देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ


लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- १५/९/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३८
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली मांडलेल्या विचारांना आजच्या बौद्ध समाजाने गांभीर्याने घेतले आहे असे दिसते काय?
आज बौद्ध समाज नवीन नवीन गट; संघटना व पक्ष यांच्या मध्ये विभागला गेला आहे.याची कारणे जातीभेद; अहंकार; स्वार्थ ही प्रामुख्याने दिसतील.वेगवेगळ्या गटांमध्ये; संघटनांमध्ये व पक्षांमध्ये विभागलेले लोक कसे वागतात.जशी वरीष्ठ जात कनिष्ठ जातीचा द्वेष; तिरस्कार; दुजाभाव व बदनामी करतात तशाच प्रकारे या गटांमध्ये संघटनांमध्ये व पक्षांमध्ये आपणांस लोक वागताना दिसतिल.म्हणजे हे वेग वेगळे गट संघटना व पक्ष ही बौद्धांची नवीन जातीव्यवस्था आहे. हे गट ;संघटना व पक्ष एकमेकांचे जातीय द्वेष भावनेने वैरी झाल्याचे आपण पहातो. एकमेकांचे तोंड सुद्धा पहात नाहीत.एवढी पराकोटीची जातीयता जोपासली जाते.
जसा उच्च जातीला आपल्या जातीचा अहंकार तसा या गटांमध्ये; संघटनांमध्ये व पक्षांमध्ये काम करणाऱ्या लोकांची अवस्था सुद्धा अशीच आहे. मी इतरांपेक्षा जास्त शिकलेला आहे.समाजामध्ये मीच विद्वान आहे.माझ्याकडे जास्त लोक आहेत. माझ्या शिवाय समाजाचे नेतृत्व करण्यासाठी दुसरा कोणीच लायक नाही.मलाच फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजले आहेत. या असल्या अहंकारामुळे अहंकारी माणूस दुसऱ्याचे नेतृत्व उभे राहू देत नाही. मग ज्याला डावलले जाते तो आपला वेगळा गट निर्माण करतो. हा सुद्धा पहिल्या सारखा आपल्या बद्धलची प्रौढी; मीपणा ; मत लोकांच्या माथी मारत असतो. म्हणजे हा आंधळ्याचा खेळ सुरू होतो.असे एकना अनेक आंधळे चाचपडत दिसेल तिकडे ; तशा पद्धतीने गट; संघटना व पक्ष काढत सुटतात. म्हणजे याला आपण आंधळ्यांचा सावळा गोंधळ म्हणू. याचाच अर्थ आंधळे दळते नी कुत्रे पीठ खाते तशी अवस्था या गटात; संघटनात व पक्षांत काम करणाऱ्या लोकांनी आंबेडकरी चळवळीची करून ठेवली आहे.
जसा उच्च जातीचा स्वार्थ उच्च पणात आहे. तिला नेहमी वाटत असते या देशाची संपत्ती फक्त आपलीच आहे.आपणच याचे हक्कदार आहोत.इतरांचा हक्क नाही.तसे वेग वेगळ्या गटात ; संघटनात व पक्षांत काम करणाऱ्या लोकांना वाटत असते की; दुसऱ्या गटाला काही फायदा होता कामा नये.त्यांना काही मिळता कामा नये. आपल्यालाच सर्व मलिदा मिळाला पाहिजे. या स्वार्थातून जातीव्यवस्थेचा मुळ स्वभाव द्वेष; तिरस्कार; दुजाभाव व बदनामी या नकारात्मक प्रवृत्ती या गटात ; संघटनात व पक्षांत काम करणाऱ्या लोकांची होऊन जाते.या स्वार्थी स्वभावामुळे समाजातल्या समतेला तडा जातो.समाजाची छकले होतात.समाजाची एकी तुटली जाते.लोक एकमेकांचे वैरी होतात.यामुळे आपण गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास लक्षात घेतला तर मनुवादी व्यवस्थेने आंबेडकरी चळवळीत निर्माण केलेल्या दलांचे दिवस चांगले व आंबेडकरी समाजाला शिक्षा हा शाप मनुवादी व्यवस्थेने दिला आहे हे लक्षात येईल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज संघटित रहावा म्हणून वेग वेगळ्या ठिकाणी भाषणे दिलेली आहेत.
दिनांक ६ मार्च १०३२ रोजी सोलापूर येथे दिलेल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की; महार; मांग; ढोर; चांभार; भंगी वगैरे मंडळींनी आपापसात एकी केली पाहिजे आणि कोणाच्याही शिकवणीने आपसात बेकी होऊ देऊ नये.
दिनांक ४ नोव्हेंबर १९३२ रोजी बालपाखाडी गुजरात येथे मार्गदर्शन करताना म्हणतात की; आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळवावयाचा आहे.आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे या करिता आपण आपल्या पायावर उभे राहुन संघटना केली पाहिजे.आपले शील विकून पोट भरणारे लोक तुम्हाला निरनिराळ्या वेळी थापा देतील.त्यापासुन सावध रहा व आपल्या मनाला पटेल तेच करा.शेवटी आपणाला हेच सांगावयाचे की; हिंदू लोकांना जातीभेद मोडावयास ज्या प्रमाणे आपण सांगतो त्याप्रमाणे आपणही आपल्यातील भेद मोडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे.
त्याच रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या सभेला संबोधित करताना म्हणतात की; आपणाला जे राजकीय हक्क मिळालेले आहेत ते कशाच्या जोरावर मिळाले तर आपल्या संघ शक्तीच्या जोरावर मिळाले आहेत.तुम्ही आपली एकी कायम ठेवा ; दुभंग होऊ देऊ नका.जातीभेद ; वर्ग भेद; जिल्हा भेद हे वाढवू नका.माझ्या पश्चात डॉ सोळंकी साहेब व माझ्या ऑफिसात माझ्याबरोबर काम करणारी माझी सहाय्यकारी मंडळी यांच्या सहाय्याने वागा.इतरांच्या भुलथापा ऐकून सैरावैरा धावत सुटू नका.माझ्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींच्या विरूद्ध लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न काही बुद्रुकांनी चालू ठेवला आहे हे मला माहीत आहे.तरीपण तुम्ही आपली मने विकारवश होऊ देऊ नका व मी येईपर्यंत ऐक्याने वागा.ऐक्याने वागल्यास आपले भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करण्यास इष्ट फलदायी होईल.
वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला लागू पडतात.आपण महापुरूषांच्या विचारांचे वारसदार झालो तरच आपला व समाजाचा उद्धार होणार आहे.
उर्वरित भाग पुढे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!