नांदेड जिल्ह्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू.

नांदेड जिल्ह्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गोदावरी नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२८ सप्टेंबर) घडली आहे.
देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहरात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
परंतु या तरूणाचे नाव मात्र अद्याप समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बामणी गावात राहणारे देवानंद, बालाजी आणि वैभव हे तीनही शाळकरी मुले गुरुवारी पोहण्यासाठी पाझर तलावाकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
देवानंद व बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर वैभव हा आई वडिलांना एकटाच होता. दरम्यान, मुले पाण्यात बुडाल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. शोधाशोध घेतल्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. ऐन गणेश विसर्जनाच्या धामधुमीत गावातील तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने बामणी गावावर शोककळा पसरली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत