” व्याख्याता मी, पुनर्वसन केंद्राचा.!”

देतो मी व्याख्यान जिवाच्या आकांताने,
नशेमुळे उध्वस्त झालेल्या जिवांना,
अंतर्गत उर्मीने,
रक्त आटवतो, समजवून सांगण्यात, दुष्परिणाम व्यसनाचे,
वाटोळे संसाराचे,
रणांगण घराचे,
चेहरे केविलवाणे मुलांचे,
अन हतबल मुखडे, माता, पित्याचे.!
दाखवतो आरसा ,
संसाराच्या वाताहतिचा,
शरीर, मेंदूच्या दुष्परिणामांचा,
सामाजिक बदनामीचा,
अन अपमानित जगण्याचा,
ऐकतात नशाग्रस्त शांतपणे,
गरीब गाय भासतात,
देतात दाद, टाळ्या पीटून,
येस सर म्हणतात,
तेव्हा सहाजिकच मनात येते,
किती नम्र पाखरं आहेत ही.!
मग प्रश्न पडतो ,
कंटाळलेल्या कुटुंबियांनी,
ह्यांची रवानगी पुनर्वसन केंद्रात का केली ?
अष्टौप्रहर नशेच्या डोहात बुडालेले,
व्यसन पूर्तीसाठी,
घराचा आखाडा करणारे,
निष्क्रियतेने धुंदीत भटकणारे,
जबाबदारीचे विस्मरण झालेले,
तर कधी नशेसाठी, बिनदिक्कत,
चोरी करणारे,
कुटुंबीयांना हैराण करून,
जीव नकोसा करणारे,
नशेबिगर अस्वस्थ होऊन,
माशासारखी तडफडणारे,
जिवंतपणी घराचा नरक करणारे,
हे शापित जीव,
नशा मुक्त होतील का?
एव्हढं मात्र खरं, त्यांच्या गैरहजेरीत,
जातात दोन घास, पोटात सुखाने,
विना कटकटीने, भांडणाने,
शांततेचे क्षण,
सुखावून जातात काटकसरीने,
पण आंतरिक उमाळा येतो प्रेमाने,
तु ही असतास जोडीदार या क्षणात ?
मग विरजण पडते आनंदात,
तू असलास तरी कलह,
अन नसलास तरी विरह.!
आहे का जाणीव तुला?
तुझी नशा, बरबाद करते सर्वांना,
तडा जातो, मुलांच्या शिक्षणाला,
संस्काराची उणीव भासते,
त्यांच्या आयुष्याला,
तु तर मिटक्या मारीत खाल्ल्यास पोळ्या आषाढीला,
पण तू नसल्याने,
आम्ही केली एकदशी आषाढीला.!
तुझ्या व्यसनाच्या चिंतेपाई,
आई बाबांचे चेहरे, उदास होई,
प्रापंचिक समस्येने,
पत्नी घायकुतीला येई,
अडचणींना तोंड देता देता,
सर्वांना जीव नकोसा होई,
तुझ्या नशेचे भक्ष,
मुलांचे शिक्षण, भविष्य,
भवितव्य होई. .!
अरे वेड्या, नशेच्या धुंदीतील वर्तनाने,
देव ही कंटाळून जाई,
ना स्वर्ग, ना नरक,
तुझ्या नशिबी येई,
त्रिशंकूगत मधल्या मध्ये,
गटांगळ्या खाई.!
म्हणुन त्याग कर नशेचा,
किरण दाखव, आप्तांना आशेचा,
चेहरा हसतमुख ठेव, जन्मदात्यांचा,
काढ भरून, काळ विरहाचा,
आणून हंगाम, सहकुटुंब वसंताचा,
लाव लळा मुलांना, जिव्हाळ्याचा,
सहकुटुंब फिरायला जा,
पाहून गल्ला खिशाचा,
कर वातावरण तयार,
” आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहीकडे “,
मग बघ, देवचं येतील,
” स्वर्ग सुखाचा,
तुझ्या घराचा पाहायला”.!
स्वर्ग सुखाचा,
तुझ्या घराचा पाहायला.!!
स्वर्ग सुखाचा,
तुझ्या घराचा पाहायला.!!!
अरुण निकम.
मुंबई.
दिनांक…10/07/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत