“राजकारण्यांच्या श्रेयवादाचे बळी.!”

आय. पी.एल. च्या स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंज बेंगळुरू संघाने सतत 18 वर्ष झुंज दिल्यानंतर, त्यांना विजेतेपद मिळाले. त्याचा आनंद सर्वांनाच झाला. मी सर्वानाच अशा अर्थाने म्हणतो की, आताच्या काळात, संघ कर्णधार विराट कोहली हा देशामध्ये सर्वांत लोकप्रिय खेळाडू आहे. त्याच्या चाहत्यांची लक्षणीय संख्या भारतासह जगभर आहे. म्हणुन त्याच्या संघाने जेतेपद मिळविले आणि देशभरात जल्लोष झाला. ते सहाजिक आहे. परंतु हा संघ कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या “बंगळुरु” नावाशी निगडित असल्यामुळे, त्या राज्यात इतर ठिकाणांपेक्षा जास्त जल्लोष झाला. मंगळवारी रात्री 11.30 वाजता हा सामना संपून कोहलीचा संघ विजेता म्हणुन घोषित झाला. तो विजयी सोहोळा साजरा करण्यासाठी, काही तासांच्या अवधीत कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे चेन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला. त्याला अलोट जनसमुदाय लोटणार.
तिथे प्रचंड गर्दी होणार. हे कुणीही सांगू शकले असते. त्या गर्दीला काबूत ठेवणे. ही जिकिरीची गोष्ट होती. त्यासाठी आवश्यक त्या नियोजनासाठी अवधी मिळणे आवश्यक होते. परंतु घाईघाईने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या
गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी, आवश्यक ते नियोजन करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे नियोजनात त्रुटी राहिल्या. म्हणुन त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिथे
अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लोक जमा झाले. त्यामुळे प्रचंड रेटारेटी झाली. त्यात जीव गुदमरून 11 जणांचा बळी गेला. हा आकडा वाढू शकतो. तसेच 50 पेक्षा अधिक लोक मृत्यूशी झुंज देत औषधोपचार घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत. हा झाला घटनाक्रम.
आता प्रश्न असा पडतो की,
संबंधित संघाचा कर्नाटक राज्य सरकारशी काय संबंध आहे? तो संघ खाजगी फ्रॅन्चायझीच्या मालकीचा आहे. हा समारंभ मालकांनी आयोजित करणे अपेक्षित होते. मग सिद्धरामय्या सरकारला इतकी घाई का झाली? इतक्या कमी वेळेत, नियोजनशुन्य समारंभ आयोजित करण्याची गरज होती का ? त्यांनी हा आटापिटा कशासाठी केला?
या अगोदर देशात अशाप्रकारचे सोहळे साजरे झाले नाहीत का? त्याची खूप उदाहरणे देता येतील. 1971 साली अजित वाडेकर ह्यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून, परतलेल्या विजयी भारतीय संघाची मुंबई विमानतळापासून खूप लांब पल्ल्याची आणि प्रचंड गर्दीची मिरवणूक कोण विसरेल? त्यांचा सत्कार समारंभ ही तितकाच दिमाखदार झाला. तेव्हापासुन 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे निघालेली प्रचंड मिरवणूक,
सत्कार समारंभ अशा घटनांची पुष्कळ उदाहरणे देता येतील. परंतु आतापर्यंत कधीही आणि कुठेही
अशा प्रकारची मन सुन्न करणारी घटना घडली नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे की, जिथे क्रिकेटर आणि क्रिकेट, तिथे हमखास गर्दी. हे समीकरण माहीत असून देखील इतक्या घिसाडघाईने हा कार्यक्रम का आयोजित केला? ह्या आनंदाच्या क्षणात, आपल्या आवडत्या खेळाडू सह आनंद व्यक्त करण्यासाठी
प्रचंड गर्दीची खात्री असताना, त्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यास पोलीस दलाला आवश्यक अवधी का दिला नाही? ह्या घटनेला जबाबदार कोण? त्याची नैतिक जबाबदारी आतापर्यंत कुणी का स्विकारली नाही? विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ह्यांनी तर सांगून टाकले की, स्टेडियमची क्षमता 35, 000 इतकी असतांना, तिथे अडीच, तीन लाख लोक जमा झाल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला. म्हणजे बेसुमार गर्दी होणार हे त्यांना माहीत नव्हते का?
हा सत्कार समारंभ इतक्या घाईघाईने आणि नियोजनशून्य पद्धतीने आयोजित करण्यास एकच कारण आहे ते म्हणजे राजकारण्यांना संधीचा अचूक फायदा करून घेण्याची अतिशय घाई असते. “पळा, पळा, कोण पुढे पळे तो” ह्या उक्ती नुसार सर्वांत आधी सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे श्रेय घेण्यासाठी ही घाई केली गेली. त्याची शेखी पुढील काळात मिरवण्यासाठी हे बळी दिले असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण क्रिकेट हा खेळ आणि तो खेळणारे क्रिकेटपटू हे कायम भारतीयांच्या गळ्यातले ताईत
आहेत. भारतियांना क्रिकेटची फक्त आवड नसून, त्याचे वेड आहे. भले ही एखाद्या व्यक्तीला, त्या खेळातील ओ की ठो कळत नसेल, पण तो तन्मयतेने दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने पाहतो. त्यात समरस होऊन आनंदी होतो. भारतीय संघ पराभूत झाल्यास, स्वतः पराभूत झाल्याचे दुःख होते. किंवा एखाद्याची ऐपत असेल तर सामन्याचे तिकीट काढून, प्रत्यक्ष सामना बघण्याचा आनंद घेतो. स्टेडियममध्ये असे अज्ञानी लोक खूप भेटतील. पण खेळ प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसतो. कर्नाटक सरकारने नेमके हेरले. त्याचे श्रेय घेण्यासाठी घिसाडघाईने हा कार्यक्रम आयोजित केला. ह्याबाबत पोलीस दलाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण इतक्या मोठ्या समारंभाचे, योग्य नियोजन करण्यासाठी अवधी आवश्यक असतो. तो पोलीस प्रशासनाला मिळाला नाही. ह्याला जबाबदार फक्त कर्नाटक राज्य सरकार आहे. आता त्यांनी म्हणे चौकशी समिती नेमली आहे. माझे तर असे म्हणणे आहे की, आपल्या देशात आतापर्यंत किती चौकशा समित्या नेमल्या? त्याचे फलित काय निघाले? ह्या समित्यांची चौकशी करण्यासाठी, एक नवीन चौकशी समिती नेमून, त्यातून काय निष्पन्न झाले? ह्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी करायला पाहिजे.असे म्हंटले तर तर तो विनोद होणार नाही.आजपर्यंत अगणित चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत.
शेवटी काय! तर जाणाऱ्यांचा
जीव गेला आणि जे जखमी होऊन उपचार घेताहेत, त्यांच्या नशिबात पुढे काय लिहून ठेवले आहे? हे आताच सांगणे कठीण आहे. किमान पुढच्या काळात तरी राजकारण्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करू नये. ते काम संघाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांचे आहे किंवा आय. पी. एल. सारख्या फ्रॅन्चायझी सारख्या मालकांचे आहे. त्यांना संधी दिलीत, तर ते नियोजन पूर्वक कार्यक्रमाची आखणी करून, त्याची योग्य ती अंमलबजावणी करून, कार्यक्रमाला गालबोट न लागता,
यशस्वी करतील. त्यामुळे असे प्रसंग निश्चितपणे टाळता येतील. संबंधित क्रिकेट संघटनांस मी फार फार तर विनंती करू शकतो की, अशा कार्यक्रमांना राजकिय व्यक्तींना सन्मानाने उपस्थित राहण्यास विनंती करा.
अरुण निकम.
9323249487.
दिनांक…05/06/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत