
🌻 रणजित मेश्राम
भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारताला नेहमी ‘हिंदुस्थान’ म्हणतात. ‘भारत’ कधीच म्हणत नाहीत. असे का असेल ? भारत हा संविधानस्वीकृत (lndia that is Bharat) शब्द आहे. हे न म्हणण्याचे कारण कळायला हवे.
राहुल गांधींचा स्वभाव लक्षात घेता , ते अकारण बोलत नाहीत. त्यांचे प्रत्येक वक्तव्य सहेतुक असते. ते पक्व राजकारणी आहेत. याअर्थी , हिंदुस्थान का म्हणतात ते कळायला हवे. अथवा भारत का म्हणत नाहीत हे तरी कळावे.
बऱ्याच कांग्रेसजनांना हे हिंदुस्थान प्रकरण पसंत नाही. ते नापसंती व्यक्त करतात. पण नेत्याला कोण सांगेल ? ही कोंडी होत असावी. विरोधी पक्षाला हे हिताचे आहे. ते दुर्लक्ष करतात. कांग्रेसचे प्रवक्ते अनुल्लेखाने टाळतात. विषय होणार नाही याची काळजी घेतात.
पण परवा (दि २८) सरसंघचालकांनी विषय केलाच. पार्श्वभूमी केरळची होती. ते तिथल्या अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या आयोजनात बोलत होते. सरसंघचालक म्हणाले , भारताला भारत च म्हणा. तीच आपली ओळख आहे. भारत हे सर्वनाम आहे. त्याचे भाषांतर करु नये. इंडिया म्हणू नये. आपल्या बोलण्यात , लिहिण्यात , व्यक्तिशः असो की सार्वजनिक ठिकाणी भारताला सर्वांनी भारतच म्हटले पाहिजे.
ते पूढे असेही म्हणाले , भारतीयत्व म्हणजे केवळ नागरिकत्व नव्हे. ती एक दृष्टी आहे. धर्मावर आधारित ही दृष्टी धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष सांगणारी आहे.
अर्थात , सरसंघचालक भारतीयत्वाला हिंदुत्वाकडे नेतात हे यातून स्पष्ट होते.
राहुल गांधी यांचा मात्र घोळ होतोय. मानसिक द्वंद्वातून ते अजून सुटले नाहीत. वेळ बराच गेला. ते अर्धवट सोडतात. हिंदुस्थान म्हणतात आणि भारतीयत्व पाहतात. इथे गोची होतेय. जानवे दाखवले. गोत्र सांगितले. डुबकी मारली. तरीही हिंदुस्थानची वारंवारची गरज ?
यापेक्षा लोकांना भूमिकेवर आणणे , अधिक हितावह . जिकीरीचे आहे पण भक्कम आहे. एकाच वेळी दोन विभिन्नतांना आपलेसे करणे हितावह नसते. फसगत होणारच ! राजकारणही संस्कारित करता येते. ते अधिक हिताचे !
केवळ पोस्टर मधून भारत नव्हे .. ताकदीने भारत म्हणावे व म्हणायला लावावे !
० रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक समीक्षकांना अभ्यासक आहेत
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत