धाराशिव जिल्ह्याचा इतिहास पँथर यशपाल सरवदे यांच्या नावाशिवाय अपूर्ण.. – ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार


झुंजार पँथर, आंबेडकरी चळवळीचे -रिपाइ चे ज्येष्ठ नेते व विचारवंत, नागबोधि रिसर्च सेंटर नागेशनगरी धाराशिव चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत स्मृतिषेश यशपालजी सरवदे यांचा प्रथम स्मृतिदिन परिमल कार्यालय धाराशिव येथे संपन्न झाला.
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत व सतत 45 वर्षे ज्यांची कविता माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाते असे रोखठोक स्पष्टवक्ते साहित्यिक आदरणीय ज. वी. पवार यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडलेल्या कार्यक्रमास सरवदे व नागबोधी परिवारासह RPI आठवले गटाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, लातूर चे प्रतिभावान साहित्यिक आयु. प्रा. सुरेश वाघमारे सर, प्राचार्य कमलाकर कांबळे, आयु. राजाभाऊ ओहाळ, आंबेडकरी चळवळीचे नेते आयु. मोहन माने, पुरातत्व अभ्यासक आयु. रवींद्र शिंदे सर, साहित्यिक विजय गायकवाड यांच्यासह यशपाल सरवदे यांच्याबद्दल आदर स्नेह असणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आदर्शाचे पूजन व “पँथर यशपाल सरवदे” या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आयु सुषमा ताई यशपाल सरवदे यांनी प्रास्ताविक करत सरवदे परिवाराच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली.
The people’s post या पाक्षिकाचे संस्थापक, पत्रकार आयु. चेतन शिंदे यांनी त्यांच्या जीवनात यशपाल जी सरवदे यांचे किती मोलाचे योगदान आहे ते सांगितले. ऐन तारुण्यात संकटांशी सामना करताना यशपालजी सरवदे भक्कम आधार बनून पाठीशी उभे होते म्हणून प्रगती करू शकलो असे सांगितले.
RPI चे राज्य सरचिटणीस आयु. गौतम सोनवणे यांनी पक्षाच्या वतीने आदरांजली वाहिली.
आयु. प्रीती ताई यशपाल सरवदे यांनी वडिलांच्या आठवणी सांगताना परिवाराचे डोळे भरून आले होते. व्यवस्थेशी निकराची झुंज देताना भक्कम वाटणारे पँथर परिवारात मात्र किती प्रेमळ, काळजीवाहू आणि मैत्रीपूर्ण होते ते सांगितले.
आयु. सुदेश माळाळे यांनी नागबोधी रिसर्च सेंटर बद्दल यशपालजींची ओढ आणि दूरदृष्टी सर्वांसमोर ठेवली. यशपालजिंचे स्वप्न असलेली संस्था सांभाळण्याची व प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे असं त्यांनी सांगितलं.
आयु. पृथ्वीराज चिलवंत यांनी उत्तम मार्गदर्शक या भूमिकेतले यशपालजी सरवदे समजावून सांगितले. सामाजिक प्रश्नांवर बोलता लिहिता चर्चा करता यावी यासाठी यशपालजी यांनी नेहमीच खूप फायदेशीर मार्गदर्शन केले आहे. नाग बोधी रिसर्च सेंटर चे काम करताना यशपाल जी सोबत असल्याचे समाधान वाटते असं संगितल.
ऍड. राज कुलकर्णी यांनी एका दिलदार मित्राच्या भूमिकेतले यशपालजी सांगितले तर प्राचार्य आयु. कमलाकर कांबळे सरांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण, संगठन कौशल्य इत्यादी बाबींचा सविस्तर उल्लेख केला.
लातूर हून आलेले प्रा. सुरेश वाघमारे सर यांनी समाज एका झुंजार पँथर कडून अपेक्षित अशी प्रेरणा घेण्यास असमर्थ दिसत आहे अशी खंत व्यक्त केली. मराठवाड्याचा इतिहास यशपाल सरवदे यांच्या शिवाय अपूर्ण राहिल, कुठे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेणारे यशपालजी आणि कुठे आजचे शांत झालेले कार्यकर्ते ..! तो दरारा परत निर्माण करण्याची गरज आहे तीच यशपाल सरवदे यांना आदरांजली राहील असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार म्हणाले की, माझ्या लेखनात आंबेडकरी चळवळ लिहिताना मराठवाड्यातील बरेच उल्लेख आलेले आहेत. यशपाल जी सरवदे हे माझ्या गटाचे नव्हते पण माझ्या विचारांचे होते. ते जेंव्हा भेटत तेंव्हा कधीच असं वाटलं नाही की वेळ वाया गेला, उलट माझ्या आवडीचे विषय म्हणजे बुध्द लेण्या व आंबेडकरी चळवळ यावर आमची विस्तृत चर्चा व्हायची. बाबासाहेबांनी पहिला लढा पाण्यासाठी केला कारण “समता” हा पाण्याचा गुणधर्म आहे ती समता बाबासाहेबांना समाजात आणायची होती आणि त्यासाठी यशपाल सरवदे यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. मराठवाड्यात ज्ञानाचा अंधार होता म्हणून बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय काढल त्याच पद्धतीने बौद्ध धम्मा बद्दल चे अज्ञान दूर करण्यासाठी यशपाल जी सरवदे यांनी नाग बोधी रिसर्च सेंटर सारखी संस्था स्थापन केली. ही संस्था वाढली पाहिजे, विकसित झाली पाहिजे हे आता आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे असं त्यांनी अधिकार वाणी ने सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. उत्कर्षाताई चिलवंत यांनी तर आभारप्रदर्शन प्रीती ताई यशपाल सरवदे यांनी केले. सर्वांना स्मरणिकेचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
अशा या प्रखर बुद्धिवादी, धम्म प्रेमी, चिकित्सक अभ्यासू, कणखर आणि तितक्याच हळव्या मनाच्या पँथर ला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली ..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत