कुत्र्याचे नाव “शंभू” ?

ज्ञानेश महाराव
“छावा” चित्रपटातील छत्रपती संभाजीराजे यांचा औरंग्यानी मुत्युदंड देताना जो छळ केला ; त्या अनुषंगाने विधान परिषदेत बोलताना शिवसेना ज्येष्ठ नेते व आमदार ॲड. अनिल परब यांनी, सत्ताधारी पक्षाकडे बोट दाखवित “यांच्यापैकी एकाने आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवले आहे ,” असे सांगितले. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. हमरीतुमरी झाली. सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात हे नेहमीचेच झालेय. ह्या निमित्ताने दोन गोष्टी आठवल्या.
१) विश्वनाथ प्रताप सिंह हे १९८९ ते ९० ह्या काळात देशाचे प्रधानमंत्री होते. त्याआधी त्यांनी “राजीव गांधी सरकार”मध्ये असूनही “बोफोर्स” तोफा खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठवला. मंत्रीपदाचा राजीनामा देत “काँग्रेस” पक्षही सोडला. “जनता दल”मध्ये प्रवेश केला. त्यांच्या ह्या दगाबाजीचा शकुंतला परांजपे यांना खूप राग आला होता. शकुंतला परांजपे म्हणजे “कुटुंब नियोजन कार्याच्या प्रचारक – प्रसारक!” लेखिका व अभिनेत्री. (जन्म : १७ जानेवारी १९०६; निधन : ३ मे २०००) गणितज्ञ ‘ रँग्लर’ परांजपे यांच्या कन्या. नाटककार सई परांजपे यांच्या मातोश्री. त्यांना राग येण्याचे कारण म्हणजे त्या “काँग्रेसी” नव्हत्या ; तरीही त्यांच्या कार्याची थोरवी लक्षात घेऊन “काँग्रेस”ने त्यांची १९५८ ते ६४ ह्या काळात महाराष्ट्र विधान परिषदेत “आमदार” म्हणून आणि १९६४ ते ७० ह्या काळात केंद्रीय राज्यसभेत “खासदार” म्हणून नियुक्ती केली होती. त्या बोलण्या – वागण्यात तिखट होत्या. पुण्यात राहायच्या. त्यांना मांजरं पाळण्याचा छंद होता. विश्वनाथ प्रताप सिंह प्रधानमंत्री होताच; त्यांनी तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या तीन मांजरांच्या पिल्लांची नावं विश्वनाथ, प्रताप, सिंह अशी ठेवली होती. घरी कुणी आलं की, त्या ही तिन्ही नावे एकत्रित पुकारीत. त्या सरशी ती तिन्ही मांजरं त्यांच्याजवळ धावत येत. त्यांचं हे विश्वनाथ प्रताप सिंह विरोधी रागाचं प्रात्यक्षिक मी पाहिले आहे.
२. “संयुक्त महाराष्ट्र लढा”तील आघाडीचे शाहीर अमर शेख हे थोर कवीही होते. ह्याची साक्ष “कलश” आणि “धरणीमाता” ह्या त्यांच्या दोन कवितासंग्रहातून मिळते. “धरणीमाता”मधील “माझी माय आहे मरहट्टी” ह्या कवितेत मराठी भाषेची थोरवी जपण्यासाठी ते लिहितात –
माझी माय, आहे मरहट्टी
ती माझी, मी तिच्यासाठी –
तिने मजवरी, जीव लाविला
मी ओवाळुनी, जीव टाकिला !!१
तिचे नि माझे, अभंग नाते
धजे कोण, त्या तोडायाते-
जरा तिचा अपमान जाहला
रोखीन मी त्या, कळीकाळाला!!२
अशा हिमतीने “महाराष्ट्र – मुंबईत मराठी बोलणे – शिकणे आवश्यक नाही. घाटकोपरची भाषा मराठी आहे!” असे बौद्धिक प्लस ब्रह्मज्ञान पाजळणाऱ्या रा. स्व. संघाचे सरसंघकार्यवाह भय्याजी जोशी यांना फटकारले पाहिजे. मराठींना नामोहरम करून मुंबईवर घाला घालण्याची ही खोड समूळ नष्ट व्हावी, यासाठी आपण मराठी भाषेचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे. ह्या अट्टहासानेच अमर शेख लिहितात –
श्वान – मांजराला रे कोणी
नका “बोलवू” मराठीतुनी
श्वान – मांजरांसाठी काही
माझी माय मराठी नाही!!३
कारण –
स्वातंत्र्यप्रिय माय मराठी
विलसे जिजाऊ – शिवराया ओठी
भक्तिरसाचा मळा फुलवुनी
गाते मानवतेची गाणी!!४
हाच “मराठी बाणा” क्षणोक्षणी आठवावा आणि पदोपदी दाखवावा! महाराष्ट्र धर्म जागवावा!! जय मराठी!!!
@ – ज्ञानेश महाराव
७.३.२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत