शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध

शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध का… तुम्ही आम्ही गप्प का ?. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचे सरकारने आयोजिले आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का? याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. ——————- महामार्गासाठी कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतात हा मुद्दा गौण आहे. सध्याच्या कायद्यानुसार महामार्ग किंवा रेल्वे मार्ग करण्यासाठी तसेच धरणांसाठी जमिनी घेताना कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते किंवा पुनर्वसन केले जाते. याविषयी वाद असण्याचे काही कारण नाही. ——————— १) नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग झाला तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला नाही. काही ठिकाणी शेतीचा मोबदला देण्याविषयी वाद होते ते त्या त्या ठिकाणी तेवढे संपले. २)महाराष्ट्रात कोणताही महामार्ग करण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध नाही. ३)सोलापूर – पुणे महामार्ग करण्यात आला त्याला विरोध केला नाही. ४)आत्ता पुणे ते छत्रपती संभाजी नगर महामार्ग करण्यात येणार आहे. त्याला विरोध झाला नाही. ५)समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला नाही. ६)पुणे नाशिक चार पदरी रस्ता गेले कित्येक वर्षे करीत आहेत. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला नाही. ७)पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर म्हणून नवा रस्ता करणार आहेत त्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. ८)मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 17 केला जात आहे त्याला कुठे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध याच्यासाठी आहे की नागपूर ते कोल्हापूरपर्यंत एक महामार्ग झाला असताना याच महामार्गाला समांतर असा दुसरा महामार्ग करण्याची गरज आहे का? एवढाच प्रश्न आहे आणि या महामार्गासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर ते पैसे पुढील 50 वर्ष लोकांनी भरायचे आहेत. वास्तविक हा प्रश्न शेतकऱ्यांचा नाहीच. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे. तो घेऊन ते रिकामे होऊ शकतात. पण खरंतर लोकांच्यावर 86 हजार कोटीचा व्याजासह भ्रुदंडदंड बसविला जाणार आहे. ज्या मार्गावरून लोक ये जा करणार आहेत. त्या मार्गावर जाण्यासाठी किंवा त्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे. कोल्हापूर ते रत्नागिरीला जाता येऊ शकतं आणि कोल्हापूर वरून गोव्याला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यामुळे या महामार्गाची गरज नसताना करण्याचा अट्टाहास कशासाठी..? तो पूर्ण झाल्यानंतर जवळपास दहापट किंबहुना कायमचा परतावा टोलरुपी कर लोकांना द्यावा लागणार आहे. लोकांच्या डोक्यावर 86 हजार कोटी रुपये कायमचे ओझे कशासाठी ठेवता …..? कारण ज्या शक्तिपीठांसाठी हा महामार्ग केला जात आहे. त्या मार्गावर त्या शक्तिपीठांना जाण्यासाठी आत्ता रस्ते आहेत. कुठेही अडचण नाही. ही बाजू का समजून घेतली जात नाही.
——————- महापूर ———– शक्तिपीठ महापार्गाचा सर्वात मोठा फटका कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांच्यावर बांधण्यात येणारे पूल आणि रस्ते याच्यामुळे तासगाव, पलूस, मिरज, वाळवा, शिराळा, शिरोळ, हातकणंगले. पन्हाळा, करवीर, कागल, भुदरगड, राधानगरी आणि बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी आणि निपाणीया सर्व तालुक्यांमध्ये महापुराचा धोका वाढणार आहे. या भागातील शेती महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे त्यामुळे या तालुक्यांचा संबंध महाराष्ट्राशीच आहे. सांगली, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल आणि कोल्हापूर आदी शहरांना आता महापुराचा तडाखा बसतोच. ही सर्व शहरे या रस्त्याच्यामुळे पूर्णता धोक्यात येतील. ————————– कारण हा मार्ग पद्माळेपासून कृष्णा नदीवरून जाणार आहे. पुढे दानोळीला जात असताना वारणा नदीवरून जाणार आहे. त्याच्यापुढे रुकडी जवळून पंचगंगा नदीवरून जाणार आहे. कागल तालुक्यात दूधगंगा आणि वेदगंगा नदीवरून जाणार आहे. भुदरगड तालुक्यात पुन्हा तो वेदगंगा नदीवरून जाईल. या सर्व नद्यांच्या वरून जाताना किमान 15 ते 20 फुट रस्त्याची भर पडेल आणि हा सर्व परिसर महापूर प्रवण क्षेत्र म्हणून आज धोक्यात आहे. या रस्त्याच्या बाजूने असलेली शेती पाणी साचून खराब होणार आहे. ————————- जर हा महामार्ग करायचाच असेल तर सरकारने टोलमुक्त किंवा टोल न लावता हा रस्ता करून दाखवावा. या रस्त्यासाठी एक रुपयाही टोल घेणार नाही हे जाहीर करावे. महापूर क्षेत्रांमध्ये हा रस्ता पिलर पूल वरून बांधावा. ——————– नागपूर ते कोल्हापूरपर्यंत उत्तम महामार्ग झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील अंकली ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक इतकाच रस्ता करायचा बाकी आहे. हा रस्ता करावा आणि या रस्त्यावरून नागपूरहून येणाऱ्या लोकांना कोल्हापूर मार्गे गोव्याकडे जाण्यासाठी चार-पाच मार्गाने जाता येते. कोकणात उतरल्याबरोबर मुंबई – गोवा महामार्ग तयार झालेला आहे. त्यावरून पुढे जाता येते. हा शक्तिपीठ महामार्ग गरज नसताना 86 हजार कोटी रुपये खर्च करून लोकांच्यावर कर्ज का लादत आहात.? कारण याचा जो खर्च होईल आणि वाढेल, जे व्याज होईल ते सर्व लोकांनी द्यायचे आहे. लोकांच्यावर कर्ज किंवा बोजा टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तो बोजा आम्ही सहन करणार नाही असे म्हणण्याचा अधिकार लोकांना नाही का? ——————– पर्याय ———- महाराष्ट्र जलसिंचन महामंडळ स्थापन करा आणि 86 हजार कोटी रुपये त्याला उपलब्ध करून देऊन पश्चिम घाटामध्ये (सह्याद्री पर्वत रांगा) जी धरणे आहेत. त्यामध्ये भरपूर पाणी शिल्लक राहते. ते सर्व पाणी मराठवाड्याला घेऊन जा. ——————— किंवा ——— 86 हजार कोटी रुपये उभे करून विदर्भातील 131 जलसिंचन प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. किंबहुना काही जलसिंचन प्रकल्पाची कामे सुरू पण झालेली नाहीत. ती तातडीने पाच वर्षात पूर्ण करा. ती पूर्ण केली तर विदर्भातील 14 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
इतकी जमीन जर ओलिताखाली आली, तर संपूर्ण देशाला कापड पुरवण्याचं काम विदर्भ करू शकेल. इतक्या मोठ्या प्रमाणात विदर्भात कापूस उत्पादन होईल. त्या कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग धंदे विदर्भात उभे करा. विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या अशी काही चांगली काम करण्यासाठी पाऊले उचला. लोकांच्यावर बोजा टाकून राज्यकारभार करणारे कसले राज्यकर्ते…? लोकांच्यावर बोजा टाकण्याऐवजी लोकांचे उत्पन्न वाढेल आणि राज्याचा कर वाढेल, राज्याचे दरडोई उत्पन्न वाढेल, याच्यासाठी गुंतवणूक करा. खरे तर हा प्रश्न शेतकऱ्यांचा नाहीच हा तुम्हा आम्हा सर्व लोकांचा आहे कारण आपल्या गाड्या धावणार आहेत आणि आपल्याकडून पैसे वसूल करणार आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला मिळाला तर त्यांचा प्रश्न मिटला उलट आपण या विरुद्ध लढले पाहिजे पण आपण शहरी लोक विकासाच्या गप्पा मारत बसलेलो आहोत याला विकास म्हणत नाहीत याला विनाश म्हणतात. ——————— वारणा नदीवर चांदोली येथे 1100 कोटी रुपये खर्च करून बांधलेले धरण..! त्या धरणाच्या पाण्यावर आज दहा हजार कोटीचे शेती उत्पादन होते आहे. एक वेळ गुंतवणूक (वन टाइम इन्वेस्टमेंट ) अकराशे कोटी रुपये केल्यानंतर दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांचे उत्पादन वाढले आहे. ———————– जरा अर्थशास्त्राचा विचार करून राज्यकारभार करावा. अशा राज्यकर्त्यांना आपण निवडून दिलेले असल्यामुळे आपणास हे भोगावे लागते आहे ही चूक खरंतर जनतेचीच आहे. ——————— या कामाचे कंत्राट कोणातरी केंद्रातल्या मोठ्या भेंड्याच्या नातेवाईकाला द्यायचे आहे अशी एक कुजबुज ऐकायला मिळते अजून कंत्राट निघालेले नसल्यामुळे नावे समजत नाहीत पण कोणीतरी मंत्री आणि त्याचा मुलगा असल्याचे समजते —वसंत भोसले ज्येष्ठ संपादक कोल्हापूर / सांगली. (सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांना पाठवा )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत