
🌻रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक समीक्षक आहेत
इतक्या वर्षानंतरही हा देश तसाच ? उद्विग्नता आलीय. डोळे पाणावले.भयंकर राग आला.
ओडिशा , गंजम जिल्ह्यातील ही घटना. अलीकडेच घडलेली. बेचैन करून गेली. सख्ख्या भावांसोबत घडले. एक किलोमीटर अंतरावर दोघेही राहतात. अंधारलेला दोघांचाही निवारा. गरीबीचे जगणे. ते बोलत होते. भीती भिनलेली दिसली. घाबरून खचून गेलेले. बोलतांना आधी रडायचे.
दलित असणे हा त्यांचा पहिला गुन्हा. सोबत गाय असणे हा दूसरा गुन्हा. गुन्ह्यांची निर्मम ‘सजा’ मिळाली.
ते सांगत होते. रडतभाकत सांगत होते. लग्नात मुलीला गाय द्यायची असते. ती प्रथा आहे. तेव्हा ते जमले नाही. आता पहिल्यांदाच मुलगी माहेरी आली. आता बेत केला. आता ते करावे. बाप सांगत होता. भावाला सोबत घेतले. शेजारच्या गावातून गाय विकत घेतली. ती आणत असतांना .. ! हे संकट कोसळले. तो गुन्हा ठरला.
वाटेत लोकांनी अडविले. कोण तुम्ही ? ही गाय कशी ? गायतस्करीचा संशय घेतला. आमचे ऐकेचना. एकदम शीक्षा सुनावली.
उभे अर्धमुंडण केले. मारले पिटले. वरात काढली. घुटण्यावर चालायला लावले. गवत खायला दिले. ते खावे लागले. रस्त्यात वाहता नाला लागला. नाल्याचे पाणी प्यायला लावले.
शेवटी कशीबशी सुटका झाली. पोलिसात तक्रार झाली. पोलिसांनी उरलेले अर्धे केस काढायची सोय केली. सांगतांना ते हादरत होते. आठवणींनी भयभीत होते.
आता कळते , १२ लोकांना यासंबंधी अटकेत घेतलेय. ते गोरक्षक असल्याचे बोलले जाते.
सध्या ओडिशात भाजपचे सरकार आहे. तेव्हापासून असे रक्षणहार बरेच निर्माण झाले आहेत !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत