स्वीकारलेल्या धम्माला साजेशा सामाजिक पुनर्बांधणीसाठी दिशादिग्दर्शन करण्याची जबाबदारी साहित्यिकांची

– प्रा. आनंद देवडेकर
सोलापूर दि.३ मे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शोषित वंचितांच्या मुक्ती लढ्याचे अंतिम ध्येय व्यवस्थेने लादलेल्या शेकडो वर्षांच्या सर्वांगीण पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविणे हे होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजीच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या ऐतिहासिक घटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीतच हे ध्येय साध्य केलं असून बाबासाहेबांच्या पश्चात स्वीकारलेल्या धम्माला साजेशा सामाजिक पुनर्बांधणीसाठी दिशादिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वतःला आंबेडकरी प्रेरणेचे साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या साहित्यिक विचारवंतांची होती, असे परखड प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी सोलापूर येथील पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनात बोलताना केले.
बौद्ध साहित्य मंडळ, सोलापूर यांच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी एक दिवसीय प्रथम बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर स्थित हुतात्मा स्मृती मंदिरात लुम्बिनी साहित्य नगरीत संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनातील ” धर्मांतरोत्तर सामाजिक पुनर्बांधणीसाठी आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्यिकांची भूमिका कितपत पोषक” या विषयावर आयोजित परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या घणाघाती भाषणात पुढे म्हणाले की अनेक आघाड्यांवर एकाकी लढताना डॉ. बाबासाहेबांनी विषयानुषंगिक काही अर्थपूर्ण विधाने केलेली आहेत. त्या विधानांचं अर्थनिर्धारण करण्याची तसदी न घेतल्यानं आंबेडकरी प्रेरणेतून लेखन करण्याचा दावा करणार्या साहित्यिकांची भूमिका काही सन्माननीय अपवाद वगळता धर्मांतरोत्तर काळातील सामाजिक पुनर्बांधणीस पोषक ठरण्याऐवजी नवदीक्षित बौद्ध समाजास संभ्रमित करणारी ठरली आहे. नवदीक्षित बौद्ध समाजातील लिहित्या हातानी हिंदू धर्मातील अनिष्ट चालिरीतींच्या सुधारणा आणि सुधारकांवर लिहिण्याचा रतीब घालण्यापेक्षा स्वीकारलेल्या धम्माला साजेसं नवनिर्माण करण्यासाठी लेखणी झिजवली असती तर आज आदर्श बौद्ध समाज उभा राहिलेला दिसला असता असेही प्रा. देवडेकर आपल्या भाषणाचा शेवट करताना म्हणाले.
या परिसंवादात प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे आणि प्रा.डॉ. एम. डी. शिंदे यांचीही अभ्यासपूर्ण भाषणे झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत