गरीबीची स्वीकृती ;भयंकर .. महाभयंकर !

रणजीत मेश्राम लेखक जेष्ठ साहित्यिक विचारवंत अभ्यासक समीक्षक आहेत
गरीबीची स्वीकृती (acceptance) वाढतेय. छुपाछुपी ती येतेय. अदृश्य लाटेसम. पण वेगाने येतेय. हे भयंकर .. महाभयंकर आहे. वेळीच दखल नसेल तर कोसळणे आहेच !
आकडे .. निर्देशांक खुणावतातच. भोवताल त्याहून दाहक आहे. सोबत अक्षरउदासिता येतेय. निरक्षर , अल्पसाक्षर , सिमित शिक्षण प्रमाण वाढलेय. अंधार असा गडद होतोय. लोकनिष्ठा संपल्यागत झालीय. २०२५ चे हे जीवनचरित्र आहे. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही !
विषण्ण व्हावे असे प्रसंग रोज सापडतात. हतबल .. हतबुद्ध होऊन जायचे. गठ्ठ्याने माणसं या खाईत दडपली जात आहेत. केवळ शरीराने वाढलेली. भयाने ग्रासलेली. अन्याय सहणारी. पोटप्रश्नातच गुंतलेली. तिथेच संपणारी. पिढी जन्माला यावी. सद्यशासनस्थांना अशी पिढी हवी. सारे चित्रविचित्र आहे. भयावह आहे. कसा हा विकास. झगमगाट विरुद्ध ठणठणाट. कोणती ही अर्थव्यवस्था ? कसे हे राज्य ?
विकासाला मानवी चेहरा असतो. इथे बिनचेहऱ्याचे चाललेय. भयात असणे. स्वप्न नसणे. अघोषित अपंगालयच !
तरीही मुले जन्माला घालावी. सततचा आग्रह असतो. जनसंख्या फुगत जाते. ती फुगते की सुजते ? हिंदू मते वाढली. ते तसे समाधान. गरीबी ढीगाने वाढली. त्याचे काय ? पूजास्थळे याचनाकेंद्रे झालीत. चिंता जड झाली की लोटांगण येतेय. असेच चाललेय.
शाळा ओस पडल्यात. मजबुरीने वा अनिच्छेने. आता शिक्षण सक्तीही नाही. तसे धोरणही नाही. निधीही नाही. सरकार अंगावर घेत नाही. जन्माला घालता. तुमचे तुम्ही पहा. ‘कल्याणकारी राज्य’ बंदीखान्यात सडतेय. असेच चाललेय.
भयता जगण्याचे अंग झालेय. असंघटित क्षेत्र अजगरासारखे पसरले. त्यात कंत्राटगिरी ! माणसांचे बाजार (ठिय्ये) वाढले. रेजा , कुली , मिस्त्री ! रोजगार निश्चितीची निश्चिती नाही. कामाचे अस्थायित्व. किती तास काम ? मोजमाप नाही.ते बांधकाम क्षेत्र असो वा हंगामी कामे. महिन्याचे , वर्षाचे वा दोन-तीन वर्षाचे. अस्थायी झोपड्या असतात. मुलें शाळाविहिन वाढत असतात. पूढे तो मजूर पुरवठा होतो. हेच अकुशल मनुष्यबळ ! दुष्टचक्र असे फिरत राहते. शारीरिक श्रम जन्माला येत असते.
कुंभमेळ्याची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा (भोसले) सांगते , शाळेत गेलीच नाही. आता पश्चात्ताप येतो. चर्चा मात्र देखण्या डोळ्यांचीच ! तिचा बाप म्हणतो. मीही शाळा पाहिली नाही. बापलेक दोघेही निरक्षर. तो झापुकझुपूकवाला सुरज चव्हाण ही निरक्षर असल्याचे सांगतो. कोणाला काही वाटत नाही. गरीबाचं लेकरू आहे. जिंकवा .. वाढवा असे बोलले जाते.
ऑटोचालकाची मुलगी तहसीलदार झाली. ठळक बातमी होते. जणू नवल आहे. आधी हे सामान्य होते. गरीबीच्या स्विकृतीचे छुपे पोषण असे असे आहे. ध्यानातही येत नाही.
अशातच , कोणत्या ना कोणत्या पूज्य स्थळाला वा पुतळ्याला निधी उपलब्ध होतांना दिसतो. जगणे मात्र अती अवघड झालेले असते.
नुकतेच ६ मे च्या मंत्रीमंडळ बैठकीत ५ हजार ५७३ कोटी खर्चाला मंजुरी देण्यात आली. यात , चोंडी येथील अहिल्यादेवी स्मृतिस्थळ ६८१.३२ कोटी , अष्टविनायक गणपती मंदिर १४७.८१ कोटी , तुळजाभवानी देवी मंदिर १,८६५ कोटी , ज्योतिबा मंदिर २५९.५९ कोटी , त्र्यंबकेश्वर मंदिर २७५ कोटी , कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर १,४४५ कोटी व श्री क्षेत्र माहुरगड ८२९ कोटी यांचा समावेश आहे.
असे असतांना उपराजधानी नागपुरचे पहा. मागील १० वर्षात मनपाच्या ६० शाळा बंद झाल्या. शाळा भुखंडांचे माॅल झाले. स्मारक झाले. सार्वजनिक उपक्रम झाले. इ लायब्ररी झाल्या. मनपा कार्यालये झाली. काहींच्या इमारती भाड्याने दिल्या. काही बेवारस पडून आहेत.
माहितीच्या अधिकारात ही माहिती उघडकीस आली. काय ही अनास्था ? मुले खाजगी शाळांत जात असतील काय ? ते झेपेल काय ? मनपा पसंत नाही की शिकतच नाहीत ? शिक्षक , शिक्षकेतर , सारेच घटले. घोळ नक्की आहे.
परत एक धक्कादायक वाचनात आले. गोंदियाचे आहे. चार इयत्ता अन् चारच विद्यार्थी ! कऱ्हारटोला येथील प्रसिद्ध जिल्हा परिषद शाळेत चारच विद्यार्थी शिकतात. पहिली ते चौथी वर्ग असतांना ! यंदा केवळ एकाच विद्यार्थ्याने प्रवेश घेतला.
अशीच अवस्था या जिल्ह्यातील १,०३८ जिल्हा परिषद शाळांपैकी अनेक शाळांची असल्याचे छापून आहे.
काय समजावे ? भीषण विषमता. धोरणांची अस्पष्टता. बेरजी राजकारणाची मत्ता. विकत घ्यायची वाढलेली क्रयता. अन् हताश .. निराश जनता ! असा हा चकवा आहे.
सामान्य माणसाचा ‘से’ राहीला नाही. तो दाखवावा लागेल.
आधी यांना , अशांना सत्ताच्युत करणे हा प्रारंभिक उपाय होऊ शकतो. कदाचित अंतिमही !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत