कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

संविधानभाव आणि संविधान संस्कृती -डॉ. अनंत दा. राऊत

संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाजातील विचारवंत, साहित्यिक, गीतलेखक गायक संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, नाटककार, अभिनेते ,चित्रपट निर्माते इत्यादी कलावंत फार महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावू शकतात. हे सारे कलावंत भारतीय संस्कृतीचे संविधानवादी जीवनदृष्टीतून निरीक्षण करु लागले तर त्यांच्या हे लक्षात येईल की भारतीय संविधानामध्ये प्रजासत्ताक भारताला नवी आदर्श अशी संस्कृती देण्याची खूप मोठी वैचारिक व मूल्यात्मक ऊर्ज आहे; परंतु ही उर्जा गेल्या सात दशकांमध्ये गंभीरपणे कोणीही वापरलेली नाही. त्यामुळे या दिशेने काम करण्याचा प्रचंड मोठा बॅकलॉग शिल्लक आहे हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सर्व प्रकारच्या कलावंतांनी पुढे येणे फार गरजेचे आहे. आपापल्या कलांमध्ये संविधानवादी आहेआशय आणि जीवनमूल्ये भरून सर्व कलांचा जाणीवपूर्वक विकास केला गेला तर भारतामध्ये संविधान संस्कृती विकसित होऊ शकते; आणि हीच संविधान संस्कृती भारतीय माणसांच्या मनातील संविधानभाव वृद्धिंगत करू शकते.
मानवी मनातील नैसर्गिक भावांमध्ये दुःख भाव, आनंदभाव किंवा हर्षभाव, प्रेमभाव, क्रोधभाव, क्रोधातूनच उद्भवणारा द्वेष भाव किंवा मत्सरभाव, कामभाव, लोभभाव, इर्षाभाव, असूयाभाव, निराशाभाव, उदासीनता भाव, आशावादीभाव,अहंभाव, न्यूनगंडभाव इत्यादी भावांचा नैसर्गिक भावस्थितींमध्ये समावेश करावा लागेल. वरील प्रकारच्या भावस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी गेलेला असतो. जीवन जगत असताना व्यक्तीला ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रकारचे अनुभव येतील त्या त्या भावस्थितीमध्ये व्यक्ती जात असते त्या अनुभवामध्ये बदल होतच त्या भावस्थितीमधून बाहेरही येत असते. परंतु काही वेळच्या भावस्थितीमध्ये तो इतका व्याकूळ तो इतका हर्षभरित होतो की त्याला त्या भावनेचा आविष्कार केल्याशिवाय राहवत नाही. नव्हे त्याच्या मनातील ती भावना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तुडुंब भरलेली विहीर जशी आपोआप वाहू लागते त्याप्रमाणे त्याच्या मनातील भावना देखील शब्द रूप घेऊन आपोआपवाहू लागतात. मानवी मनात तुडुंब भरलेल्या व ओसंडून वाहू पाहणाऱ्या भावनांना जी व्यक्ती शब्दरूप देऊ शकते तीच उत्तम कविता निर्माण करू शकते. अशी कविता ही विशुद्ध भावकविता असते. त्या कवितेतून प्रकट होणारा भाव कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. असा भाव प्रामुख्याने व्यक्तिगत पातळीवरचा असतो. अशा व्यक्तिगत पातळीवरचा भावाविष्कार करणारे काव्यच आधुनिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिहिले गेलेले दिसेल.
वैराग्यभाव हादेखील एक व्यक्तिगत पातळीवरचा महत्त्वपूर्ण भाव आहे. ज्याच्या मनामध्ये वैराग्यभाव निर्माण होतो तो व्यक्ती सर्व प्रकारच्या लौकिक लोभ भावनांपासून मुक्त झालेला असतो. असा व्यक्ती बहुतांशाने व्यक्तिगत पातळीवरील अध्यात्म साधना करत राहतो. विशिष्ट प्रकारच्या अध्यात्मसाधनेतील आनंद मिळवणे हेच त्याचे ध्येय असते. वैराग्य भावामध्ये वावरणारी सर्व माणसे काव्य निर्मिती करू शकतीलच असे नाही. परंतु वैराग्य प्राप्त झालेल्या काही संतांनी मात्र भक्तीभावाचा अविष्कार करणारी काव्य निर्मिती केलेली दिसते. भक्तिभाव हा देखील व्यक्तिगत पातळीवरचाच असतो. वैराग्यभाव प्राप्त झालेल्या बहुतांश व्यक्ती सर्वसंगपरित्याग करतात आणि अशा व्यक्तींमधील काही प्रतिभावंत व्यक्ती मानवाला मूलगामी असे तत्वज्ञानही देऊन जातात. उत्तुंग अशा मानव निष्ठेतून व राष्ट्रनिष्ठेतून देखील काही व्यक्तींना वैरागी स्थिती प्राप्त होऊ शकते. अशी

भावस्थिती प्राप्त झालेल्या व्यक्ती जगातील मानवासाठी अथवा त्यांच्या राष्ट्रासाठी काही मूलगामी गोष्टी नक्कीच देऊन जात असतात.
मानवाला वरील प्रकारच्या नैसर्गिक भावस्थितीबरोबरच इतर प्रकारच्याही काही भावस्थिती प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ विशिष्ट घटकावरील श्रद्धाभाव किंवा निष्ठाभाव. अशाप्रकारचे भाव विशिष्ट संस्कारातून निर्माण होत असतात. ते मानवी मनामध्ये उपजतच असतात असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ विशिष्ट देव धर्मावरील अथवा देशावरील श्रद्धा भाव किंवा निष्ठाभाव, विशिष्ट परंपरेवरील श्रद्धा भाव अथवा निष्ठाभाव. व्यक्तीच्या सभोवताली ज्या प्रकारचे सांस्कृतिक वातावरण असते तशा प्रकारचा व्यक्तीचा श्रद्धाभाव किंवा निष्ठाभाव तयार होत असतो. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक वातावरण हे नैसर्गिक नसते; तर मानवनिर्मित असते. काही लोकांनी असे संस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक संस्कारात्मक स्वरूपाचे प्रयत्न केलेले असतात. आशा संस्कारांमधूनच हिंदू संस्कृती, बौद्ध संस्कृती, जैन संस्कृती, शीख संस्कृती, ख्रिस्ती संस्कृती, इस्लामी संस्कृती इत्यादी संस्कृती निर्माण होत असतात. त्या सांस्कृतिक वातावरणामध्ये जन्मास आलेल्या व त्याच वातावरणात वाढलेल्या लोकांमध्ये ते ते विशिष्ट असे श्रद्धाभाव किंवा निष्ठाभाव तयार होत असतात. असे भाव आपोआप तयार होत नसतात तर ते एका विशिष्ट अशा संस्कार यंत्रणेद्वारे जाणीवपूर्वक तयार केले जात असतात. अशा प्रकारे जाणीवपूर्वक तयार केलेल्या श्रद्धाभावनेमध्ये अथवा निष्ठा भावनेमध्ये जगातील बहुतांश सामान्य लोक वावरत असतात. अशा लोकांना विशिष्ट असा आपापला भाव हाच नैसर्गिक भाव आहे असे वाटत असते. कसा श्रद्धाभाव अथवा निष्ठाभाव जोपासण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. जेव्हा विशिष्ट धर्म संस्कृतींनी निर्माण केलेले श्रद्धाभाव अथवा निष्ठाभाव परस्परांच्या विरुद्ध उभे राहून हिंसक कृती करू लागतात तेव्हा माणसामध्ये असलेला नैसर्गिक असा मानव्य भाव जळून जातो. मग माणूस हा माणूस राहात नाही तर विशिष्ट धर्म संस्कृतीवरील अतिरेकी श्रद्धाभावाने पिसाट झालेला पशू बनतो. असल्या श्रद्धातिरेकी पिसाट पशूंनी जगातील मानवतेला यापूर्वी असंख्य वेळा घायाळ केलेले आहे. आजही अशा पिसाट पशूंची संख्या जगामध्ये भरपूर प्रसंमाणात आहे. कोणत्याही सांस्कृतिक घटकावरील अतिरेकी श्रद्धाभाव हा मानवतेसाठी घातकच असतो. तो मानवतेसाठी घातक असतो तसाच उदात्त अशा मानवी मूल्यांच्या पायावर नवे राष्ट्र घडवण्याच्या संदर्भातही घातकच ठरत असतो.भारत भूमीमध्ये असलेले विशिष्ट प्रकारच्या धर्म संस्कृतीवरील अतिरेकी श्रद्धाभाव हे नव्या काळातील आदर्श असे सेक्युलर राष्ट्र निर्माण करण्यामध्ये अडथळे आणत राहिलेले आहेत. आजही अशा प्रकारचे विशिष्ट धर्म संस्कृती वरील श्रद्धाभाव आजही भारताचे सेक्युलर, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतावादी, बुद्धीवादी व विज्ञानवादी नवराष्ट्र घडवण्यामध्ये खूप मोठे अडथळे निर्माण करतात. म्हणून नवसंस्कृतीच्या निर्मात्यांनी विशिष्ट धर्म संस्कृती वरील अतिरेकी श्रद्धाभावाचे टोक बोथट करून त्या व्यक्तिगत श्रद्धा भावाला सौम्य करण्यासाठी व सेक्युलर स्वरूपाचा नवराष्ट्रभाव गडद करण्यासाठी संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये संविधानभाव पेरणारे व तो खोलवर रुजवणारे एक विशाल असे सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करण्याची गरज आहे. असे विशाल स्वरूपाचे सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करण्याचा कुणी आजवर फारसा गंभीरपणाने विचार केलेला दिसत नाही;आणि त्या दिशेने ठोस अशा कृती ही केलेल्या दिसत नाहीत. अशा कृती केलेल्या नसल्यामुळे भारतातील संस्कृतीचे डबके बनलेले आहे. संस्कृतीचा खळाळता प्रवाह खंडित झालेला आहे. संस्कृतीची जुनाट झालेली पाने आपोआप गळून पडण्याची गरज असते; परंतु विशिष्ट संस्कृतिक डबक्यात राहण्यातच धन्यता मानणारे लोक त्या जुनाट झालेल्या पानांना गळून पडू न देता त्यांचीच जिवाचा आटापिटा करून जपणूक करतात. अशी जपणूक करणे म्हणजेच संस्कृतीची जपणूक करणे असे त्यांना वाटते. त्यामुळे भारतीय संस्कृतीला नवे नवे धुमारे फुटत नाहीत. भारतीय साहित्य आणि संस्कृतीला नवे नवे धुमारे फोडणसाठीच भारतीय माणसांच्या मनामध्ये संविधानभाव सातत्यपूर्ण रीतीने पेरण्याची गरज आहे. संविधानभाव ह कुठला व्यक्तिगत भाव नसून तो एक राष्ट्रभावच आहे. संविधानभाव हा लोकमनामध्ये जाणीवपूर्वक निर्माण करावा लागतो. त्यासाठी फार मोठी सांस्कृतिक यंत्रणा राबवावी लागते. संबिधानभाव संकुचित अशा जात धर्मनिष्ठ भावाला व भाषा प्रांतनिष्ठ भावाला देखील अत्यंत सौम्य बनवणारा असेल. संविधानभाव हा समग्रजननिष्ठ अशा समताभावाला गडद करणारा असेल. संविधानभाव हा संकुचित नसून व्यापक असतो, अतिरेकी नसून सहिष्णू , उदारमतवादी, सर्वसमावेशक असतो तसाच तो कारुणिक असतो.मानवी जीवनाच्या वाटचालीमध्ये जो मानवी समूह सर्वाधिक दुबळा राहिला किंवा जाणीवपूर्वक दुबळा ठेवला गेला अशा मानवी समूहांच्याकडे सर्वाधिक आत्मीयतेने पाहणारा व त्या समूहांना त्यांचे मानवी अधिकार अग्रक्रमाने बहाल केले पाहिजेत असे मानणारा असतो. संविधानभाव हा भगिनीबंधुत्वभाव असतो, न्यायभाव असतो, मानवताभाव असतो, स्वतंत्रताभाव असतो, सेक्युलरभाव असतो, बुद्धिवादी व विज्ञानवादी भाव असतो, सहकार भाव असतो,सेवाभाव आसतो, नि:स्पृहताभाव असतो. संविधानभाव हा जगातील समग्र मानवतेला आत्मीयतेने व प्रेमभराने कवटाळू पाहणारा असतो. संविधानभावाने प्रेरित झालेल्या मनाला जीवन जाणिवेच्या संदर्भात कुठल्याही संकुचिततेच्या मर्यादा बंदिस्त करू शकत नसतात.अशा प्रकारच्या संविधानभावाने प्रेरित झालेला कवीच संविधानवादी काव्याची निर्मिती करू शकतो.
वरील सारे विवेचन करून झाल्यानंतरही कृत्रिम रीतीने संविधानभावाची निर्मिती कशी काय करता येऊ शकेल?असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच निर्माण होऊ शकेल. या प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून आणखी काही विवेचन करणे आवश्यक आहे. या आधीच सांगितले आहे की काही भावना नैसर्गिक असतात तर काही भावना जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या विशिष्ट अशा सांस्कृतिक वातावरणात निर्माण होत असतात. ईश्वर ही एक मानवाने निर्माण केलेली सांस्कृतिक संकल्पना आहे. ईश्वर ही कुणी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली व्यक्ती नाही. त्यामुळे अशा व्यक्तीने मानवी जीवनात कधीच, कुठेच प्रत्यक्ष हस्तक्षेप केल्याचे आढळत नाही. असे असले तरी इतिहासकाळात जनमानसावर खूप मोठा प्रभाव टाकणाऱ्या अशा काही व्यक्ती होऊन गेल्या की त्या व्यक्तींनी कल्पित अशा ईश्वर संकल्पनेचा आधार घेऊन किंवा ईश्वर संकल्पनेच्या आड उभे राहून आपल्या जीवनविषयक भूमिका मांडल्या. काही व्यक्ती मी स्वतः ईश्वराचा अवतार आहे असे म्हणाल्या, काही व्यक्ती मी ईश्वराचा पुत्र आहे असे म्हणाल्या तर काही व्यक्ती मी ईश्वराचा दूत आहे असे म्हणाल्या. मी ईश्वर नाही, ईश्वराचा अवतार नाही, ईश्वराचा पुत्र नाही किंवा ईश्वराचा दूतही नाही तर मी माणूस आहे. एक माणूस म्हणून मला या विश्‍वाबद्दलचे, मानवी जीवनाबद्दलचे व सजीव सृष्टीबद्दलचे हे हे ज्ञान झालेले आहे. ते ज्ञान मी तुम्हाला एक माणूस म्हणून देतो. या ज्ञान मार्गाने तुम्ही जर वाटचाल केली तर तुमचे कल्याण होईल. अशी भूमिका फक्त तथागत बुद्धांनी मांडलेली दिसते. बाकीचे सारे हे मी माझ्या पदरचे सांगत नसून मी ईश्वर, अल्ला किंवा गॉडचा संदेश घेऊन आलेलो आहे असेच म्हणतात. माझा असा तर्क आहे की ईश्वर संकल्पनेचा आधार घेणाऱ्या या लोकांना स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नसावा. मी एक माणूस म्हणून मला अवगत झालेल्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे व आचरण मार्गाचे हे हे संदेश तुम्हाला देत आहे; असे हे लोक का म्हणत नाहीत? मी एक माणूस म्हणून मला अवगत झालेले जीवन संदेश लोकांना सांगितले तर लोक माझे ऐकणार नाहीत; परंतु ईश्वर अल्ला, गॉड या संकल्पनांचा आधार घेऊन माझे विचार सांगितले तर लोक नक्कीच ऐकतील असे त्यांना वाटले असावे म्हणूनच त्यांनी आपले जीवन संदेश देण्यासाठी ईश्वर संकल्पनेचा आधार घेतला. अशा प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पुरुषांनीच ईश्वर संकल्पनेचा आधार घेतलेला असल्यामुळे वेगवेगळे नामाभिधान घेऊन वावरणाऱ्या ईश्वर संकल्पना जनमयुगीावर प्रचंड मोठा पगडा आहे. ईश्वर ही संकल्पना अत्यंत प्रतिष्ठा पावलेली संकल्पना आहे. जगातील बहुतांश सामान्य लोक ईश्वर संकल्पनेच्या दबावात किंवा दहशतीत वावरतात. ईश्वराचा आपल्यावर कधीही कोप होता कामा नये. ईश्वर आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे. आपल्याला ईश्वराचे सान्निध्य लाभले पाहिजे. ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. ईश्वर सान्निध्यएवढे व ईश्वराच्या प्राप्तिएवढे दुसरे कुठलेही महान सुख असू शकत नाही. म्हणून या ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी ईश्वरा तू फार महान आहेस किंवा अल्ला तू फार महान आहेस असे वारंवार म्हटले पाहिजे. त्याच्या अगाध लीलांचे सतत गुणगान गायले पाहिजे. त्याचे सतत नामस्मरण केले पाहिजे. त्याची पूजा केली पाहिजे. अनेकविध पद्धतीने त्याची आराधना केली पाहिजे. असे जवळजवळ सर्वच धर्म संस्थांचे पुढारी लोक सांगतात. त्यांच्या अशा या वारंवार सांगण्यातूनच वेगवेगळ्या धर्म संस्थांचा प्रचंड असा सांस्कृतिक डोलारा निर्माण होत असतो. हा सांस्कृतिक डोलारा निसर्गनिर्मित नसतो तर मानवनिर्मित असतो. हा वेगवेगळ्या प्रकारचा सांस्कृतिक डोलारा त्याच त्या विशिष्ट गोष्टींचा जनमानसावर वारंवार इतका भडिमार करतो की वारंवार होणाऱ्या त्या भडीमारामुळे त्या त्या विशिष्ट सांस्कृतिक संकल्पनांनी जनलोकांचे मन संपूर्णपणे भारावून जाते. जनलोकांचे अशा प्रकारचे हे भारावलेपण म्हणजेच त्यांचे विशिष्ट असे भावविश्व असते. कुणाच्या भावविश्वावर गॉड अधिराज्य गाजवतो. कुणाच्या भावविश्वावर अल्ला अधिराज्य गाजवतो तर कुणाच्या भावविश्वावर ईश्वर किंवा त्या ईश्वरचे अनेकविध अवतार अधिराज्य गाजवतात. हे ईश्वर संकल्पनेच्या आधीराज्यात वावरणारे लोक स्वतःला निसर्गतः लावलेल्या बुद्धीचा स्वतंत्रपणे वापर करणेच विसरून जातात. ईश्वर संकल्पनेच्या नावाने जे जे सांगितले जाते त्यासंदर्भात शंका घेण्यास किंवा प्रश्न विचारण्यास असे लोक भयंकर घाबरत असतात. असे घाबरत घाबरत जगणारे लोक कुणीतरी कृत्रिमतेचे निर्माण केलेल्या विशिष्ट संस्कृतीच्या प्रवाहात लाकडाच्या निर्जीव आमच्याप्रमाणे वड्या पिढ्यानपिढ्या मुकाटपणे वाहत राहतात अशा लोकांच्या हातून नव्या संस्कृतीची निर्मिती होणे शक्य नसते. असे लोक त्याच त्या संस्कृतिक घाण्याभोवती झापडबंद पद्धतीने पिढ्यानपिढ्या घुमत असतात. लोकांनी त्याच त्या संस्कृतिक घाण्याभोवती घुमत राहण्यातच काहीजणांचे हितसंबंध सामावलेले असतात. या संस्कृतिक भावनेच्या घाण्याचीच एक बाजारपेठ बनलेली असते. या बाजारपेठेमध्ये यांचा फार मोठा धंदा चालतो. या सांस्कृतिक बाजारपेठेमध्ये ज्यांना फार मोठा नफा मिळतो ते लोक अशी संस्कृतिक बाजारपेठ कसे काय मोडू देतील? जगामध्ये अशा अनेकविध सांस्कृतिक बाजारपेठा आहेत. त्या बाजारपेठांमध्ये पिढ्यानपिढ्यांचे व्यापारी आहेत. सांस्कृतिक बाजारपेठेमधले व्यापारीच आपणाला हवे तसे जनलोकांचे भावविश्व जशासतसे टिकून ठेवण्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात. या नफेखोर व्यापाऱ्यांना संस्कृतीच्या क्षेत्रात होणारा कोणताही बदल नुकसानकारक वाटत असतो म्हणून अशा बदलाला ते नकारच देत असतात. मध्ययुगीन मराठी साहित्याचे उदाहरण देऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करता येऊ शकेल. मध्ययुगीन मराठी साहित्याचा मुख्य विषय आणि आशय ईश्वर किंवा ईश्वराचे निरनिराळे अवतार हाच आहे. हे साहित्य ईश्वराच्या लीलांचे वर्णन करून त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी निर्माण झालेले आहे. या साहित्यात माणसाच्या वास्तवातील जीवनाला कोणतेही स्थान नाही. ईश्वर हा स्तुतिप्रिय असतो हे या साहित्याच्या मुळाशी असलेली गृहीतक आहे. ईश्वर भक्ती ही दुसरे काहीही नसून वारंवार केलेली स्तुतीच असते. ईश्वराचे पुनःपुन्हा नाव घेतले म्हणजे तो प्रसन्न होतो म्हणजे काय? ‘नामस्मरण’ या प्रकाराचा तुतीखेरीज दुसरा अर्थ जर कुणी काढत असतील तर तो शुद्ध भाबडेपणाआहे.वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या केंद्रस्थानी विठ्ठल ही मूर्ती आहे. या संप्रदायातील सर्वच संतांनी विठ्ठल मूर्तीला केंद्रस्थानी ठेवून आपली साहित्य निर्मिती केलेली आहे. विठ्ठल हा कोण आहे याच्या खोलात जाण्याची इथे गरज नाही. परंतु वारकरी संप्रदायाच्या वर्तमानातील वास्तव हेच आहे की श्विठ्ठल ही एक मूर्ती आहे. हा विष्णू नाही तर तो विष्णूने घेतलेल्या कृष्ण या अवताराचा पुढचा अवतार आहे,असे या मूर्तीच्या संदर्भातील गृहीतक आहे. विठ्ठल हा भक्तीचा भुकेलेला आहे असेही विठ्ठलाच्या संदर्भातील एक गृहीतक आहे. विठ्ठलाची भक्ती करायची म्हणजे नेमके काय करायचे? तर विठ्ठलावर श्रद्धा ठेवायची,निष्ठा ठेवायची. ती निष्ठा कशी व्यक्त करायची? तर विठ्ठलाची नेहमी आठवण करायची, कायम त्याच्या नावाचे स्मरण करत राहायचे, त्याच्या लीलांचे स्मरण करायचे, त्याच्या मुलांचे गुणगान गात राहायचे, दरवर्षी आषाढी कार्तिकीला त्याचे दर्शन घेण्यासाठी जायचे. त्याच्या दर्शनासाठी भक्तांचे मन अगदी व्याकूळ झाले पाहिजे. ज्या भक्ताचे मन विठ्ठलाच्या भेटीसाठी अत्यंत व्याकूळ होते तो म्हणजे महान भक्त. संतांनी लिहिलेले भक्तिभावाचे अभंग म्हणजे काय? तर विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला भक्तीभावाचा आविष्कार, विठ्ठलाचे रूप पाहिल्यानंतर मनाला झालेल्या हर्षाचा आविष्कार, विठ्ठलाचे रूप किती सुंदर व मनोहर आहे याचे वर्णन किंवा त्याच्या लीलांचे वर्णन. जिथे विठ्ठल मूर्तीचे मंदिर आहे त्या पंढरपूर या गावाच्या मोठेपणाच्या बढाया. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ पंढरपुरात राहण्याइतके दुसरे कुठलेही मोठे सुख असूच शकत नाही या भावनेचा आविष्कार. भक्ताने हे सारे केले की विठ्ठल प्रसन्न होतो. विठ्ठल प्रसन्न झाला की आपल्याला मोक्ष मुक्ती मिळते. विठ्ठल सान्निध्याचे सुख व मोक्ष मुक्ती मिळवण्यासाठीचा हा सारा खटाटोप. हा सारा खटाटोप करत असताना प्रत्यक्ष जीवनात जे अनेकविध प्रश्न असतात त्यांच्याकडे मात्र ‘संसार हा दुःखमयच असतो’ असे गृहीत धरून पूर्णपणे दुर्लक्ष करायचे. संसारामधली निदान काही दुःखं तरी कमी करता येऊ शकतात का? त्याच्या काही उपायोजना असू शकतात का? दुष्काळ पडल्यावर लोकांचे होणारे हाल कसे कमी करायचे? सारी माणसं जर परमेश्वराची लेकर आहेत तर माणसात निर्माण केलेल्या उच्चनीचतावादी जाती आणि त्यातून आलेली अस्पृश्यतेची वगैरे चाल संपूर्ण नष्ट करण्यासाठी प्रत्यक्षात कोणत्या कृती करायच्या? यासंदर्भात कुठलाही संत स्पष्ट असे काहीही बोलत नाही आणि ठोस अशी कुठलीही कृती करताना दिसत नाही. (महाराच्या पोराला एकनाथांनी सहानुभूतीने कडेवर घेणे, आणि नंतर आंघोळ करून स्वतःला पवित्र करून घेणे) शिवाय दुसरी कुठलीही ठोस कृती दिसत नाही. या साऱ्या प्रश्नांबद्दल काहीच बोलायचे नाही. फक्त विठ्ठलाचे नामस्मरण करत राहायचे. असा हा भक्तिभावच वारकरी संप्रदायातील संत कवी सलग सातशे वर्षे आळवताना दिसतात. अहिंसा व सदाचार यासारख्या मूल्यांचा पुरस्कार करणारे काही अभंग नक्कीच आहेत; परंतु बहुसंख्य अभंग आहेत ते भक्ती भावनेचा आविष्कार करणारेच. ही विठ्ठलाबद्दलच्या भक्तीभावाची व्याकुळता किंवा नामस्मरणातील हर्षभरित स्थिती कुठून येते? संतांच्या मनात उद्भवणारी ही भक्तीची भावना नैसर्गिक आहे का? ज्या विठ्ठल भक्तीच्या भावनेचा प्रचंड मोठा अभंग डोलारा संतांनी निर्माण केला तो विठ्ठल कुठल्यातरी संताला प्रत्यक्षात भेटावयास आला होता का? संत ज्ञानेश्वर,नामदेव ते तुकाराम इथपर्यंतच्या संतांच्या जीवनकालात विठ्ठल प्रत्यक्षात जिवंतपणे अस्तित्वात होता का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर हे आहे की विठ्ठल जिवंतपणे अस्तित्वात नव्हता तर पंढरपूर या गावामध्ये विठ्ठलाची विटेवर उभी असलेली एक मूर्ती होती. ही मूर्ती सजीव होती का? ती सजीव असल्याचा काही पुरावा आहे का? तर तो कुठलाही पुरावा नाही. तरीही काही संतांना विठ्ठल आपल्या कामांमध्ये मदतीसाठी धावून येतो असे वाटते. हे सत्य असते की आभास असतो? की नुसतीच भावना असते? तो एक विशिष्ट असा भावातिरेक असतो. सजीव नसलेल्या, आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काडीचाही हस्तक्षेप न करणाऱ्या, कधीही न बोलणाऱ्या, कधीही कुठलीही भावनांना व्यक्त न करणाऱ्या मूर्ती बद्दलचा इतका टोकाचा भावनाअतिरेक कसा काय उद्भवतो? याचे उत्तर हे आहे की रामायण- महाभारत ही महाकाव्ये आणि पुराणांनी ईश्वर, त्याचे अवतार इत्यादी गोष्टींचे वारंवार अतिशयोक्तीपूर्ण गुणवर्णन करून कृत्रिम रीतीने एका विशिष्ट घटकावरील श्रद्धेचे स्तोम माजवणारे सांस्कृतिक वातावरण निर्माण केलेले होते. या वातावरणाच्या वलयात वावरणारी माणसे देव धर्म मोक्ष मुक्ती या कल्पनांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या लौकिक जीवनाचा गंभीरपणाने विचारच करू शकत नव्हती. जो काही विचार करायचा तो तेवढ्या सांस्कृतिक वलयाच्या मर्यादितच. या मर्यादेला ओलांडून या मंडळींची झेप फारशी पुढे गेलेली दिसत नाही.नव्हे लौकीक जीवनाचा विचार करण्याला हे लोक महत्वच देत नव्हते विठ्ठल जिवंत रुपात अस्तित्वात नसून एका मूर्तीच्या रूपात अस्तित्वात असतो;तरीही तो संतांच्या मनावर एवढा मोठा प्रभाव का टाकतो? तर खण्ड काव्य,अभंग इत्यादी काव्य रचनेच्या माध्यमातून विठ्ठलाच्या अस्तित्वाचा एक सांस्कृतिक आभास निर्माण केलेला आहे.
सारेच्या सारे संत आणि सारेच्या सारे भक्त या आभासमय वातावरणात वावरत असतात.मानसिक दृष्ट्या या आभासमय वातावरणात राहून भक्तीचे काल्पनिक सुख अनुभवत असतात. जो या आभासमय वातावरणाच्या बाहेर असतो त्याच्या दृष्टीने हे सारे भावनिक भाबडेपणाच असते. अल्लाच्या प्रभावात असलेल्या व्यक्तींना सावळ्या सुंदर मनोहर रूपाचा विठ्ठल का भुरळ घालत नाही? येशूच्या प्रभावात असलेल्या लोकांना विठ्ठलाचे सुंदर ध्यान का भुरळ घालत नाही? नव्हे याच महाराष्ट्रातील महानुभाव संप्रदायातल्या लोकांच्या मनावर सावळ्या सुंदर विठ्ठलाचे रूप का भुरळ घालत नाही? विरशैव संप्रदायातील लोकांच्या मनावर विठ्ठलाचे रूप का भुरळ घालत नाही? तो त्यांच्यावर भुरळ घालत नाही कारण त्यांच्या सभोवतीचे संस्कृतिक वातावरण भिन्न स्वरूपाचे आहे. जसे आपल्या सभोवतीचे सांस्कृतिक वातावरण तशी भावस्थिती बनत असते. सांस्कृतिक वातावरण हे काही नैसर्गिक नसते तर ते माणसाने बनवलेले असते. माणसाने बनवलेले सांस्कृतिक वातावरणात विशिष्ट सांस्कृतिक घटकांवर श्रद्धा ठेवणारे भावविश्व घडवत असते. आणि एकाच एका विशिष्ट सांस्कृतिक श्रद्धेचे स्तोम जेव्हा अतिरेकीपणाने वाढत जाते तेव्हा नवा विचार करण्याची आणि नवनिर्मिती करण्याची अक्कलच तो मानवी समूह गमावून बसतो. वा काही विचार करण्याची अक्कल गमावून बसलेला विशिष्ट मानवी समूह मग सलग
सातसातशे वर्षे भक्तीच्या भोवर्‍यातच गटांगळ्या घेत राहतो.
माझा असा सवाल आहे की सजीव नसलेला, कधीही काहीही न बोलणारा, मानवी जीवनात कुठलाही हस्तक्षेप न करणारा विठ्ठल जर लोकांच्या मनावर एवढा मोठा प्रभाव गाजवू शकतो. सलग सातसातशे वर्षे आणि त्याच्याही पुढे जर भक्तीच्या भोवऱ्यात घुमावत राहतो. त्याच त्या एकारलेल्या भावनेचे अभंग पुन: पुन्हा लिहावयास आणि अनेकविध सूर देऊन गावयास लावतो, हे लिहिणे आणि गाणेच अलौकिक वगैरे पातळीवरचा आनंद देते,तर मानवी जीवनात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून समग्र मानवी जीवनातले दोष नाहीसे करणारे व मानवी जीवनाला प्रत्यक्षपणे कल्याणकारी दिशेने घेऊन जाणारे भारताचे संविधान लोकांच्या भावविश्वाचा भाग का बनू शकत नाही?
भारतीय नागरिकांनी भारतीय संविधानाचा विचार भावनिकतेने करावा की बौद्धिकतेने करावा हा एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. संविधानाचा विचार भावनिकतेने न करता बौद्धिकतेनेच केला पाहिजे असेच बहुतांश जणांचे मत येईल. माझे मात्र असे मत आहे की भारतीय संविधानाचा विचार बौद्धिकता आणि भावनिकता या दोन्हीही पद्धतींनी करणे आवश्यक आहे. कोणत्याही घटकाच्या संदर्भामध्ये बौद्धिक पद्धतीने केला गेलेला विचार हा तटस्थ व कोरड्या स्वरुपाचा असतो. हा विचार त्या विशिष्ट घटकाच्या संदर्भामध्ये खात्रीने कृतिप्रवण बनवेलच असे नाही; परंतु विचाराला जर भावनेची जोड दिली गेली तर तो विचार कृतीत उतरवला जाण्याची शक्यता अधिक असते. आजवर आपल्या देशात भारतीय संविधानाचा विचार बौद्धिक तिनेही झाला नाही व भावनिकतेनेही झाला नाही; तर तो निव्वळ तांत्रिकतेने झाला असे माझे मत आहे. कारण संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ असतो. तो देशाचा राज्यकारभार कसा करावा याचे मार्गदर्शन करत असतो. एवढ्या मर्यादित संविधानाचा बहुतांश विचार झालेला आहे. त्यामुळे भारतीय संविधानाच्या मुळाशी असलेली नवसंस्कृतीच्या निर्मितीची तात्विक व वैचारिक ऊर्जाच कोणाला फारशी दिसलेली नाही. अधिकच्या चिंतनशील रीतीने आणि भावनिकतेने भारतीय संविधानाचा विचार केला गेला असता तर गेल्या सत्तर वर्षात भारतामध्ये संविधान संस्कृतीचा एक फुलोरा फुललेला दिसला असता. सत्तर वर्षात भारतामध्ये असे काहीही झालेले दिसत नाही. उलट भूतकाळात घेऊन जाणाऱ्या पौराणिक संस्कृतीचे स्तोम मात्र इथे फार मोठ्या प्रमाणात माजलेले दिसते.
भारतीय संविधानाचा भावनिक व बौद्धिक रीतीने विचार करणे म्हणजे तरी काय? संविधानाचा बौद्धिक रीतीने विचार करणे म्हणजे भारतीय संविधानाच्या मुळाशी असलेल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाला, वैचारिकतेला, मूल्यात्मकतेला व संस्कार क्षमतेला सर्व अंगांनी समजून घेणे. संविधानाचा भावनिक दृष्टीने विचार करणे म्हणजे संविधानाबद्दलचा व संविधाननिर्मात्यांच्या बद्दलचा खूप मोठा कृतज्ञताभाव मनामध्ये बाळगत विचार करणे. आपल्या जीवनावर अत्यंत विधायक असा परिणाम करणाऱ्या वास्तवातील, प्रत्यक्षातील घटकाबद्दल कृतज्ञताभाव व आदरभाव बाळगणारे समाजमन हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असते. अशी सुसंस्कृतता आपल्या समाजाने अजून पुरेशा प्रमाणात दाखवलेली दिसत नाही. परंतु आपले समाजमन कल्पित अशा ईश्वर संकल्पनेबद्दलचा मात्र फार मोठा कृतज्ञताभाव वारंवार व्यक्त करते. जी ईश्वर संकल्पना मानवाच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कधीही,कुठलाही हस्तक्षेप करत नाही, त्याच्या जीवनात प्रत्यक्षपणे चांगले किंवा वाईट असे काहीही घडवून नाही, त्या ईश्वर कल्पनेबद्दलच्या कृतज्ञताभावाचा प्रचंड मोठा सांस्कृतिक डोलारा माणसाने निर्माण केलेला आहे. माणसाने निर्माण केलेली वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या आकाराची प्रार्थना स्थळे, ईश्वराच्या देवदेवतांच्या वेगवेगळ्या मूर्ती, त्या मूर्तींची स्तोत्रे, आरत्या, अनेकविध पद्धतीच्या उपासना रीती, कर्मकांडे, वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे धर्मग्रंथ, वेगवेगळ्या धर्मांची वेगवेगळी तीर्थस्थाने, वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे सण-उत्सव हा सारा ईश्वर संकल्पनेबद्दल चा कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी निर्माण केलेला सांस्कृतिक डोलारा आहे.
भारतीय लोकांनी संविधानाबद्दलचा कृतज्ञताभाव, आदरभाव कसा बाळगावा? या प्रश्नाचे उत्तर देणे इथे आवश्यक आहे. भारतामध्ये हजारो वर्षानंतर निर्माण झालेला संविधान हा असा एकमेव ग्रंथ आहे की जो ग्रंथ भारतातील सामान्यातिसामान्य माणसाला हजारो हातांनी अनेकविध महत्त्वपूर्ण अशा देणग्या देतो. संविधानाने सामान्य माणसाला अनेकविध मूलभूत हक्क दिले. त्यातील समानतेचा हक्क, हवा तो व्यवसाय धंदा करण्याचा हक्क, जीविताचा हक्क, विचार अभिव्यक्तीचा हक्क, मतदानाच्याद्वारे आपणाला हवा तो लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क, निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क हे फार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेल्या या हक्कांमुळे भारतातील बहुसंख्य माणसांच्या जीवनामध्ये प्रगतीची एक नवी पहाट उगवली. भारतातील निरनिराळ्या जातिधर्मातील या सामान्य माणसांना जे यापूर्वी ही मिळालेली नव्हती ते संविधानाने मुक्त हस्ते देऊन टाकले. म्हणजे ते देण्याची एक अधिकृत अशी समतावादी, लोकशाही, लोककल्याणकारी राज्ययंत्रणा उभी केली. या यंत्रणेमुळे अनेक असामान्य यांसाठी हजारो वर्षांपासून बंद असलेली प्रगतीची अनेक दारे मोकळी झाली. विविधतेने नटलेल्या व विशेषतः विविधतेने फाटलेल्या भारतभूमीवर राहणाऱ्या लोकांना एक राष्ट्रीयत्वाचा पक्व अशा धाग्यामध्ये सुंदर रीतीने गुंफले. हे सारे संविधानाने निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्य यंत्रणेच्याद्वारे प्रत्यक्षपणे केलेले आहे. भारतीय संविधानाच्या समतावादी धोरणांमुळे भारतातील सर्व जनतेचे संपूर्णपणे कल्याण झाले असे म्हणता येईल का? तसे म्हणता येणार नाही; परंतु भारतातील समग्र जनतेच्या कल्याणाची प्रक्रिया मात्र संविधानाने गंभीरपणे सुरू केलेली आहे. समग्र जनतेचा सर्व अंगांनी न्यायाच्या तत्त्वावर समतोल विकास घडवून आणावा हा भारतीय संविधानाचा आदेश आहे. संविधानाचा हा आदेश प्रामाणिकपणे व तंतोतंतपणे पाळणारा शासन कर्ता वर्ग प्रगल्भ रीतीने मतदान करून भारतीय जनता अजूनही निर्माण करू शकलेली नाही. म्हणून समग्र जनांच्या समतोल विकासाची संवैधानिक प्रक्रिया इथे हव्या त्या गतिमानतेने होताना दिसत नाही. भारतीय जनतेमध्ये संविधानाच्या संदर्भात असलेले अज्ञान हेच याला कारणीभूत आहे. माझे असे स्पष्ट मत आहे की, भारतात अजून आपण साधी संविधान साक्षरताही घडवून आणलेली नाही. भारतीय जनतेमध्ये
संबिधानाबद्दल असलेले अज्ञान दूर केले तर इथली जनता संविधानाबद्दलचा कृतज्ञताभाव नक्कीच मोठ्या प्रमाणात व्यक्त करू लागेल. आणि हाच संविधानकेंद्री संस्कृती निर्माण व संविधानवादी साहित्य प्रवाह निर्माण करण्याचा प्रारंभबिंदू असेल.
ईश्वर किंवा त्याची कुठलीही मूर्ती सजीव नसते. म्हणूनच ती मानवी जीवनामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नसते.कारण ईश्वर ही प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली व्यक्ती नाही तर ती मानवाने निर्माण केलेली सांस्कृतिक संकल्पना आहे. संविधान सजीव आहे का? संविधान भारतीय माणसांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करते का? या प्रश्नाचे उत्तर असे द्यावे लागते की, संविधान हा ग्रंथ जैविक अर्थाने सजीव नसला तरी भारतातील मानवी जीवनावरील प्रत्यक्ष परिणामकारकतेच्या दृष्टीने सजीवच आहे. संविधानातील सारेच्या सारे अनुच्छेद भारतीय जनतेला व संवैधानिक प्रक्रियेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या राज्य यंत्रणेला आदेश देत असतात. संविधानाच्या आदेशानुसारच आज सर्वांना वागावे लागते. या अर्थाने भारतीय संविधान जिवंतच आहे. कारण ते प्रत्येक भारतीयाच्या जीवनामध्ये विधायक असा हस्तक्षेप करते. भारतीयांच्या जीवनाचे उन्नयन घडवून आणण्याची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक,औद्योगिक, कृषीविषयक अशी सारी सारी प्रक्रिया घडवून आणते. ही सारी प्रक्रिया समग्रजनांचा विकास घडवून आणणारी असली पाहिजे ही भारतीय संविधानाची मूलभूत तात्त्विक भूमिका आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!