
रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षक आहेत
देशाचे राजकारण गंभीर वळणावर आहे. बिहारचे निकाल हे वळण अधिक स्पष्ट करतील. वर्षअखेर बिहार राज्यात विधानसभेची निवडणूक होईल.
सध्या जदयूचे नितीशकुमार हे मुख्यमंत्री आहेत. नवव्यांदा ते मुख्यमंत्री आहेत. दहाव्यांदासाठी पुन्हा अडले. जदयू-भाजपा दोस्ती आहे. नुकतेच भाजपने पुन्हा नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील हे स्पष्ट केले. जदयुचा केंद्रात असलेला पाठिंबा चमत्कार करून गेला.
भाजप दोन उपमुख्यमंत्र्यांवर गप्प झालीय. तशी भाजप सभागृहात ‘मोठा भाऊ’ म्हणावी. संख्याबळ ७८ आहे. त्यातुलनेत जदयुकडे ४५ आहेत. विजयकुमार सिन्हा व सम्राट चौधरी हे ते उपमुख्यमंत्री होत. पहिले भूमिहार व दुसरे कुशवाह समाजाचे आहेत. प्रदेशाध्यक्ष डॉ दिलीप जायसवाल हे आहेत. सत्तेचे जातलाभार्थी करण्यावर भाजपचा भर आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने तीन वेगवेगळ्या जातीचे मंत्री दिले. जाततुष्टीकरणावर भाजप अशी लक्ष ठेवून आहे.
आक्टोबर २०२३ ला घोषित झालेल्या जातगणनेचे पडसाद भाजपने असे सारीपाटावर घेतले.
बिहार आजारी असले तरी देशदिशा देण्यात पटाईत आहे. जातगणना करणारे पहिले राज्य ठरावे. ती घोषित करणारेही पहिले आहे. २०२३ च्या गांधी जयंतीला जातगणना घोषित केली. तत्क्षणी बिहारचे राजकारण पार बदलून गेले.
आता त्या राज्यात आरक्षणधारकांना ‘मुफ्तखोर’ ‘फुकटे’ कुणी म्हणत नाहीत. एरवी ‘आम्ही टॅक्स पेयर्स’ने देशाची गच्ची पकडली होती. तो आवाज आता बंद झाला. आम्ही ४० टक्के, आमचे ऐकलेच पाहिजे, ‘सेव्ह इंडिया,सेव्ह मेरिट’ फुस्स झाले.
ताज्या जातगणनेत १३ कोटीच्या बिहारात खुल्या (अनारक्षित) वर्गाची संख्या केवळ १५.५२ टक्के म्हणजे केवळ २ कोटी निघाली. तिथेच हा चाप बसला.
‘जितनी जिसकी संख्या भारी, उतनी उसकी भागिदारी’ भारी झाले आहे.
कां असे घडले ? कारण जातगणनेत पिछडा वर्ग २७.१२ व अति पिछडा वर्ग ३६.१ इतका निघाला. म्हणजे एकूण ओबीसी वर्ग ६३.२२ टक्के दणकून आहेत. त्याखालोखाल अनुसूचित जाती १९.६५ व अनुसूचित जमाती १.६८ टक्के आहेत. परिणामी संपूर्ण राज्याच्या केंद्रस्थानी ओबीसी आणि दलित हे आले आहेत. त्यातही पहिल्या क्रमांकावर ‘पिछडा’ आहेत.
त्यामुळेच नितीशकुमार यांना झेलणे भाजपला बाध्य झालेय. तेजस्वी यादव ह्यांचे भविष्य भक्कम होण्याची शक्यता बळावलीय. कांग्रेसने राजेशकुमार हे नवे प्रदेशाध्यक्ष दिले. राजेशकुमार चर्मकार समाजाचे आहेत.याशिवाय तरुण नेते कन्हैयाकुमार ला पूढे केले.
संपूर्ण बिहार राज्यात अलीकडे यात्रा , पदयात्रा, जागरण सभा यांची धूम आहे. मुख्यमंत्र्यांची प्रगती यात्रा, कन्हैयाकुमारची ‘पलायन रोको, नोकरी दो’ यात्रा व रणनितीकार प्रशांत किशोर यांची जनसुराज यात्रा लक्षवेधी आहेत.
रणनितीकार प्रशांत किशोर यांचा अचानक निवडणूक बिहारप्रवेश अचंबित करतो. ते कसून भिडलेत. सर्व माध्यमे त्यांना प्रचंड प्रसिद्धी देत आहेत. पुर्णियाचे खासदार पप्पू यादव विचारतात, प्रशांत किशोर कडे इतका पैसा आला कुठून ? ते एका चर्चित धनीचे नाव घेतात. शिवाय ही भाजपची ‘बी’ टिम असल्याचा आरोपही करतात. सर्व आरोपांना खुमासदार पध्दतीने प्रशांत किशोर उत्तरे देतात. मुळात ते हुशार आहेतच.
याचवेळी तेजस्वी यादव यांची लोकमान्यता दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. ते पण सतत फिरत आहेत. राबडी देवीही सभागृहात ठणकावून बोलतात. इंडिया गठबंधनची एकत्र मिळून लढण्याची शक्यता वाढलेली दिसते. सी-व्होटर्स च्या नुकत्याच शोधात तेजस्वीकडे बिहारची सत्ता जातांना दिसते.
सध्या सभागृहात राष्ट्रीय जनता दल – ७९, भारतीय जनता पक्ष – ७८, जनता दल युनायटेड – ४५, कांग्रेस – १९, कम्युनिस्ट (डावे)- १६ , हम – ४ असे बलाबल आहे. विधानसभा एकूण २४३ ची आहे.
दरम्यान , मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे शारीरिक-मानसिक स्वास्थ्य बिहारात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री सतत असंबद्ध वागतात. समाज माध्यमात ते प्रसारित होऊन जाते. राष्ट्रगान सुरू असतांना ते याच्याशी त्याच्याशी बोलतांना दिसतात. केंव्हाही कुणाच्या गळ्यात पडतात. पाया लागतात. केंव्हा काय बोलतील याचा नेम नसतो.
अशी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी असावी काय ? मेडिकल रिपोर्ट ची मागणी होत आहे. पण भाजप नितीशकुमारला सोडायला तयार नाही. त्यांना त्यांचे नाव व सत्ता वापरून घ्यायचीय. चिराग पासवान तर कडेवर आहेतच. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश नंतर बिहारला हिंदुत्वाची पाठशाळा करायची, हे भाजपचे स्वप्न आहे.
हे स्वप्नभंग केवळ तेजस्वी यादव करु शकतो हे भाजप व तेजस्वी दोघांनाही ठाऊक आहे. एक सांधा नितीशमार्गे हिंदुत्वाकडे व दुसरा सांधा तेजस्वीमार्गे धर्मनिरपेक्षतेकडे अशी ही निकराची मतलढाई बिहारात होणार आहे.
अर्थात खांदाबदल केवळ सत्ताबदल नसेल. तो सांधाबदल ठरेल. मग तो राज्यासाठीच कां ? देशासाठीही ठरू शकेल !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत