचा जिव्हाळा सुटत जाणार आहे. अन धर्म ही फक्त ‘राजकीय सोय’ राहणार आहे. ती पण काही दशकेच.
मानवाच्या 22 लाख वर्षांच्या उत्क्रांतीच्या इतिहासाच्या पडद्यावर आताच्या प्रचलित धर्मांचा दोन चार हजार वर्षांचा काळ म्हणजे केवळ एक ठिपका आहे. अशा अनेक संस्कृत्या काळच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. सध्याच्या धर्मांचं देखील हेच होणार आहे. काही धर्मातले लोक स्वतःहून ट्रांसफॉर्म होत सुधारतील तर काहीं बदलू न शकणारे नामशेष होतील.. आणि हे असं देखील लगेच पाच पन्नास वर्षांत होत नसतं. यालाही काही दशकं कदाचित शतकं लागतील, त्यात काही पिढ्या होरपळूनही निघतील.
सध्याची धार्मिक विद्वेषाची परिस्थिती बघता, दिवा विझण्याआधी फडफडतोय असं म्हणायला हरकत नसावी.
????7219017700????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत