महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- ३/१०/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ४३
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
२) आचार स्वातंत्र्य = आचार म्हणजे आचरण; स्वतः कडून केली गेलेली कृती; कर्म किंवा काम.तसेच आपले वर्तन होय.हे आपल्या काये मार्फत केले जाते.
१९ व २० मार्च १९२७ रोजी महाड सत्याग्रह परिषद भरली होती तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला मार्गदर्शन करताना म्हणतात की; आचार विचार व उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रूजणार नाही.
मनुवादी ब्राम्हणी मनुस्मृतीने शुद्र व अतिशुद्र समाजावर कामाचे निर्बंध लादलेले होते.निकृष्ठ दर्जाची कामे त्यांच्या वाट्याला आली होती.असे म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर ती लादलेली गेलेली होती. म्हणजे त्यांना शिक्षक; प्राध्यापक; इंजिनिअर; वकील; न्यायाधीश कमिशनर कलेक्टर इत्यादी उच्च प्रतीची काम करण्यास मनुस्मृती नुसार बंदी होती.जर उच्च प्रतीची कामे लोकांना करण्याचे स्वातंत्र्य नसेल किंवा आवडीचे काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर ते आपल्या जीवनात प्रगती कसे करू शकतील.यावरून मनुवादी ब्राम्हणी व्यवस्था ही विषमतावादी आहे.ती प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्याची संधी नाकारते.म्हणजे समता नाकारते.परंपरेने चालत आलेला जातीचा व्यवसाय म्हणजे एकप्रकारचा कोंडवाडा आहे.त्याची इच्छा असून सुद्धा तो जर कुंभार असेल तर त्याला सोनार होता येणार नाही.किंवा सोनार जात त्याला सोनार होण्यासाठी मदत करणार नाही.किंवा त्याला डॉक्टर; इंजिनिअर ;वकील; न्यायाधीश ;कमिशनर ; कलेक्टर होता येणार नाही.म्हणजे जातीव्यवस्थेच्या माध्यमातून जातीची मक्तेदारी निर्माण झाल्यासारखेच आहे.किंवा दुसऱ्या अर्थाने मनुस्मृती नुसार जातीचे काम करणे हे एकप्रकारे शिक्षा दिल्या सारखे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाने आपल्या उद्देशिकेत दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची खात्री दिली आहे. जी मनुवादी ब्राम्हणी जातीव्यवस्थेने नाकारली होती.
संविधान अनुच्छेद १६ (१) या मध्ये राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस कामाची समान संधी असेल.
संविधान लोकांच्या रोजगार म्हणजे कामा बाबत अनुच्छेद ३८;३९;४०;४१;४२;४३;४५;४६;४७ मध्ये तरतूद करुन ठेवली आहे.म्हणजे भारतीय नागरिकांना त्यांच्या कामाबाबतच्या स्वातंत्र्याची एकप्रकारे संविधानाने हमी दिली आहे.
एक मानव म्हणून आपला स्वतंत्र रित्या विकास करताना त्याचे आचरण सुद्धा चांगले असले पाहिजे.दोन माणसं एकत्र आली की; नितिमत्तेची आवश्यकता निर्माण होते.म्हणजे आपण घरी असू किंवा आपल्या उद्योग धंद्याच्या ठिकाणी असु आपण माणूस म्हणून दुसऱ्या बरोबर जगताना सामाजिक नीतीमत्तेचे आचरण करणे भाग आहे.माणूस म्हणून आपल्या मनाला सुसंस्कारी बनवण्याची जबाबदारी आपलीच आहे.
आज देशात आरक्षणाला विरोध करून मागासवर्गीय हिंदू (ओबीसी; एससी; एसटी: एनटी; एसबीसी) व बौद्ध यांची संविधानाच्या माध्यमातून झालेली प्रगती हिंदू धर्मातील उच्च जातीचे मनुवादी जात दांडगे व जाती श्रेष्ठत्वाचा गंड झालेले लोक यांना सहन होत नसल्याने ते विरोध करताना दिसत आहेत.म्हणजे आरक्षण मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी ;एनटी ;एसबीसी व बौद्ध यांना जे मिळाले आहे ते जातीव्यवस्थेमुळे मिळाले आहे.त्यांच्या केवळ आर्थिक मागासलेपणा मुळे मिळालेले नाही.तसेच आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाही हे सिद्ध होते.तर हा समाज सामाजिक; शैक्षणिक; आर्थिक; सांस्कृतिक दृष्ट्या मनुवादी ब्राम्हणी व्यवस्थेने गुलाम केलेला समाज होता म्हणून आरक्षण मिळाले आहे.कारण मनुवादी ब्राम्हणी जातीव्यवस्था त्यांना हक्क; अधिकार; स्वातंत्र्य नाकारते.म्हणून जो पर्यंत मनुवादी जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षण कायम लागू रहाणार आहे. आज देशात मनुवादी व्यवस्था डोके वर काढून लोकांचे संविधानिक हक्क अधिकार स्वातंत्र्य पायदळी तुडवत आहे हे दिसत आहे.
परंतू संविधान व हिंदू धर्माची जातीव्यवस्था व तिचे दुष्परिणाम या बाबत मागासवर्गीय हिंदू हा अज्ञानी असल्याने तसेच देव सगळ करतो; रूढी; परंपरा; कर्मकांड; उपास;तापास या गोष्टींमध्ये अडकला असल्याने त्याला आपला खरा शत्रू कोण हेच माहित होत नाही.त्याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान या बाबत बहुजन समाजात चुकीचा प्रचार करून जो समाज आरक्षणाचा लाभार्थी आहे.त्यालाच आरक्षणाला विरोध करण्यासाठी वापरले जाते.यावरून हे लक्षात येते की; मागासवर्गीय हिंदू मधील जे लोक शिक्षण घेऊन सुधारले आहेत त्यांनी आपल्या बांधवांना मनुवादी जातीव्यवस्था;आरक्षण व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्धल सत्य माहिती सांगितली पाहिजे.
या मनुवादी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या पक्षांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षांत लोकांनी लोकांची लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही ही लोकांची न ठेवता मनुवादी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांची बटीक बनवली.आरक्षणामुळे मागासवर्गीय हिंदू सह बौद्ध समाज प्रगती करत आहे.जर यांची प्रगती अशीच होत राहिली तर एक दिवस हे आम्हाला म्हणजे मनुवादी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांना राज्य करू देणार नाहीत.म्हणून त्यांनी मागासवर्गीय हिंदूंना धर्माच्या दावणीला सन १९९१ पासुन बांधण्यास सुरुवात केली.मागसवर्गीय हिंदू व बौद्ध मराठा व ओबीसी धनगर व आदिवासी अशी भांडणे लावून भांडवलशाही व ब्राम्हणशाही राजरोसपणे राज्य करत आहे.त्या बरोबर ठेकेदारी लागू करून वेतनाची कपात केली.त्यामुळे मागासवर्गीय हिंदू सह बौद्ध हे गेल्या १९९१ सालापासून आपल्या मुलांना शिक्षण व आईवडील यांना चांगले आरोग्य यांची सोय उपलब्ध करून देवू शकत नाहीत.
हे सर्व घडण्याचे कारण काय आहे? तर आम्ही आमचे मत दारु; बिर्याणी; पाचशे; हजार;दोन हजार;पाच हजार रुपयांना विकतो.आणि मनुवादी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांना परवाना देतो की तुम्ही आमचे पाहिजे तेवढे वाटोळे करा.आमच्यावर अन्याय अत्याचार करा.आमची पाहिजे तेवढी पिळवणूक करा. कारण आम्ही हजारो वर्षांचे तुमचे गुलाम आहोत.गुलामी म्हणजे आमच्यासाठी गुलाब जाम आहे. आम्हाला लोकशाही समता; स्वातंत्र्य; बंधुत्व व न्याय काय भी नको.आम्हाला शिक्षण म्हणजे शिक्षा वाटते.चांगली नोकरी म्हणजे माज वाटतो.आम्ही तुम्ही दिलेल्या तुकड्यावर जगणे याला स्वाभीमान समजतो.
म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत