उद्देशिकेतील समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे शब्द हटवा- अशोक सवाई

(संविधानावर घाला)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दत्तात्रेय होसबाले की होसबले नावाचा मनुष्य प्राणी दिल्लीत संविधानाच्या उद्देशिकेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द असावे की नसावे यावर विचार झाला पाहिजे. असं बोलून गेला. नाही नाही असं बोलून देशात आग लावून गेला. बरं हा माणूस कोणत्याही संविधानिक पदावर नाही. म्हणून त्याला संविधानाच्या उद्देशिकेवर बोलण्याचा अधिकार उरत नाही. तरीही त्याने आपलं लंगडं घोडं दामटण्याचा प्रयत्न केलाच. संविधानाला कट्टर विरोध हे रा. स्व. संघाचे जुनेच जहर व जुनाच आजार आहे. आग लावणाऱ्यांसाठी विदर्भात एक म्हण आहे *मेमटा घेतो चिमटा, जावून बसतो कोनटा, आग लागली देशात की, दूरून गंमत बघतो एकटा* (मेमटा म्हणजे मुकाट्याने कोनटा म्हणजे कोपरा) तर या गड्याने देशात आग लावली. आणि गुपचूप नागपूरच्या रेशीम बागेत जावून बसला. त्यानंतर त्या आगीला हवा देण्याचे काम शिवराज चव्हाण जे केंद्रीय कृषिमंत्री आहेत व देशाचे उपराष्ट्रपती जगदिप धनकड जे दोघेही सद्ध्या संविधानिक पदावर विराजमान आहेत यांनी व भाजपाच्या चेलेचेपेट्यांनी केले. आणि देशात आग पसरत गेली. जगदिप धनकडांनी तर कमालच केली ते म्हणाले समाजवाद और धर्मनिरपेक्ष ये दो शब्द नासुर की तरह चुभते है। हे धनकडांचे बोल जेष्ठ पत्रकार निरंजन टकले आपल्या युट्युब चॅनेल वर उजागर करतात. खरच धनकडांची कमाल आहे बुवा! संविधानिक पदावर बसून संविधानावरच जहरी टीका? काय म्हणावं अशा वक्तव्यांना शब्द चुभतात तर मग संविधानाची शपथ घेवून संविधानिक पदावर कशाला जावून बसले? आधिच म्हणायला पाहिजे होतं की समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द संविधानाच्या उद्देशिकेतून हटवल्या शिवाय मी शपथ घेणार नाही. म्हणजे चीत भी मेरी और पट भी मेरी. हे कसं शक्य होईल? खरं म्हणजे कडव्या हिंदूत्ववादी सरकारच्या समोर धनकड स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी पेश करून पुढील राष्ट्रपती पदावर डोळा ठेवून आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या राजकारणात अतिउच्च पदावर पोहोचण्यासाठी अशा हिकमती कराव्या लागतात. मग देशात आग लागो की देश खड्ड्यात जावो अशा स्वार्थी लोकांना त्याच्याशी काही देणे घेणे नसते. भारताचे संविधान जर कोणीही बारकाईने वाचले तर त्यांच्या लक्षात येईल की समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द संविधानाच्या प्रत्येक कलमात, कलमांतील प्रत्येक वाक्यात व वाक्यातील शब्दात सामावलेले आहेत.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान देशाला सादर केले व २६ जानेवारी १९५० रोजी ते साऱ्या देशभर लागू करण्यात आले. त्याआधी संविधान सभेतील विद्वान सदस्यांच्या शंका व प्रश्नांचे त्यांचे समाधान होईपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पक उत्तरे दिलीत. त्यानंतर सविधान त्यावेळच्या सरकारने स्विकारले, विरोधी पक्षांनी स्विकारले आणि देशानेही स्विकारले. सन १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध झाल्यावर भारताने युद्ध जिंकले. त्यानंतर इंदिरा बाईंनी पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तानाचे दोन तुकडे करून बांगला देशाची निर्मिती केली. ही सल पाकिस्तानाच्या मनात अजूनही सलत आहे म्हणून तो भारताच्या काश्मीर खोऱ्यात आतंकवादी सारख्या अतिशय निंदनीय कारवाया करून भारताला अस्थिर करण्याचे काम करत आहे. नंतर पाॅंडेचरी व चीनचा डोळा असलेले सिक्कीम भारतात सामील करून घेतले. भारताने पहिली अणुचाचणी १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे केली. त्यावर पश्चिमी देश नाराज झाले. त्यामुळे त्यांचा भारतावर रोष होता. देशात विरोधकांनी इंदिरा सरकारच्या विरोधात रान उठवले होते. नंतर इंदिराबाईंच्या सरकारने राष्ट्रपतींकडे शिफारस करून २५ जून १९७५ रोजी देशात घोषित आणिबाणी लागू केली. त्याच काळात जयप्रकाश नारायण सारख्या नेत्यांनी इंदिरा सरकारच्या विरोधात उग्र आंदोलने सुरू केले. जयप्रकाश नारायण सरळ सरळ लष्कर व पोलीसांना आव्हान करत होते की, सरकारचे कोणतेही आदेश मानू नका. यामुळे देशात भयंकर अराजकाची स्थिती माजून पुन्हा एकदा देशाचे तुकडे झाले असते. किंवा याचा फायदा उचलून देश पुन्हा साम्राज्यवादी देशांच्या गुलामीत गेला असता. अणूचाचणीमुळे जे देश भारतावर नाराज होते त्यांचीही मनिषा हीच होती. विरोधकांनी देशात अजून जास्त उन्माद माजवू नये म्हणून सरकारने त्यांची धरपकड करून जेलमध्ये डांबले. यात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, जयप्रकाश नारायण, जाॅर्ज फर्नांडिस सारखे दिग्गज नेते होते. अटलबिहारी वाजपेयी तब्येतीचा हवाला देवून दवाखान्यात आरामात राहू लागले होते. नंतर इंदिरा सरकारने १९७६ ला ४२ वी घटना दुरुस्ती करून संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट केले. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संदेश देण्यात आला.भारताचे निश्चित धोरण स्पष्ट करण्यात आले. भारत एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य देश आहे ज्यात व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता अधोरेखित केली आहे. विद्यमान सरकार व सरकारचे अंधभक्त २५ जून हा आणिबाणी लागू झाल्याचा काळा दिवस मानतात. त्याना त्यामागचे खरे कारण काय होते हे कळण्यासाठी वरील घटनाक्रम थोडक्यात लिहावा लागला. त्याचबरोबर भारताचे निश्चित धोरण काय असेल हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समजावे यासाठी उद्देशिकेत समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द जोडण्यात आले. ही खरीद कारणे आहेत अंधभक्तांनो आणिबाणी लागू करण्याची. व उद्देशिकेत वरील दोन शब्द जोडण्याचे. संविधान अंमलात आल्यापासून तुमच्या पूर्वजांनी जाती धर्माच्या नावाने उन्माद माजवला नसता तर कदाचित उद्देशिकेत वरील दोन शब्द आले ही नसते.
भाजपात आमदार खासदारां सहित अनेक अंधभक्त लोक व आयटी सेलवाले का आहेत याची कारणे खालीलप्रमाणे देता येतील. भाजपचे स्वतःचे एक संविधान आहे. फार मोठे नाही एखाद्या पुस्तिकेच्या रूपात आहे. हे संविधान भाजपचे संस्थापक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या सारख्यांनी तयार केले. त्यात पान नं. १,३५,३६ वर स्पष्टपणे समाजवाद, धर्मनिरपेक्ष व एकात्मता शब्द लिहलेले आहे. एवढेच नाही तर भाजपाचे सदस्य होण्यासाठी एक फाॅर्म आहे तो भरताना त्यात लिहावे लागते की मी समाजवाद, धर्मनिरपेक्षता व एकात्मता यांना मानून त्यावर निष्ठेने अंमल करेल. अशी प्रतिज्ञा घ्यावी लागते. हे भाजपाचे संविधान किरकोळ सदस्यांनी सोडा भाजपाचे बडेबडे पदाधिकारी, त्यांचे आमदार, खासदार, मंत्रीसंत्री यांनी देखील कधी वाचले असावे असे वाटत नाही. वाचले असते तर त्यांनी उद्दशिकेतील समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द हटवण्याचे व संविधान बदलण्याचे देशद्रोही वक्तव्ये केले नसते. भाजपवाल्यांनो पहिले आपल्या संविधानातील उपरोक्त शब्द तर हटवून दाखवा नंतर उद्देशिकेतील समाजवाद व धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी जोर लावा. बघा तुम्हाला जमते का? वरील माहिती जेष्ठ हिंदी पत्रकार नवीन कुमार यांनी आपल्या आर्टिकल 19 या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून उजागर केली. ज्यांना कोणाला शंका असल्यास त्यांनी भाजपच्या वेबसाइटवर जावून तपासून घ्यावे. अंधभक्तीचे कारणे – १) व्यक्तिपूजा २) आपला नेता म्हणेल ती पूर्व दिशा ३) राजकारणाच्या अभ्यासाचा अभाव ४) सामान्य ज्ञानाचा अभाव त्यामुळे बेताल वक्तव्ये करणे ५) अशा वक्तव्यांना समर्थकांकडून खतपाणी मिळणे ६) भाजपचा माणूस असल्याचा गर्व ७) नेत्यांच्या चुकीच्या वक्तव्यांवर टाळ्या पिटणे ८) नेत्याला प्रश्न विचारण्याची हिंमत नसणे ९) भक्तांवर वरिष्ठांचा अंकुश नसणे १०) आपल्या सदविवेक बुद्धीचा वापर न करणे ११) आपला स्वाभिमान गहाण ठेवणे १२) संबंधितांचा आर्थिक लाभार्थी होणे. अशी बरीच कारणे आहेत अंधभक्त होण्यामागचे. असो.
आता एक गंमत सांगतो बघा. मी दोन-तीन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पाणीपट्टी भरण्यासाठी गेलो होतो. पिंचिंमहानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. तर तिथे गेलो. एका खिडकीत पाणीपट्टीचा भरणा भरला व दुसऱ्या खिडकीतून भरणा भरल्याची पावती घेतली. पावती बरोबर मला संविधानाच्या उद्देशिकेची प्लास्टिक कोटेड प्रत भेट देण्यात आली. उद्देशिकेच्या खालच्या भागात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ महापालिकेचे बोधचिन्ह आहे. त्यासमोर ठळक अक्षरात छापले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका. त्याखाली छापले भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षपुर्तीनिमित्त सस्नेह भेट. आता बोला! भाजपच्या लोकांनीच संविधानाच्या उद्देशिकेतील समाजवाद व धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याचे देशद्रोही वक्तव्ये केले होते त्यांच्या गालावर भाजपच्याच लोकांनी मारलेली ही जोरदार चपराक होय. तर अशी ही गंमत आहे. वरील स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल पिंचिंमहानगरपालिकेचे नक्कीच कौतुक करून धन्यवाद दिले पाहिजे.
भाजप सरकारने पुन्हा मुलांवर हिंदी भाषा शिकण्यासाठी सक्ती केली पुन्हा हिंदी विरूद्ध प्रादेशिक भाषांचा झगडा सुरू केला. दक्षिण भारतात यांचे सक्तीचे राजकारण चालत नाही म्हणून ते महाराष्ट्रात आले. त्यांना वाटले इथे आपलेच सरकार आहे इथे आपली सक्ती बिनबोभाट चालेल पण इथे शिवसैनिकांनी (उद्धव वाले) त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यातून एका गुजराती दुकानदाराला बत्काळले. म्हणजे त्याच्या थोबाडीत मारून मारहाण केली. करण त्याने मराठी माणसाला हिंदी वरून चिडवण्याचा प्रकार केला होता. आर एस एस व भाजपवाले निरंतरपणे समाजविरोधी वक्तव्ये करून समाजमन कलुषित करण्याचे काम करतात. खोलवर विचार केला तर लक्षात येते की, त्यांच्या मनात एक प्रकारची अनाहूत भीती आहे. त्या भीती पोटीच ते बेताल वक्तव्ये करून बहुजन समाजाला विस्कळीत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. बहुजन समाज पूर्ण ताकदीने एकत्र येऊन आपल्या विरोधात उठाव करेल ही भीती त्यांना हमेशा सतावत असते. त्यामुळे ते शांत झोपूही शकत नाहीत. परंतु यामुळे राज्यै व देश अस्थिर होतो याचे त्यांना सोयरसुतक नसते.
आता पुणे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवाचे नाव देण्यात यावे अशी मागणी समोर आली आहे. वा जी वा… क्या बात है? पेशव्यांच्या इतिहास सर्वश्रुत आहे. पुणे ही पेशव्यांची सांस्कृतिक (?) राजधानी होती असे म्हणतात. आताही ती आहे. पण पेशव्यांची नाही तर महाराष्ट्राची आहे. पेशव्यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. ते शुर होते, दानशूर होते. ते आपल्या रमण्या मध्ये गरींबांसाठी जेवणाच्या पंगतीच्या पंगती उठवत असत. पुण्याच्या शनिवार वाड्यात ते सांस्कृतिक खेळ खेळत होते त्याला वयाचे बंधन नव्हते. महिलांविषयी ते अतिशय आदर सन्मान राखून होते. इतका की स्त्रियांशी बोलताना ते आपली नजर जमिनीकडे झुकवून बोलत असत. गावकुसाबारे राहणाऱ्या शेवटच्या घटकां बद्धल त्यांच्या मनात अपार दया करुणेचे भाव होते. इंग्रज दरबारी जरी ते काम करत असले तरी त्यातून मिळाणारा पैसा समाजातील शेवटच्या घटकातील वंचीत पिडीत लोकांच्या कल्याणाकरिता खर्च करून त्यांना उन्नत करण्याचा प्रयत्न करत होते अशा पेशवाचे नाव पुणे स्टेशनला देणे म्हणजे पुण्याचे भाग्य फळफळण्या सारखेच आहे. पुढे बाजीराव पेशव्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी ही प्रयत्न करावे. पुण्याला बाजीराव पेशवाचे नाव देण्याची मागणी समोर आल्यावर जीवाला खूप बरं वाटलं हो… लवकरच ती मागणी फलद्रूप व्हावी हीच आमची अंतर्मनातील सदिच्छा आहे. पुण्याला बाजीरावचे नाव समोर आल्यावर लगेच पुण्याच्या बुधवार पेठेत पोस्टर झळकले. मग बुधवार पेठेचेही नाव बदलून मस्तानी पेठ ठेवा.
याच दरम्यान लोकमत या युट्युब चॅनेल ने एक सर्वे केला त्यात लोकांना प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न होता पुण्याला श्रीमंत बाजीरावांचे नाव द्यावे की नाही. त्यात ३१% लोकांनी होय म्हटले. हे ३१% वाले नेमके कोण असतील हे वेगळे सांगायची गरज नाही. तर तब्बल ६९% लोकांनी नाही म्हटले. म्हणजेच बहुसंख्य लोक सपशेल नाही म्हणतात. याचाच अर्थ असा की आमच्या ६९% लोकांवर तुमचा जबरदस्तीचा निर्णय थोपवू नये. हे वर्चस्ववादी लोक ज्याला त्याला त्यांच्याच लोकांचे नाव देण्याचा घाट घालतात. उदा. शिक्षक दिन कोणाच्या नावाने आहे? दोणाचार्य पुरस्कार कोणाच्या नावाने आहे? अर्जुन पुरस्कार बघा. भारतरत्न बघा १% सोडले तर सारी ब्राह्मणांची भरती आहे. त्यामागे त्यांचे हे म्हणणे असावे की आम्ही इथलेच आहोत. पण इतिहास हा हमेशा खरं खरं बोलत अरसतो. त्याला खोटं बोलण्याची सवय नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.
– अशोक सवाई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत