ज्येष्ठ नागरिक आणि वास्तव

मनिष सुरवसे, सोलापूर.
वृध्दांसमोरील आव्हांनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दि. 21ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. परंतु आपला देश हा तर तरुणांचा देश आहे, मग आपल्या इथे वृध्दांचे दिवस साजरा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण त्यांच्या काही समस्याच नाहीत असा काहीसा सूर तरुणांकडून निघताना दिसतो आहे.
परंतु एक गोष्ट साऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की, आपल्या देशात बहुसंख्य लोक जे आता ज्येष्ठ, वृध्द झाले आहेत त्यांना आपले घर चालविण्यासाठी, आपल्या मुलांबाळांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी, त्यांची लग्ने करुन त्यांना चांगले जीवन देण्यासाठी आयुष्यभर राबराब राबून रक्ताचे पाणी केले आहे. म्हणजे एक तरुण व्यक्ती लग्न झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला चांगले जीवन देण्यासाठी, त्यांचे पालन पोषण करण्यासाठी नोकरी करतो, नोकरी करण्यासाठी कधी कधी काळजावर दगड ठेवून कुटुंबापासून दूर राहतो. त्याला सरकारी नोकरी असेल तर ठीक, कसे तरी कर्ज वगैरे काढून मुलांचे शिक्षण पूर्ण करतो, त्यांची लग्ने करतो. परंतु जर त्याला खासगी नोकरी असेल तर ? किंवा टॅक्सी, रिक्षा चालविणाऱ्यांचे किंवा छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्यांचे किंवा मोलमजूरी करणाऱ्यांचे काय ? नुसती कल्पना करुन बघा. त्यांना आयुष्यभर, मरेपर्यंत आपल्या कुटुंबासाठी कुत्तरओढ करावी लागते हे वास्तव कुणी नाकारेल काय ?
सांगावयाचा मुद्दा हा की, आयुष्यभर कुटुंबासाठी जीवाचे रान करुन वयाच्या साठीनंतर तरी त्यांना आरामाचे जीवन लाभते काय ? तर नाही. त्यांना वृध्दापकाळात सुध्दा काम करावे लागत आहे आणि हेच या देशातील ज्येष्ठनागरिकांचे वास्तव आहे.
आज आपण आपल्या अवतीभवती पाहतो तर काय दिसते ? सेक्युरिटी गार्ड, रिक्षा चालक, भाजी विक्रेता, कुणाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून, बांधकामावर मजूर म्हणून इथपासून ते छोटेमोठे काम करणारे सारेच्या सारे सगळीकडे वृध्द मंडळीच दिसतील. आणि महत्वाचे म्हणजे हे सारेच्या सारे बहुजनच (एस.सी., एस.टी., व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी आणि अल्पसंख्यांक) आहेत हे लक्षात घ्यावे.
ज्या वयात निवांत बसून, नातवंडासोबत वेळ घालवत आरामात जीवन व्यतीत करायचे की, आयुष्यभर कष्ट केले आणि आता म्हातारपणातही कष्टच करायचे का असा आर्त सवाल वृध्द मंडळी विचारताहेत. ही वेळ, अशी परिस्थिती आजच्या बहुजन वृध्दांवर का आली आहे ? का ते आरामात जीवन जगू शकत नाहीत ?
तर याचे उत्तर सरकारच्या धोरणात सापडते. तेव्हा ही वेळ, अशी परिस्थिती आजच्या वृध्दांवर केवळ सरकारच्या खासगीकरणासारख्या भांडवलधार्जिण्या धोरणांमुळे आली आहे. संविधान लागू झाल्यानंतर सरकारच्या सर्व सार्वजनिक उपक्रमातून सर्वांना रोजगार मिळत होता. त्या रोजगाराच्या माध्यमातूनच बहुजन वर्ग आपल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवत तो शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधत होता. आज जे बहुजन सरकारी खात्यातून शिपाई या पदापासून ते अधिकारी पदापर्यंतच्या मोठमोठ्या पदावरुन सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा नोकरीवर आहेत ते केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदींमुळे याची जाणीव सर्व बहुजनांनी ठेवली पाहिजे.
परंतु बहुजनांची ही प्रगती मनुवाद्यांच्या डोळ्यात खुपत होती. म्हणून त्यांनी सरकारी असलेले सर्व सार्वजनिक उद्योग, उपक्रम आणि सेवा यांचे खासगीकरण करायला सुरुवात केली. त्याअगोदर सरकारी खात्यातील पदसंख्या कमी कमी करायला सुरुवात केली आणि जी रिक्त आहेत ते भरायचे नाहीत म्हणजे नोकर भरतीच बंद केली. म्हणजे बहुजनांच्या तरुणांना नोकरीच मिळू नये, त्यांचा विकास होऊच नये यासाठीचे धोरण मागील अनेक वर्षाच्या काळापासून राबवले गेले. त्यामुळेच आजचा तरुण बेरोजगार आहे. म्हणजे जगातील सर्वात जास्त बेरोजगारीची टक्केवारी आपल्या देशाची आहे. तर आजच्या तरुणांसाठी नोकरीच नाही तर त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार ? त्यांना रोजगारच नाही तर ते कसे जगणार ? खासगीकरण म्हणजे थोड्यांनाच, मोजक्यांनाच संधी. केवळ सरकारच्या या खासगीकरणासारख्या भांडवलधार्जिण्या धोरणामुळे आजचा तरुण बेरोजगार आहे हेही साऱ्यांनी लक्षात घ्यावे.
संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनुवाद्यांच्या या विषमतावादी वृत्तीची कल्पना होती. त्यांना माहिती होते की, मनुवादी बहुजनांना प्रगती करु देणार नाहीत, त्यांना आर्थिक आणि सामाजिक गुलामीतच खितपत ठेवतील. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम बहुजन वर्गाच्या हितासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी संविधानच लोककल्याणकारी बनवले आहे. लोककल्याण म्हणजे काय तर, या देशातला अगदी शेवटच्या तळातील व्यक्तीला आनंदात, सुखात जीवन जगण्यासाठीची तरतूद सरकारनेच करायची. परंतु संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी बौध्दांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला, रस्त्यावरची आंदालने करावी लागली. तेंव्हा कुठे आरक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा मिळाल्या. त्याचबरोबर नोकरीमध्येही आरक्षणाची तरतूद राबवावी लागली. तेंव्हा कुठे केवळ बौध्दांनाच नव्हे तर समस्त बहुजन वर्गाला शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधता आली.
परंतु वर म्हटल्याप्रमाणे अलिकडील वर्षांमध्ये संविधानातील तरतुदींना हारताळ फासून वेगवेगळ्या प्रकारे बहुजनांच्या प्रगतीला आळा बसवला गेला आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे नोकरी भरती बंद. नोकरी, रोजगारच नाही मिळाला तर तरुण काय करणार ? आज तुम्ही आपल्या आजुबाजूला पाहिले तर प्रत्येक घरात बेरोजगार तरुण-तरुणी दिसतील. त्यांना नोकरी नाही म्हणून ते नैराश्येमध्ये जात आहेत, गुन्हेगारीकडे वळत आहेत. याचा परिणाम त्यांच्या नंतरच्या पिढीवर झाला आहे. शिक्षणाबाबत त्यांच्यामध्ये अनास्था निर्माण झाली आहे. कारण शिक्षण घेऊन नोकरीच मिळणार नसेल तर शिकायचे कशाला अशाप्रकारची मानसिकता बालमनाची बनली आहे. त्यामुळे आजचा बालवयीन विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे त्यामुळे त्यांचे भविष्य वाऱ्यावर आहे. आणि आजचा तरुण बेरोजगारीमुळे भरकटला आहे.
हे एवढे सारे घडत असूनही आजचे बेरोजगार तरुण रोजगार मागण्यासाठी आंदोलन करताना दिसत नाहीत, मग हे असे कसे होऊ शकते असा सवाल कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. परंतु हे सत्य आहे. कारण आजच्या बेरोजगार तरुणाला धर्मांध बनवून त्याला धार्मिक परंपरेमध्ये अडकवून ठेवले आहे. ही धार्मिक परंपरा पाळणे, सण-उत्सव साजरे करणे याच्याशिवाय आयुष्यात दुसरे कुठलेही महत्वाचे कामच नाही अशा मानसिकतेत आजचा तरुण आहे.
तुम्ही पहा, आजच्या काळात सण-उत्सवाला किती उग्र स्वरुप प्राप्त झाले आहे. प्रत्येक सणाचा उत्सव करण्याची, तेही मोठ्या प्रमाणात करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. गणपतीसुध्दा महिना अगोदरच बसविण्याची नवीन प्रथा सुरु झाली आहे. दहिहंडी पासून गणपती ते नवरात्रीमध्ये आपल्या गावापासून तुळजापूरपर्यंत मशाल घेऊन अनवाणी धावत जाण्याचेही प्रमाण तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढले आहे. कोणताही सण घ्या ते साजरे करण्यासाठी तरुणांचीच प्रचंड गर्दी. डीजेवर कर्कश-कांठाळ्या बसणाऱ्या आवाजातील गाण्यांवर नाचणे यासारखा जीवनात आनंद दुसरा कोणताच नाही असा समज (गैरसमज) आजच्या तरुणांचा आहे. त्यात भरीस भर घालायला मिडिया आहेच. तरुणांचा असा हा उत्साह, त्याची धार्मिकता ओसंडून वाहते आहे, म्हणूनच आपला देश विश्वगुरु, आर्थिक महासत्ता बनत असल्याचा बनाव मिडिया करत आहे. परंतु असे करुन मिडिया देशातील तरुणांना, नागरिकांना सत्यापासून, वास्तवापासून दूर नेत आहे, हे साऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.
परंतु जे सत्य आहे, वास्तव आहे ते कसे झाकणार, कसे लपवणार ? आजचा तरुण बेरोजगार आहे, तर तो आहेच. तो बेरोजगारीने त्रस्त आहे, तर तो त्रस्त आहेच. तरुणांच्या बेरोजगारामुळेच त्यांच्या वृध्द माता-पित्यांना म्हातारपणातही काम करावे लागत आहे, तर होय हेच सत्य आहे आणि हेच आजचे भीषण वास्तव देखील आहे. मग वास्तव इतके भीषण असताना देश कसा महासत्ता बनणार ?
तेव्हा या देशाला खरोखरच महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांना धार्मिकतेतून, धर्मांधतेतून बाहेर पडावे लागेल तरच त्यांना देशातील वास्तविकतेची दाहकता समजून येईल आणि देशाच्या भवितव्याचे चित्र कसे असणार आहे हेसुध्दा समजून येईल. आपल्या संविधानाची अंमलबजावणी नीटपणे केली जात नाही, उलट संविधानाची मोडतोड करुन आपली लोकशाही संपुष्टात आणण्याचे षडयंत्र चालू असल्याचेही त्यांना लक्षात येईल आणि जर देशात संविधान असेल तरच आपला वर्तमान आणि भविष्य सुखकर होणार आहे याचीही जाणीव होईल.
तेव्हा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करताना या देशातील तरुणांना नोकरी, रोजगार मिळाला आणि तो जर रोजीरोटीला-कामाधंद्याला लागला तरच त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या आई-वडिलांना सन्मानाचे, सुखाचे आणि आरामाचे दिवस येणार आहेत. हे जेवढ्या लवकर तरुणांच्या लक्षात येणार आहे तेवढ्या लवकर तरुणांचे, त्यांच्या मातापित्यांचे आणि देशाचेही भले होणार आहे, हे साऱ्या बहुजनांनी लक्षात घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे.
🙏
दि.- 02 सप्टेंबर 2025
🙏 मनिष सुरवसे, 9657725946 जिल्हाध्यक्ष,
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,
जिल्हा शाखा सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत