
नमो बुध्दाय जयभिम !
बौद्ध बांधवांचा सर्वात मोठा सण/उत्सव /मंगलदिन हा धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोकाविजयादशमी आहे. यावेळेस अशोकाविजयादशमी येत्या दिनांक १२ ऑक्टोबर (शनिवार) रोजी आहे. देश विदेशातील प्रत्येक बौद्ध बांधव यांच्या घरी ,बुद्ध विहारात,बुद्ध लेण्यांवर आदी. ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे व मांगल्याचे वातावरण दिसून येत आहे. कारण या मंगल दिनी बौद्ध शासक, महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला आहे.बौद्ध धम्मातील अशोकाविजया दशमी या मंगल दिनाचे महत्व लक्षात घेवून आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः सहपरिवार पुज्य. भन्ते चंद्रमणी महास्थविर महाथेरो यांच्या हातून बौद्ध धम्माची दिक्षा दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घेतली. व त्यानंतर आठ लाखापेक्षा अधिक जनसमुदायाला सामुहिक बौद्ध धम्माची दिक्षा दिली. ही घटना या भूतलावरील मानवी इतिहासाला कलाटणी देणारी ठरली असून बौद्ध जगातील सर्वात मोठी व महान धम्मक्रांती आहे. याच दिनाचे स्मरण करून दरवर्षी लाखो लोक दरवर्षी भिम अनुयायी नागपूरच्या दिक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. परंतु,ज्या भिम अनुयायी यांना प्रत्येक वर्षी नागपूरला जाणे शक्य नसते ते बुद्धलेणीवर व बुद्ध विहारात जावून धम्मदिक्षा सोहळा सार्वजानिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्याचसोबत प्रत्यक्ष स्वतःच्या घरी देखील विविध कार्यक्रम आयोजित करतात. खऱ्या अर्थाने हा दिवस म्हणजे… झाले गुलाम मोकळे ,भिमा तुझ्या जन्मामुळे … असे महाकवी वामन दादा कर्डक यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे आपल्याला माणूस म्हणून मानवी अधिकार प्राप्त झाला. या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्मातील महान सर्वश्रेष्ठ तिन रत्न म्हणजे बुद्ध,धम्म,संघ देवून सोबतच पंचशील व २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी बौद्ध धम्माचा स्विकार करते वेळी बाबासाहेब म्हणतात ,आज माझा नवा जन्म होतो आहे असे मी मानतो. आणखी पुढे बाबासाहेब म्हणतात,मी सारा भारत बौद्धमय करेन .याचा अर्थ आपण विस्तृत समजावून घ्यायला पाहिजे.की ,बाबासाहेब आंबेडकर यांना असे म्हणायचे आहे की,या भारत देशातील बुद्धभूमीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. परंतु,यासाठी बौद्ध धम्माच्या सर्व अनुयायी यांनी धम्म संस्कृतीचा अंगीकार काया,वाचा व मनाने पालन करणे हे आपल्या सर्वांचे प्रमुख सांघिक ध्येय असलेच पाहिजे. आपल्याला आता बौद्ध धम्म दीक्षा स्विकारुन ६८ वर्षे पूर्ण होत आहे. या दिवशी प्रत्येकाने स्वतः चिंतन मनन करून स्वतः ची व परिवाराची धम्मामध्ये किती प्रगती केली याचे याविषयी विचार केला पाहिजे. तसेच धम्मसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी हा धम्मदिक्षा स्विकार दिवस आपण नेमका कसा साजरा करावा यासाठी बौद्ध अनुयायीसाठी काही खालील
२४ मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. त्याच नक्कीच आपणांस सर्वाना मार्गदर्शक म्हणून निश्चित उपयोगी ठरतील असे वाटते.
१) घर व घराबाहेरील परिसर स्वच्छ करणे
२)घराला रंगरंगोटी करणे
३)आकर्षक पूजास्थान सजवणे
४)घरावर पंचशील ध्वज लावणे
५)घरामध्ये खाण्यासाठी गोड धोड पदार्थ बनविणे
६)दारांसमोर रांगोळी काढणे
७)सकाळी ५ वा. परिवारातील सर्व सदस्यांनी उठणे .सर्वानी नवीन कपडे परिधान करावे. बुद्ध विहारात जाताना पांढरे कपडे परिधान करणे
८)सकाळी ७ ते ८ वेळेत बुद्ध वंदना घेणे
९)दुपारी १२ ते १ दरम्यान सर्वानी एकत्र भोजन घेणे
१०)२२ प्रतिज्ञाचे वाचन करणे
११)संपूर्ण दिवसभर श्रद्धापूर्वक पंचशील पालन करणे
१२)ध्यान करून मंगल मैत्री देणे
१३)बुद्ध वंदना संपन्न झाल्यानंतर शेजारी लोकांना खिरदान करणे
१४)गरीब मुलांना मिठाई,कपडे किंवा शालेय साहित्य वाटप करणे
१५)नातेवाईक व धम्म बांधवाना घरी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे
१६)सकाळी व सायंकाळी १० मिनिटे बुद्ध धम्म संघ या त्रिरत्ना बरोबरच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुणांचे स्मरण करणे
१७)धम्मगुरु भंतेजी,शिक्षक,आईवडील व वडीलधारी व्यक्तीचा अभिवादन करून आशीर्वाद घेणे
१८)बौद्ध साहित्य ,वंदनेचे पुस्तके,धम्मग्रंथ दान स्वरूपात मोफत वितरित करणे
१९)सर्व प्रकारच्या अकुशल कर्मापासून स्वतः दूर ठेवून कुशल कर्माकडे नेण्याचा दृढ संकल्प करणे
२०)बौद्द भिक्खूना भोजनदान,चीवरदान,औषधदान,फलाहारदान व आर्थिक दान आदी. देणे
२१)बौद्ध विहारात सहपरिवार जावून धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे
२२)श्रामणेशिबिरातील श्रामणेर संघाला भोजनादानासाठी घरी आमंत्रित करून भोजनदान करणे.
२३)बुद्धविहार,बुद्ध लेणीवर होणाऱ्या कार्यक्रमात तन मन धन देवून प्रत्यक्ष सहभाग घेणे
२४)बौद्द धम्माचा प्रसार प्रसार करणाऱ्या भिक्खू संघ व उपासकांच्या विविध धार्मिक संघटना,प्रचारक आदी. धम्मप्रचार प्रसारासाठी आर्थिक सहयोग करणे .
शब्दांकन-आयु. मिलिंद उद्धवराव बनसोडे (बौद्धाचार्य)
धम्मप्रशिक्षक विपश्यना धम्मसंडे स्कुल,नाशिक
मो. ९९६०३२००६३
*धम्म संदेश प्रसारक*
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत