महाबोधी महाविहार प्रश्नात ;बाबासाहेब लक्ष घालणार होते !

🌻 प्रा रणजीत मेश्राम
बुध्दगया महाबोधी महाविहाराचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना कळला होता. प्रश्नातील धग समजली होती. ते त्यात लक्ष घालणार होते.
पण , अचानक १९५६ चे ६ डिसेंबर कोसळले. सारे जागच्या जागी राहून गेले.
आज या प्रश्नाला व्यापक जनसमर्थन लाभत आहे. तो बौध्दांचा कळीचा मुद्दा झालाय. देशभर बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत.
या प्रश्नात याआधी अनागारिक धम्मपाल आणि भदन्त सुरई ससाई यांनी लक्ष वेधले होते.
बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नात लक्ष घालणार होते ती रोचक नोंद 'बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षेचा अविस्मरणीय इतिहास' या पुस्तकात नमूद आहे. सदर पुस्तक वामनराव गोडबोले यांनी लिहिले. वामनराव हे १९५६ च्या बुध्दधम्म दीक्षेचे प्रमुख आयोजक आहेत. हे पुस्तक अनेक बाबतीत स्मरणीय आहे.
वामनराव लिहितात , मी रेल्वे कर्मचारी असल्याने प्रवासाकरिता मला रेल्वेचा फर्स्ट क्लासचा पास मिळायचा. महादेव मेश्राम हे नात्याने काका लागत असत. ते रेल्वेत पोर्टर होते. ते उंच व त्यांची देहयष्टी धिप्पाड होती. त्यांना थर्ड क्लासची पास मिळायची. मी आपल्या सोबत एक सहकारी नेऊ शकत होतो.
आम्ही दोघेही बौध्द धर्मात रमून गेलो होतो. रेल्वेचा पास व सुट्यांची सांगड घालत आम्ही बौध्द स्थळे पहायला फिरत होतो. बुध्दगया , सारनाथ , लुंबिनी , श्रावस्ती , कुशीनगर , पश्चिमेस अजंता , एलोरा , कान्हेरी, नाला सोपारा आदी बोध्द स्थळांना आम्ही भेटी दिल्या.
सर्वात आधी आम्ही बौध्दगया येथे गेलो. तेव्हा तिथे एक मोठी विचित्र घटना घडली. माझ्या काकांचा अक्षरशः जीव वाचला. जेव्हा आम्ही मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला तेव्हा असे लक्षात आले की , तेथील बुध्द मुर्तीला स्थानिय पंडा , पाच पांडव म्हणून सांगू लागला. तेव्हा काका रागावले व रागानेच म्हणाले , 'ये क्या लगा रखा है ?'. मी म्हणालो काका जाऊ द्या. आपणाला सध्या इथे काहीच करता येत नाही. यावर काका काहीसे शांत झाले.
पण जेव्हा आम्ही मुख्य मंदिरात प्रवेश घेतला तिथे वेगळेच दृश्य दिसले. मुख्य मंदिरात एक पंडा बसलेला होता. चक्क फ्लोअरिंग खोदून एक खड्डा तयार करून तेथे पिंड बसविली होती. ‘भगवान बुध्दासमोर महादेवाची पिंड कशी ?’. काका एकदम भडकले. त्यांनी तेथील पुजाऱ्याचा गळाच पकडला. आणि पिंडेकडे इशारा करीत विचारले , ‘ये यहां कैसे आयी ?’
अर्थात त्यावेळी आरडाओरड झाली. आसपासचे लोक आमच्या भोवती गोळा झाले. तितक्यात तेव्हढ्याच तत्परतेने मनिन्द्र बरुआ धाऊन आलेत. ते महाबोधी सोसायटीचे स्थानिय व्यवस्थापकाचे काम करीत होते. त्यांनी काकांचा हात धरला. त्वरेने आम्हाला बाहेर घेऊन आले. मध्यस्थी करून सोडविले. नंतर आम्हाला विचारले ..,
‘आप कहां से आये है ?’
‘नागपूर से’ आम्ही म्हणालो.
‘आप क्या बुध्दिस्ट है ?’
‘नही. लेकिन होनेवाले है’.
यावर दीर्घ श्वास घेऊन बरुआ म्हणाले , ‘यहां पर इन्ही का राज है. ये आपको मार डालेंगे तो भी किसीको पता नही चलेगा’.
मी मात्र शांत होतो. पण काका भयंकर चिडले होते. ते तसे ३-४ माणसांना सहज पेलवणारे ही नव्हते. या घटनेमुळे माझी बरुआंशी ओळख झाली. पुढे ते विपश्यना शिक्षक बनल्याचे समजले.
मी बुध्दगयेची घटना नंतरच्या काळात बाबासाहेबांना सांगितली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते , 'आधी आपण धर्मांतर करु. मग पाहू तिथली सत्ता कशी हिंदुंच्या हातात राहते ती'.
…, योजिलेले सारे तसेच राहून गेले !
० रणजित मेश्रामलेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत