अ. भा. म. साहित्य. व विद्रोही साहित्य संमेलन.अशोक सवाई

(दोन संमेलने)
देशाची राजधानी दिल्ली शहरात नुकतेच ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्षा होत्या जेष्ठ साहित्यिका ताराबाई भवाळकर. या संमेलनाचे उद्घाटक प्रधानमंत्री होते तर स्वागताध्यक्ष मा. शरद पवार होते. संमेलनाध्यक्षांनी आपल्या भाषणात अभिजनांना न रूचनारे खडे सवाल उपस्थित केले होते. शेवटी कुणाची तरी त्यांना चिठ्ठी आली की भाषण आटोपते घ्यावं. पण त्या आधी त्या भाषणाच्या प्रस्तावनेत म्हणाल्या ज्यावेळी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली त्या वेळी काही ठराविक वर्गासाठी हे साहित्य संमेलन होते. अशा विशिष्ट वर्गासाठी असलेल्या संमेलनाला महात्मा फुलेंनी म्हटले होते हे घालमोडे दादांचे संमेलन आहे. ज्यात सर्वसामान्य लोकांना स्थान नाही. असे त्यांनी स्वानुभवातून म्हटले होते. आजच्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या तरुणाईला कदाचित ‘घालमोडे दादा’चा अर्थ महित नसेल. त्यांच्यासाठी सांगावे लागेल महात्मा फुले घालमोडे दादा या शब्दाचा वापर का व कुणासाठी करत होते? तर फुले दांपत्य मुली व बहुजन मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करत होते. किंवा बहुजनांच्या समाज हिताचे किंवा त्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. ते कार्य होवू नये म्हणून त्याला वैदिक कर्मठ ब्राम्हण भयंकर विरोध करून अडचणी निर्माण करत असत. म्हणजे चांगल्या कार्यात कर्मठ ब्राह्मण नेहमी मोडता घालत असत म्हणून महात्मा फुले ब्राह्मणांना ‘घालमोडे दादा’ म्हणत असत. बहुजन साहित्यिकां कडून आजही त्या शब्दाचा वापर केला जातो. पण जेव्हा ब्राह्मणांच्या साहित्यांचे खरे अंतरंग बहुजनांना माहीत झाल्यावर त्यांचे संमेलने ओस पडू लागले तेव्हा त्यांनी बहुजन साहित्यिकांना आवतन देणे सुरू केले. पण तिथे बहुजन साहित्यिकांना मनाजोगा वाव मिळत नव्हता (म्हणजे ब्राह्मणां विरोधात विद्रोही साहित्य मांडण्याचा) किंवा मनातून सूप्त असलेले कर्मठांच्या कपाळावर आठ्या पडत असल्याने. मग पुढे त्यातून विद्रोही साहित्य संमेलनाचा जन्म झाला. असो.
पूर्वीचे म्हणजे फार पूर्वीचे नाही. काॅंग्रेस सरकारच्या काळात अ.भा.म.सा. संमेलने हे पेशवाईतील रमण्यांचे आधुनिक रूप होते असे मला वाटते. पेशवाईत पर्वतीच्या पायथ्याशी दरवर्षी श्रावण महिन्यात फक्त पंडित, शास्त्री ब्राह्मणांसाठी हे रमणे भरवण्यात येत असत. मोकळ्या मैदानात चारही बाजूंनी तटबंदीच्या भिंती उभारून त्याला चार दरवाजे असत. दरवाजावर पेशव्यांचे पहारेकरी खडा पहारा देत असत. कशासाठी? तर अस्पृश्य/शुद्र रमण्याच्चा आसपास फिरू नयेत म्हणून हा बंदोबस्त. श्रावणी महिन्यात या रमण्याचा मोठा धिंगाणा चालत असे. ब्राह्मणांच्या पंक्तीच्या पंक्ती जेवणावळ होत असे. तेव्हा तटबंदीच्या बाहेरील जगाशी रमणा संपेपर्यंत वैदिक ब्राह्मणांचा सबंध राहात नसे. यात कोकणस्थ किंवा चित्पावन (प्रबोधनकार ठाकरे त्यांना चित्पावनी म्हणत असत) ब्राह्मणांचा मान मरताब मोठा. पंचपक्वान्न सहसा त्यांच्याच आवडीने व सहमतीने बनवले जात. पक्वान्नावर साजूक तुपाची धार सोडून हा चबिना (चबिना म्हणजे मलिदा, मलिदा म्हणजे खाण्यापिण्याचा अव्वल दर्जाचा माल) ते तुडुंब पोट भरेपर्यंत खात बसत. खाना यांना भयंकर प्रिय. तिकडे गाव कुसा बाहेरच्या महार किंवा तत्सम तेव्हाचे अस्पृश्य वस्त्यांमध्ये गळ्यात मडके, ढुंगणाला झाडू, व कुल्ह्याला घंटी बांधून महार शिळ्या भाकरीच्या तुकड्या साठी भटकत असत. अशी अवस्था पेशवाईने तेव्हाच्या अस्पृश्यांची करून ठेवली होती. महारांच्या थुंकीणे रस्ता बाटू नये म्हणून गळ्यात गाडगे, अनवाणी पायाने रस्ता बाटू नये म्हणून ढुंगणाला झाडू, तो झाडू चालणाऱ्या अस्पृश्य माणसाच्या पाऊल खुना मिटवत जात असे. रस्त्यावर महार चालत आहे याची दुरूनच सुचना मिळावी यासाठी कुल्ह्याला घंटी. चालतांना घंटी आपोआप वाजायची. दुरून ब्राह्मण येत असल्यास इकडच्या अस्पृश्य महाराने रस्त्याच्या दुर होवून खाली बसावे. म्हणजे नैसर्गिक वारा महाराच्या शरीराला स्पर्शून तो वैदिक ब्राह्मणांच्या अंगाला झोंबू नये व महारांची सावली त्याच्या पर्यंत पोहचू नये. कारण या दोन्हीही नैसर्गिक कृतीने भटांना बाट होत असे. अशा अमानवीय, अघोरी कृत्ये ब्राह्मणांनी करून अस्पृश्यांची स्थिती अगदी दयनीय व घृणास्पद करून ठेवली होती जी जगाच्या पाठीवर कुठेही नव्हती.
या रमण्यात मनोरंजनासाठी खास कार्यक्रम होत असत. त्यात तथ्यहीन गप्पा छाटणे, (काही वर्षापूर्वीचे अ. भा. म. सा. संमेलनातून त्यांचे चर्चा सत्रे) तथ्यहीन बेसूर गायन, (त्यांचे कवी संमेलन) फक्त त्यांच्याच हिताच्या आपसात गुजगोष्टी, (तेव्हाचे त्यांचे कथा-कथन) आणि रात्री गाणे-बजावणे अजून काय काय?… तर असा श्रावणात महिनाभर रमण्याचा हैदोस दुल्ला चालत असे. ब्राह्मणांना खुश करण्यासाठी या रमण्याचा खर्च पेशवे करत. काही मनुवादी ब्राह्मणांची पेंशन सुद्धा इंग्रज सरकारच्या तिजोरीतून अदा होत असे. उदा. ‘ते’ माफीवीर साहेब, हो… पेशव्यांच्या वतनी मुलखात पेशवेच त्यावेळच्या शूद्रातिशूद, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यावर मनमानी अव्वाच्या सव्वा कर लादून त्यांच्या घामाच्या पैशातून वसूल करत असत. म्हणजेच त्यांचे बेसुमार आर्थिक शोषण करत आसत व आपली तिजोरी तुडुंब भरत असत. या रमण्याचा खर्च त्याकाळी रु. चाळीस पन्नास हजारां पासून ते दोन लाखांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक चालत असे. या रमण्याच्या शेवटी ब्राह्मणांना भरघोस पेशव्यां कडून सोने-चांदी, पैशाची दक्षिणा देण्यात येई. सर्वात जास्त दक्षिणा कोकणस्थ ब्राह्मणांची त्यानंतर इतर ब्राह्मण. पुढे पेशव्यांच्या भरभराटीच्या काळात ही दक्षिणा बंद होवून खिचडी वाटण्यात येई. डाळ-तांदूळ किंवा उपवासाची खिचडी नाही हो… नवरत्नाची खिचडी. त्यात हिरे, माणिक, मोती, पोवळे, पाचू (पुढचे माहीत नाही) एकत्र मिसळून ती वाटण्यात येई अशी अक्षरशः लूट असे. म्हणजे कष्टाची कमाई बहुजनांची त्यावर मौजमस्ती ब्राह्मणांनी करायची. व मालामाल व्हायचे. ‘१ जानेवारी १८१८ स्वातंत्र्याचे बंड’ या आपल्या पुस्तकात प्रा. विलास खरात पान. नं. ९९ वर लिहितात ‘रमण्यात दक्षिणा हा ३०-४० दिवस चाले. तेथे यथेच्छ जेवणही मिळे व वर पैसेही मिळे, बाहेरच्या राज्यातूनही रिकामटेकडे व ऐतखाऊ ब्राह्मण पुण्यास दक्षिणा मिळवण्यास येत असे.” ते पुढे पान नं. १०० वर लिहितात “रमण्यातून ब्राह्मण सुटले म्हणजे लोक त्यास त्या दिवशी भोजनास बोलावित म्हणजे रमण्यातही जेवण व रमण्यातून निसठल्यावरही जेवण देण्याचा कार्यक्रम, असे हे खादाड व रिकामटेकडे ब्राह्मण, पेशवे हे धरतीवर ओझे म्हणायच! अशा पेशव्यांनी कुठलिही कर्तबगारी न दाखवणे व रिकामटेकडेपणात बायांचा नाच पाहणे, विडे खात एकमेकांच्याबदद्दल वाह्यात गप्पा ठोकणे आणि त्याबद्दल पेशव्याकडून बिदागीसुद्धा!” ते पुढे म्हणतात “ब्राह्मण श्रावणमासात रमण्यात दक्षिणेसाठी जाते या प्रसंगावर रसभरित गाणीही रचण्यात आली.”
‘श्रावण मासी मोठा धडाका ।।
अन्नशांतीचा चालू तडाखा ।।
रमण्यामध्ये छपऱ्या रावट्या ।।
सरोवर सुंदर निर्मळ पाणी ।।
आंबे मोहराचे तांदूळ तिसडी ।।
डाळ तुरीची पिवळी बेगडी ।।
लावण तांदूळ गंडारोकडी ।।
प्रतिपदेपासून चालू खिचडी ।।
षष्ठी दिवसी मुहूर्त वेळी ।।
गज उंटावर वाहे खजीना ।।
मोती पोवळ्यांची ।
वाटून खिचडी रमण्यात आनंद पुण्यात मोहरा पुतळ्याची ।।
खूप गेले शास्त्री पंडित, विद्यामंडित विप्र विद्यार्थी ।
गेले कीर्त गत ते ब्राह्मण
तीर्थी तीर्थी ।।’
तर हे असे आहे.
हे लोक आजही अ. भा. म. सा. संमेलन भरवतात त्याला प्रायोजक शोधतात. शिवाय अर्ध्या कोटीचं सरकारी अनुदान आहेच. यालाच फुकट खाणाऱ्यांचे निरर्थक साहित्य संमेलन म्हणावे. या साहित्य संमेलनांनी बहुजनांचे हित कधीही साधले गेले नाही. या संमेलनात बहुजनांना आमंत्रित करण्याचे कारण वर दिलेच आहे. त्यावेळी भटाळलेल्या बहुजनांना त्यांच्या संमेलनाचे आमंत्रण मिळाले की आभाळ ठेंगणे वाटत असे. व निमंत्रण पत्रिका साऱ्यांना दाखवून मिरवत असत.
मनसोक्त खावून भल्यामोठ्या तक्कियाला रेलून उघड्याबंब तुडुंब भरलेल्या ढेरीवर हात फिरवत कल्पना विलासातून ब्राह्मणी गुलाबी प्रेमकथा लिहणे म्हणजे साहित्य नव्हे. बुद्धांच्या जातक कथा किंवा बहुजनांच्या संत वाड्मयांतून अलंकार, उपमा, किंवा शब्द साहित्य चोरून त्यांनाच भरजरी वस्त्रे नेसवून त्यांना वाक्क्यातील पंक्तीत बसवून गजर करणे म्हणजे साहित्य नव्हे. साहित्याचा हुंकार हा बेंबीच्या देठापासून यावा लागतो साहेब… ज्यांनी कधी उन पावसात कष्ट उपसले नाहीत, पोटासाठी अर्धचंद्र भाकरी साठी सुद्धा संघर्ष करून झगडले नाहीत. त्यांच्या साहित्यात कष्टकऱ्यांचा संघर्ष कसा येणार? मानवी संवेदनाहीन असणाऱ्यां कडून मानवी मूल्यांचे दर्जेदार साहित्य निर्माण होवू शकत नाही. जे होते त्या निव्वळ शाब्दिक उचापती. जे वितभर लाकूड अन् हातभार झिलपी करतात त्यांनाच साहित्य प्रमुख व प्रेमी म्हटले जाते. मुळात जे खरे साहित्य असते ते बुद्धांच्या जातक कथा, संत साहित्य व कष्टकऱ्यांच्या कष्टामधूनच आलेले असते. जे बहुजनांच्या खऱ्या इतिहासची मोडतोड करून आपले हित साधण्यासाठी खोटे पुरावे पेरून खोटा इतिहास लिहू शकतात ते आपला उदोउदो करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी रमणीय साहित्य का निर्माण करू शकणार नाहीत? अन् त्यालाच ते पुरस्कार वगैरे मिळवतात किंवा मिळवून घेतात. त्यांचे अस्सल साहित्य म्हणजे अश्लील साहित्य जे त्यांच्या वेद पुराणात पानोपानी भरले आहे तसीच त्यांची मनोवृत्तीही आहे. त्याची सत्यता इतिहासकार इंद्रजित सावंत यांना अगदी निर्लज्जपणे कमरेखाली शिव्या देवून नागपूरी प्रशांत कोरटकर नावाच्या निच वृत्तीच्या ब्राह्मणाने दाखवून दिली. बहुजनांच्या माहितीसाठी व विचार करायला लावण्यासाठी त्याच्या मत्स्य पुराणातील ब्राह्मणांच्या अश्लीलतेचा एक भाग विद्रोही लेखक दिनकरराव जवळकर यांनी आपल्या *’देशाचे दुश्मन’* या पुस्तकात छापला आहे. ( हे पुस्तक १९२५ साली प्रकाशित झाले होते) बहुजनांनी वरील पुस्तक जरूर वाचावे. खास करून मराठा समाजाने. बघा तर त्यात काय लिहिले आहे.
काही ब्राह्मणांचे काल्पनिक साहित्य म्हणजे रामायण, महाभारत, या कथांनाही त्यांनी बुद्धांच्या जातक कथांचा आधार घेतला. नंतर कृष्ण लिला वगैरे असे व यासारखे बरेच… त्यांच्या या काल्पनिक साहित्याने बहुजनांना येडं पिसं बनवून ठेवलं होतं. काहींवर अजूनही त्याचा अंमल आहे. रामायणात काय आहे? तर रामाकडून सीतेचा पदोपदी घोर अपमान, रामाच्या इशाऱ्यावरून लक्ष्मणाने शूर्पणखेचे कान व नाक कापून तिच्या स्त्री देहाची केलेली घोर विटंबना. महाभारतात भर सभेत दुष्यासनाने द्रौपदीचे बेशर्म पणे केलेले वस्त्रहरण. कृष्णाच्या लिलेने तर कहरच केला. तळ्यात आंघोळीसाठी उतरलेल्या मुली व महिलांचे कपडेच या पठ्ठ्यानं पळविले. काय बोलणार यावर? हे यांचे साहित्य.
महाभारताला तर महाकाव्य म्हणतात हे लोक. या तीन ही काव्यात काय आहे तर निव्वळ स्त्री अपमान, स्त्री देहाची विटंबना, स्त्रीयांचे दुय्यम स्थान, अंधश्रद्धा, चमत्कार असे बरेच… त्यांच्या इतर साहित्यात काही अपवाद असतीलही पण त्यात त्यांची संकुचित व अपराध बोध भावना दिसून येते. काही लोक त्यांच्या साहित्याचा नेहमी उदोउदो करत असतात त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही तुमच्या साहित्यातून आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनावर किती काम केलं? (अपवाद नरेंद्र दाभोळकर) मुलांच्या विज्ञानवादी अभ्यासक्रमासाठी किती काम केलं? (आता तर यांनी मूळ अभ्यासक्रम बदलून ते मनुस्मृतीतील श्लोक वगैरे घुसडण्याच्या तयारीला लागले आहेत. जे तेव्हाचे शुद्र व आताच्या बहुजनांवर सूड उगवणारे आहेत) सामाजिक अनिष्ट प्रथा निर्मुलनावर किती काम केलं? उदा. देवदासी, पोतराज, हुंडा पद्धती, कन्यादान असे अनेक उदाहरणं देता येतील. सणासुदीच्या अनिष्ट प्रथा उदा. नागाला दुध पाजणे, मुलं व तरुणांची जीवघेणी दहीहंडीची प्रथा, महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची प्रथा, दसऱ्याला शस्त्र पुजा, दिवाळीत प्रदुषण फैलावणारे व मुलांच्या शरीराला अपायकारक फटाके, गणपती उत्सवात निरर्थक सत्यनारायण त्यासाठी होम-हवन (या होम हवनात गेले तीन साडेतीन हजार वर्षापासून या देशाची अर्ध्याहून अधिक मौल्यवान नैसर्गिक संपत्ती जाळून खाक केली गेली) किंवा कर्मकांड या सर्वांवर आजपर्यंत किती इमानीपणे प्रबोधन करून काम केले. नसेल तर तुमच्या एकंदर साहित्य व साहित्य संमेलनाचा उपयोग काय? आणि जर त्याचा सामाजिक भल्यासाठी उपयोग होत नसेल तर जनतेच्या कर रूपी पैशातून सरकारने तुमच्या संमेलनाला ५०-५० लाखांचे अनुदान का द्यावे?
त्यापेक्षा सरकारने हे अनुदान बंद करून त्या पैशाचा उपयोग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अप्रकाशित साहित्य आहे ते प्रकाशित करण्यासाठी करावा. आतापर्यंत त्यांचे जेवढे साहित्य किंवा सामाजिक/राजकीय व इतरही लेखन प्रपंच प्रकाशित झाले तेवढच अजूनही प्रकाशित होण्याचे बाकी आहे. त्यांचे हे अफाट अप्रकाशित साहित्य देशाच्याच नव्हे तर अखिल जागतिक मानव कल्याणासाठी उपयोगी येईल. कारण ते निरंतर काळाच्या पुढे असणारे साहित्य आहे. त्यावर देशातील कित्येक युवती/युवक पीएचडी करू शकतील, कित्येक देशातील संशोधक त्यावर संशोधन करू शकतील. त्यातून बहुजनांच्या विद्रोहाला अधिक धार येवू शकेल. (कदाचित याच कारणांमुळे त्यांचे लेखन साहित्य काॅंग्रेस सरकारच्या काळापासून ते आतापर्यंत प्रकाशित केले नसावे) देशातील जनतेच्या कल्याणासाठी भावी योजना त्याद्वारे आखता येतील.
भाकड साहित्य संमेलनावर खर्च करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब यांच्या अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी खर्च करावा व ते लवकरात लवकर प्रकाशित करावे. कारण ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे किंवा काही उपद्व्यापी शक्ती ते नष्ट करण्यासाठी टपले आहेत. केवळ डॉ. बाबासाहेब यांचेच नाही तर ज्या महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्याचे राहिले असेल त्या सर्वांचे साहित्य प्रकाशित करावे. कारण महापुरुषांचे साहित्य हे त्या देशाचे मार्गदर्शक तत्त्वे असतात. आणि ते सर्व एकाच वेळी प्रकाशित करावे. भिजत घोंगडे ठेवू नये. आतापर्यंत ठेवले तसे. कारण राष्ट्राची प्रगती त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असते. या प्रकाशनासाठी सर्व भार सरकारवर न टाकता आम्ही महाराष्ट्रातील जनताही त्यासाठी पुढे येवू. लोकवर्गणी काढून सरकारचा भार कमी करू. पण ते साहित्य प्रकाशित होणे गरजेचे आहे. कारण सुसंस्कृत, सुशिक्षित, सुजान, प्रगतीशील नागरिक हा त्या देशाच्या प्रगतीचा कणा मानला जातो. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिज.
*विद्रोही साहित्य संमेलन*
शासनाचा एक रुपया सुद्धा न घेता विद्रोही साहित्य संमेलन सुरू होत होते तेव्हा त्या संमेलनाचे आयोजक व त्यांची टीम घरोघरी जाऊन मुठभर धान्य व त्या घरातून एक रुपया देणगी घेऊन विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. तेव्हा त्याला काही लोक नाके मुरडायची, काही त्यात काही ऐब शोधण्याचा प्रयत्नात असायचे, काही लोक या संमेलनाचे भवितव्य फार वर्षे टिकणारे नाही अशी बेधडक भविष्यवाणी करून मोकळे होत असत. पण आज त्याची व्याप्ती खूप वाढली. एवढी की अ. भा. म. सा. संमेलनातील श्रोत्यांच्या खुर्च्या ओस पडून इकडे विद्रोही साहित्य संमेलनातील खुर्च्या खचाखच भरू लागल्या. कारण बहुजनांना हे संमेलन आपले वाटू लागले. संमेलनातू सादर होणारे सुख दुख, व्यथा, शोषण, संघर्ष कष्ट, स्त्रियांची घुसमट, जीवाची तगमग हे सारे सारे आपले वाटू लागले त्यामुळे श्रोता वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागला. व अ. भा. म. सा. संमेलनाचे तथाकथित लोक नुसते मुलुमुलू पाहू लागले. यंदाचे १९ वे विद्रोही साहित्य संमेलन दि. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथे पार पडले. त्याचे आयोजक होते सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्या प्रा. प्रतिमा ताई परदेशी व किशोर ढमाले. उत्तरोत्तर या विद्रोही साहित्य संमेलनाची व्याप्ती वाढत जाईल यात शंका नाही. असो
तेराव्या-चौदाव्या शतकात अक्षर ओळख नसलेली (त्यावेळी शूद्रातिशूद्र लोकांसाठी शिक्षण तरी कुठं होतं म्हणा) चोखामेळाची पत्नी सोयराबाई हिने काव्यातून स्त्री विटाळावर तेव्हाच्या ब्राह्मणी व्यवस्थेला खणखणीत विद्रोही खडा सवाल केला होता. त्याचे उत्तर ब्राह्मण ना त्याकाळी देऊ शकले ना आजही नाही देऊ शकत. सोयराबाई त्या काळात म्हणतात ‘देहाचा विटाळ देहीच जन्मला,
उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी, देहाचा विटाळ देहच जन्मला, शुद्ध तो जाहला कोण प्राणी’.
देहाच्या विटाळातूच माणूस जन्मला येतो, त्याच्या जन्माचे मूळ स्थान विटाळच आहे. असा जगात कोण आहे जो विटाळाविना शुद्ध आहे? हेच नाकारण्यासाठी वैदिक ब्राह्मण धर्मग्रंथात ब्राह्मणांनी लिहून ठेवले असावे की ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून पैदा झाले. हाय रे यांचे धर्मशास्त्र…
महाराष्ट्रात दोन जबरदस्त विद्रोही संत होवून गेले. त्यापैकी पहिले संत तुकाराम महाराज आणि दुसरे संत गाडगेबाबा. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी वारकरी पंथाला कर्मठ ब्राह्मणांच्या तोथांडावर जाब विचारण्याची ताकद दिली होती. ही ताकद त्यांच्या विद्रोही काव्यांनी त्यांना दिली. हा विद्रोह दिवसेंदिवस पश्चिम महाराष्ट्रात पसरत चालला होता. त्या विद्रोही वणव्यामुळे ब्रह्मवृंद परेशान. वैफल्यग्रस्त झाला होता त्या वैफल्य ग्रस्तातूनच मंबाजी भट व रामेश्वर भट या दोन भटांनी संत तुकारामांना मारून टाकले. आणि गावात येवून बोंब ठोकली की, तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.
संत गाडगेबाबा हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर फिरणारे चालते बोलते तत्त्वज्ञानाचे विद्यापीठच होते. त्यांच्या जवळ त्यांच्या ठेवणीतला खास वऱ्हाडी (वैदर्भिय) शब्द भंडार होता. हा भंडार त्यांच्या स्वतःच्या मालकीचा होता.
“सोन्याचांदीचा देव त्याले चोराचं भेव… मातीचा देव त्याले पाण्याचं भेव… लाकडाचा देव त्याले इस्त्याचं भेव…” “ह्या देवाले देवपण नाही रे… त्याले सोताचं राखन करता येत नाही रे”… मंग सांगा बावहो तो तुमचं राखन करन काय?” त्यावर लोक म्हणत नाही. मग पुन्हा गाडगेबाबा प्रश्न विचारत “मंग मले सांगा ह्या दुनियेत देव हाय काय?” लोक म्हणत नाही. मंग बोला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला… तर अशा प्रकारे संत गाडगेबाबा आपल्या ठेवणीतल्या शब्दांचे तीर वैदिक ब्राह्मणांच्या मर्मावर सोडून आपल्या कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असत.
अशिक्षित बहिणाबाई आपल्या ओवीतून म्हणतात *’अरे माणसा परी माणूस राहतो रे येडा जाणा, अन् छापील होतो कोरा कागद तुह्याहून शहाणा’* या ओवीतून त्या शिकल्या सवरल्या माणसाच्या खुळेपणावर भाष्य करतात. दुसऱ्या ओवीतून त्या म्हणतात *”अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर… आदी हाताले चटके तवा मियते भाकर”…* बहिणाबाईंच्या या दोन काव्य ओळीत कष्टकऱ्यांच्या साऱ्या संसाराचा सार भरला आहे. *”अरे लेकीच्या माहेर साठी माय नांदते सासरी”…* या काव्य ओळी थेट माय लेकीच्या काळजाचा ठाव घेतात. हे आहे खरं साहित्य. मी वर म्हटल्याप्रमाणे साहित्याचा हुंकार हा बेंबीच्या देठापासून यावा लागतो तो हाच. तो हुंकार आलिशान बंगल्यातील एअर कंडिशनिंग रूममध्ये सोफ्याच्या गुबगुबीत गालीच्यावर बसून लिहिण्यात येत नसतो. दया पवारांचं ‘बलुतं’, लक्ष्मण मानेंचं ‘उपरा’, लक्ष्मण गायकवाडांचं ‘उचल्या’, किशोर काळेंचं ‘कोल्हाट्याचं पोर’ ही अजून वानगीदाखल उदाहरणं. असे बहुजनातील खूप लेखक/लेखिका मंडळी लिहू लागली, बोलू लागली, आपल्या संघर्ष गाथेतून आपल्या व समाजाच्या व्यथा मांडू लागले. निकद्री प्रस्थापित व्यवस्थेला थेट सवाल करू लागले.
खरं साहित्य हे जाती वादाच्या संघर्षात नांदते, स्त्रीच्या अन्याय अत्याचार, तिच्या शोषणावर परखड भाष्य करण्यात नांदते, कष्टकऱ्यांच्या तळहातावर नांदते, शेतकऱ्यांच्या शेतात नांदते, मायलेकीच्या नात्यात नांदते. झोपडपट्टीत कुत्रे, मांजरे, व माणसे यांच्या सोबत नांदते, भटके विमुक्तांच्या पालात कोंबड्या, बकऱ्या, कुत्रे, गाढवं, माणसं, व तीन दगडांच्या चुलीसहित नांदते, आदिवासींच्या जंगलात, त्यांच्या निसर्ग उत्सवाच्या नृत्यात नांदते, रस्त्यावरील पुलाखाली, व चौकाच्या सिग्नल जवळ गजरे विकणाऱ्या चिमुकल्या पोरींच्या गजऱ्यातही.
*”अरे तुम्ही इतिहास खोदून पहा रे, उघडून पहा रे, वाचून पहा रे… या देशाचा सातबारा सम्राट अशोकाच्या नावावर आहे रे”…*
“अरे तुम्ही नव पेशवाई पून्हा आमच्यावर लादू नका रे”… भीमा कोरेगावची अवजारं आम्ही जपून ठेवली रे”…
हे जबरदस्त विद्रोही हुंकार आहेत आजच्या नवकवी, नवतरूणांचे, नव शिक्षितांचे. आजच्या मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेला तंतोतंत लागू पडणारे. याला म्हणतात खरंखुरं साहित्य. अगदी सिंधू संस्कृतीत विदेशी वैदिक ब्राह्मणांनी घुसखोरी केल्यापासून ते आजपर्यंत क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष चालत आलेला आहे. तो अजून कुठपर्यंत चालत राहिल कुणालाही ठाऊक नाही.
संदर्भ: १ जानेवारी १८१८ स्वातंत्र्याचे बंड. लेखक: प्रा. विलास खरात.
-अशोक सवाई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत