आंबेडकर कशासाठी हे साहित्यसूत्र व्हावे !प्रख्यात पत्रकार प्रा रणजित मेश्राम यांचे आवाहन

(नागपूर दि११) – ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकर मांडतांना किंवा सांगताना आंबेडकर कोण? आंबेडकर कसे? काय सांगितले यावरच सारा भर असतो. आंबेडकर कां ? कशासाठी? हेच नेमके सांगितले जात नाही. खरेतर आजची तीच गरज आहे. यापूढे आंबेडकर कशासाठी? हे आंबेडकरी साहित्याचे साहित्यसूत्र व्हावे असे आवाहन आंबेडकरी भाष्यकार व ज्येष्ठ पत्रकार प्रा रणजित मेश्राम यांनी इथे केले.
ते आंबेडकराईट मुव्हमेंट आफ कल्चर एन्ड लिटरेचर संस्थेने दिलेला जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना बोलत होते.
हिंदी मोर भुवन येथील मधुरम सभागृहात खचाखच भरलेल्या उपस्थितीत झालेल्या या वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी समाजकल्याण उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षणतज्ञ राजाभाऊ टाकसाळे हे विराजमान होते. प्रारंभी संस्थेची भूमिका विशद करणारे प्रास्ताविक अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी विशद केले. संचलन संस्थेचे सचिव डॉ मच्छिंद्र चोरमारे हे करीत होते.
आपल्या धीरगंभीर आवाजात बाबासाहेब गेल्यानंतर उपस्थित झालेल्या आव्हानात्मक स्थितीचा आढावा घेत रणजित मेश्राम बोलत होते. ते पूढे म्हणाले , बाबासाहेबांविषयी श्रध्दा असणे हे मान्य केले तरी त्यांचे वेगाने होणारे दैवतीकरण फार धोक्याचे ठरणार आहे. मार्क्सवादात जसे व्यक्तिगत मार्क्स नसतो. त्याचे विचार व आजच्या संदर्भात उपयोजन हेच नेमके असते. तोच मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल.
पूढे ते असेही म्हणाले , नेता ही संज्ञा वा संकल्पना सध्या टवाळकीचा विषय झाला आहे. कार्यकर्ता व संघटना हीही बाब दुय्यम झाली आहे. नेता , कार्यकर्ता , संघटना या संज्ञा जर आंबेडकरी समूहातून बाद झाल्यातर सारी बजबजपुरी माजेल. त्याची चिन्हे सध्याही दिसत आहेत. आपण देव ही संज्ञा नाकारली , नेता ही संज्ञा कधीच नाकारलेली नाही. बाबासाहेब आंबेडकर हे अनेक अंगांनी थोर होते, त्यातही आधी ते थोर नेते होते हे कधीही विसरता येत नाही. हे सांगतांना त्यांनी अस्पृश्यांचा नेता कोण यावरुन गांधी आंबेडकर झालेल्या संघर्षातील काही प्रसंग सांगितले.
धम्मदीक्षेच्या प्रसंगात झालेल्या वार्तापरिषदेत प्रस्तावित रिपब्लिकन पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले होते , पक्षाला कणखर नेत्याची गरज असते याकडे लक्ष वेधले.
अत्यंत देखण्या अशा या राज्यस्तरीय पुरस्कार समारंभात वेगवेगळे पुरस्कारही देण्यात आले. यात प्रा प्रविण बोरकर (वसंत मून वैचारिक पुरस्कार) , चंद्रकांत वानखेडे (बाबूराव बागुल कथा पुरस्कार) , शेषराव पिराजी धांडे (नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार) , भारत सातपुते (दया पवार आत्मकथन पुरस्कार) , विरेंद्र गणवीर (अश्वघोष नाट्य पुरस्कार) यांचा समावेश होता. यासर्वांनी याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.
हा सोहळा संपन्न व यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भूपेश थुलकर, कोषाध्यक्ष सविता कांबळे , सहसचिव सुरेश वर्धे आणि महेंद्र गायकवाड, सुदेश बोलते , राजन वाघमारे , पल्लवी जीवनतारे , रमेश सोमकुवर, गौरव थुल यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी राजन वाघमारे यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी जबरदस्त उपस्थिती होती.
🌞
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत