
🌻रणजित मेश्राम लेखक प्रख्यात विचारवंत अभ्यास साहित्यिक समीक्षक आहेत
आपले प्रधानमंत्री उच्चांकवीर आहेत. त्याबाबत थोर म्हणावे ! नवनवे उच्चांक त्यांना आवडतात. आता सर्वाधिक काळ देशाबाहेर असणारे प्रधानमंत्री , हा उच्चांक होतोय. अर्थात एका दौऱ्यात !
अधिक वेळा देशाबाहेर जाणारे , हा उच्चांक आधीच असावा. हा नवा होतोय.
प्रधानमंत्री २ जुलै ते ९ जुलै विदेशवारीवर आहेत. चक्क ८ दिवस !
भारतीयांचे राज्यारोहण झाल्यानंतर हा नवा उच्चांक घडतोय. याआधी कोणतेच प्रधानमंत्री इतका दीर्घ काळ घराबाहेर नव्हते ! 'मेरा क्या .. झोला उठाके .. कभीभी चला जाऊंगा .. हे कामी येतेय ! मजेत फिरत आहेत. जग कवेत घ्यायला. देशसुदृढ करायला. देशउंची वाढवायला. अपार कष्ट घेत आहेत.
या वारीत ते घाना , त्रिनिदाद , टोबैगो , अर्जेंटिना , ब्राझील व नामिबिया या देशांना जातील. ब्राझील येथे ‘ब्रिक्स संमेलन’ असणे हे निमित्त आहेच !
का फिरतात ? विचारायचे नाही. विपक्ष अधूनमधून विचारतेय. तसेही विचारणे बंदच आहे. परराष्ट्र धोरण , वेगवेगळे करार , जगस्थिती समजणे यासाठी जाणे आलेच ! याबाबत पी एम कर्तव्यदक्ष आहेत.
गेल्या ११ वर्षात ते ९० वेळा जगात गेले. शतकाला केवळ दशकाची कमी आहे. लगेच ती पूर्ण होईल. ९० वेळा हाही विक्रम आहेच !
एका फेरीत ते दोनचार देशात पाय टेकतातच. काही देशात वारंवार गेले आहेत. अमेरिकेला पाचदा जाऊन आले आहेत. फेऱ्याच सांगायच्या झाल्यास .., २०१४ ला ७ , १५ ला ५ , १६ ला १४ , १७ ला ७ , १८ ला १३ , १९ ला ११ , २० ला कोवीड मुळे नाही , २१ ला ३ , २२ ला ७ , २३ ला ६ , २४ ला ११ व २५ ला ६ झाल्यात. सातवी सुरू आहे.
जगात १९५ च देश आहेत. जग कमी पडायला लागलेय.
लठ्ठ रकमेचे नवेकोरे विमान घेतलेय. ते कामी येतेय. ते फिरतीवर असतेय. परराष्ट्र धोरण कितपत हितकारी झाले ? होईल. धीर धरावा.
नुकतीच कॅनडा येथे जी-७ शिखर परिषद झाली. भारत आमंत्रित होते. मोदीजी गेले. सहभागी देशप्रमुखांचा ‘ग्रुप फोटो’ जगभर प्रसारित झाला. मागच्या रांगेत मोदी उभे पाहून संकोच वाटला.
फोटोत अमेरिका , कॅनडा , इटली , जर्मनी , फ्रान्स , जपान , ब्रिटन आणि आस्ट्रेलिया , भारत , ब्राझील , मेक्सिको , दक्षिण आफ्रिका , दक्षिण कोरिया व यूक्रेन चे प्रमुख आहेत. फोटोत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिसत नाहीत. ते परिषदेला आले होते. युध्दस्थिती पाहून मधातच सोडून गेले.
नुकतेच एक वृत्त आलेय. पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिकार अहमद हे सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष झाले. असे भारी वृत्त भारतासंदर्भात येत नाही. सध्या आपण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १० अस्थायी सदस्यात नाही. आधी होतो. सदस्य बदलत राहतात.
आता अल्जिरिया , गुयाना , कोरिया , सिएरा लियोन , स्लोव्हेनिया , डेन्मार्क , ग्रीस , पाकिस्तान , पनामा व सोमालिया हे देश आहेत.
स्थायी सदस्यात चीन , फ्रान्स , रशिया , इंग्लंड , अमेरिका हे पाच देश आहेत. यांना ‘बिग फाईव्ह’ म्हणतात. यांचेकडे VETO अधिकार आहे. कोणताही मसूदा ते रोखू शकतात.
बात आपल्या पी एम ची आहे. सध्या विदेशात आहेत. १४३ कोटी लोकांचे प्रमुख आहेत. चांगला विचार करुया.
वारीतील पहिला देश घाना आहे. आफ्रिकेत आहे. दिल्ली इतकी जनसंख्या असलेला. प्रवास सुरू आहे. चार देश बाकी आहेत.
विदेशवारी म्हटली की खर्च आहेच. जाहिरात खर्च वेगळा. आतापर्यंत किती खर्च झाला असेल ? होऊदे. चांगले करार घडतील. नाते जुळतील.
करारावर विकसित होणारा स्वप्नांचा नवा भारत घडतोय. घडूदे.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत