महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
खरचं विजेचे दर कमी होतील?

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
रविवार दि. 9 मार्च 2025.
मो.नं. 8888182324.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत घोषणा केली की, नवीन विज धोरणांतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना व जे दिवसा विज वापरतील त्यांना 10 टक्के वीज दरात सवलत दिली जाणार आहे. हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवू शकतील. आणि यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला हातभार लागेल. जी विज 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे. राज्यातील 70 टक्के ग्राहक हे 0 ते 100 युनिट वीज वापरणारे आहेत. सरकारच्या नव्या योजनेनुसार या ग्राहकांना सौरउर्जा प्रकल्पांतर्गत वीज मोफत मिळणार आहे. यासाठी अनुदान मिळणार असून याचा दिड कोटी ग्राहकांना वीज बिलाचा भार सहन करावा लागणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घोषणा जरी चांगली असली तरी प्रत्यक्षात खरचं विज दर कमी होतील का?
कारण, महावितरणने विज दरवाढीचा प्रस्ताव विज नियामक आयोगाकडे पाठविला असून तो मंजूर होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावात त्यांनी असे म्हटले आहे की, जे ग्राहक सौरउर्जा प्रकल्प उभारतील त्यांना फक्त 100 युनिटच विज वापरता येईल. जादा तयार होणारी विज महावितरणला 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे विकावी लागेल आणि त्यांना 100 युनिटच्या वर विज हवी असल्यास तिच विज महावितरणकडून 17 रुपये प्रति युनिट प्रमाणे विकत घ्यावी लागेल. म्हणजे आपण खर्च करुन सौरउर्जा प्रकल्प उभारायचा, विज उत्पन्न करायची आणि तिच विज महावितरणला स्वस्त विकून महाग विकत घ्यायची असा नवीन फंडा महावितरणने तयार केला आहे.
सरकारच्या माहितीनुसार 70 टक्के ग्राहक 0 ते 100 युनिट विज वापर करतात. म्हणजे या ग्राहकांना अनुदान देऊन सौरउर्जा प्रकल्प उभारायचे आणि त्यांची तयार होणारी जादा विज इतर ग्राहकांना विकायची असा याचा अर्थ होतो. शिवाय जे ग्राहक स्वखर्चाने सौरउर्जा प्रकल्प उभारतील त्यांच्याकडून सक्तीने 100 युनिटच्या वर असलेली विज 3 रुपये इतक्या कमी किंमतीत वसूल करुन त्याच ग्राहकाला ती 17 रुपयात विकली जाईल हे अन्यायकारक आहे. तसेच 100 युनिट विज वापरणाऱ्या ग्राहकाला 500 रुपये येणारे बिल त्यावर विज वापर झाल्यास 1500 रुपये बिल येणार आहे. हा त्या ग्राहकांना फार मोठा शॉक असेल. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विज दर स्वस्त करण्याची केलेली घोषणा आणि महावितरणने विज नियामक आयोगाकडे विज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव या दोन्ही बाबी परस्परांशी निगडीत आहेत. मग खरचं विज स्वस्त होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल की, सौरउर्जा प्रकल्पाच्या आडून ग्राहकांची लूट होईल हे येणारा काळच ठरवेल. ✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत