डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पालि भाषेचे तज्ज्ञ होते ! – प्रा. विजय मोहिते

मुंबई दि.१७ एप्रिल:
एकूण नऊ भाषांवर प्रभुत्व असलेले भाषाकोविद डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पालि भाषेचे तज्ज्ञ होते इतकेच नव्हे तर आपल्या एकूणच व्यस्त आयुष्यात त्यांनी पालि भाषेचे व्याकरण लिहिले असून बाबासाहेबांनी पालि शब्दकोश निर्मितीच्या कार्याचाही आरंभ केला होता असे प्रतिपादन सिद्धार्थ महाविद्यालयातील पालि भाषेचे प्राध्यापक प्रा.विजय मोहिते यांनी वांद्रे, मुंबई येथील चेतना महाविद्यालयात बोलताना केले.
चेतना महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीनं प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी जयंती निमित्त डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ‘ पालि भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ या विषयावर प्रा. विजय मोहिते बोलत होते, अध्यक्षस्थानी सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर हे होते.
प्रा. विजय मोहिते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास होत असताना ‘ भाषातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ हा पैलू अभ्यासकांकडून नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे.
या स्मृती व्याख्यानास प्रामुख्याने उपस्थित असलेले चेतना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. श्रीदत्त हळदणकर आणि चेतना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय जगताप यांचीही जयंतीनिमित्त शुभेच्छापर भाषणे झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रवर्तक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, बुद्ध कालीन भारताचा खराखुरा इतिहास सुरक्षित ठेवणाऱ्या पालि भाषेला केंद्र सरकारने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालि भाषेशी संबंधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य लोकांसमोर यावे या उद्देशाने हे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रा. चंद्रकांत चिकणे आणि प्रा. डॉ. कैलाश लांडगे यांनी सादर केलेल्या बहारदार भीमगीतांनी उत्साहवर्धक वातावरणात सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती पवार यांनी केले. तर अध्यासनाच्या माध्यमातून चेतना महाविद्यालयात चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपप्राचार्य प्रा. गिरीश साळवे यांनी करून दिली. प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय डॉ. कैलाश लांडगे यांनी करून दिला. तर आभारप्रदर्शन प्रा. गजानन डोंगरे यांनी केले. चेतना वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निकुंभ यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील बहुतांश प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध नियोजनाची जबाबदारी अध्यासनाच्या सर्वच सदस्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत