शिकवा चेतवा संघटीत व्हा

बाबासाहेबांनी आम्हाला माणुस म्हणून जगता यावे यासाठी दिलेला मुळमंत्र शिकवा चेतवा संघटीत व्हा.बाबा साहेबांच्या या ब्रीद वाक्याचा आम्ही कितपत सदुपयोग केला याची आम्ही कधी शहानिशा करतच नाही.त्यांच्याच पुण्याईने आम्ही शिकलो,शिक्षीत सूसुक्षीत,उच्च शिक्षीत झालो.नोकरदार उच्च पदस्थ झालो, आमच्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतः साठी करुन स्वविकसीत झालो आणि स्वतः च स्वताच्या स्वार्थांध कोशात बंदिस्त झालो.ज्या शिडीवरून आम्ही चढत गेलो त्या शिडीला खाली पाडत आलो अवती भोवती अंधार करुन स्वतः (पर)प्रकाशात राहात आलो, आणि सामाजिक बांधिलकीला विसरून आपल्या चार भीतीच्या घराला आपलं विश्व समजुन आपलं उखळ पांढरं करित आलो.असे करतांना आपलेही पाय मातीचेच आहेत याचा विसर पडला.आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या मुळे! म्हणतो हे खरं ही आहे पण आकाश मोजतांना पाय जमीनीवर ठेवले नाही, पायाखालच्या जमीनीलाच विसरलो.आता परिस्थिती त्रीशंकू सारखी झाली.वर चढायचे दार बंद झाले आणि खाली उतरायचे रस्ते आम्हीच बंद केले खासगीकरणाचा भस्मासुर नाचत येत आहे आमचं शैक्षणीक खच्चीकरण करायला.बाबासाहेबांच्या पुण्यायीने आम्ही शिकलो आणि आरक्षणा मुळे सरकारी नोकरीत रुजु होऊन प्रस्थापितांच्या पंगतीत बसलो.पण हे आता सर्व भूतकाळात जाणार आहे.प्रत्येक क्षेत्राचं होत असलेलं खासगीकरण बघुन मनाची बैचैनी वाढते. येणार्या पीढीच्या भविष्याचा थोडा जरी विचार केला तर मन चिंतेने ग्रासते. ही चिंता ही भीती जर घालवायची असेल तर, आम्ही कमावलेल्या संपदेतून या खासगिकरणावर तोड म्हणून आमच्या पुढील पिढी साठी केवळ शाळा विद्यालये महाविद्यालयापर्यंत मर्यादित न राहता स्वतः चे विश्व विद्यालय उभारण्याच्या तयारीत असायला पाहिजे.अन्यथा आमच्या पिढीचे भविष्य अंधकारमय आहे, सद्यस्थितीत आमच्या दुरावस्थेचा पाया रचला जात आहे .शिक्षणाच्या बाबतीत आज आम्ही जो उच्चांक गाठला आहे तो आपल्या गुणवत्ते पेक्षा आरक्षणाच्या आधारावर.कोणत्याही गोष्टिला पर्याय हवा पर्याय नसेल तर तीच्या अभावाने माणूस हतबल होतो.खाजगीकरणाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला आताच आत्म निर्भरतेचा पर्याय शोधावा लागेल.आज काळाची पावलं ओळखून वागलो तर उद्याची चिंता राहणार नाही.
ब्रीद वाक्यातील हा शब्द, संघटीत व्हा.हा खरा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे.आम्ही कुठल्या पातळीवर संघटित आहोत?घर पातळीवर,समाज पातळीवर की राजकीय पातळीवर? विचारांती उत्तर नैराश्यातच मीळेल.कुठल्याही पातळीवर आम्ही संघटीत नाही ही शोकांतिका आहे.घरातील एक व्यक्ती एका गटाची तर एक व्यक्ती दुसऱ्या गटाची.समाजाचीही तीच स्थिती आहे.गटागटात पार्ट्या पार्ट्यात विखुरलेला हा समाज कुठल्या एकात्मतेचं स्वप्न बघतो याचा आपण विचार करायला हवा.गटबाजीने पोखरलेल्या या समाजाला एक सुत्र एक संघ करणे गरजेचे आहे. दुसऱ्याचे तळवे चाटणारे काही तथाकथित पुढारी भीमाच्या नावाचा उपयोग करून आपली दुकान मांडत आहेत, आणि क्षुल्लक स्वार्थासाठी आमच्या भावनेशी खेळून आमची लूट करत आहेत.असे नेते समाजाची एकी होवूच देणार नाहीत. राजकीय पुढाऱ्यांच्या राजकीय पार्टीचे तर सांगायलाच नको तुकडे तुकडे झालेला रिपब्लिकन पक्ष आणि विखुरलेल्या बौद्ध महासभा आणि वेळी अवेळी मतभेदांमुळे किंवा आपसी हेवेदावे लोभामूळे निर्माण झालेल्या अगणित संघटना यांनी जर भानावर येवुन मी पणाचे ओझे पायदळी तुडवून पक्षीय राजकारण सोडुन जर एकतेची तुतारी फुंकली तर सत्ताधारी पक्षाला सर्वात बलाढ्य विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची गणना होईल.आपणच आपल्या एकात्मतेचं चीर हरण करुन त्याची लक्तरं वेशीवर टांगत आहोत बेकिची असूरक्षतेची टांगती तलवार आपणच आपल्या मानेवर ठेवीत आहोत.आपणच आपल्या हाताने आपल्या संघटनेची हत्या करुन तीचं कलेवर घेऊन मिरवत आहोत,हे आमच्या लक्षात यायला पाहिजे. आम्हाला लाज वाटायला हवी आमच्या अशा या संघटनेची.भीम जयंतीचीच गोष्ट घ्या.गावात नसेल कदाचित पण नीम शहरात, शहरात,एकाच वस्तीत वेगवेगळ्या ठिकाणी जयंतीचा जल्लोष सुरु असतो.जयंती जल्लोष करायलाच हवा पण दोन ठिकाणी कशासाठी? जयंतीच एकीने नाही.भीम जयंतीच्या मीरवणुकितील घोषणा?जो हमसे टकरायेगा मीट्टी में मील जायेगा.हम सब एक हैं इत्यादी घोषणाबाजी ने परीसर दणाणतो.
घोषणा ऐकुन स्फुरण चढते पण वास्तवात उतरलो तर दारुण चित्र पाहून मन चित्कार करते.आमच्या आंधळेपणाची, विचार शून्यतेची कीव येते.जोश ठिक आहे हो–!पण होशाचं काय? आपल्या धम्मीक भावनेचेही चित्र चिंतनीयच आहे.एकाच मोठ्या वस्तीत दोन दोन बुद्ध विहार बघायला मिळतात.कशासाठी? केवळ मानमरातबासाठी स्व इगो साठी असे हास्यास्पद कार्य आम्ही करतो,आणि आपसात विखरून जातो.तोच विहार जर एका ठिकाणी असेल तर आचार विचारात बळकटी येईल. एकीचं सामर्थ्य दिसेल.जयंतीची साधी वर्गणी मागायला गेलो तर कुणा कुणाला वर्गणी द्यायची! कित्येक लोकं येतात मागायला—सामान्य माणसाच्या तोंडून ही चीड युक्त शब्द नेहमीच ऐकायला मिळतात, पण आम्ही समजून घेत नाही की अप्रत्यक्षपणे तो आम्हाला एक व्हायला सांगतो. एक व्हा आणि एकाच ठिकाणी दणकेबाज जयंती साजरी करा असे त्याला म्हणायचे असते हे आपण लक्षात घेत नाही.उलट तुला समाजाचं धर्माचं पाणी नाही असं म्हणुन त्याची अवहेलना करतो.आम्हाला टक्कर देणाऱ्याला मातीत मिळवण्याचं सामर्थ्य जर आमच्यात असतं तर आज दैनंदिन जी अन्याय अत्याचाराची प्रकरणे घडत आहेत ती घडली नसती.निव्वळ बोलाची कढी भात आणि केवळ पोकळ घोषणा देत राहुन आपल्या पोलंमपोलतेचे प्रदर्शन मांडणे थांबविने गरजेचे आहे.आणि हे सर्व गटांचे संघटनांचे पक्षांचे एकीकरण होईल तेव्हाच शक्य आहे, नाही तर भीम विचारांची आमच्याच कडून होणारी हत्या निरंतर होतच राहणार.
तीसरा शब्द संघर्ष.संघर्षाविषयी काय बोलावं?जीथे संघटनेचेच तेरा वाजले तीथे संघर्ष कसा व्हावा?एकट्याने एकट्यासाठी संघर्ष केल्याने व्यक्तीगत हीत साध्य होईल पण समाज हितासाठी संघर्ष करणे कुण्या एकाचे काम नाही.आपले हक्क ही आपल्याला सुखासुखी सहज मीळत नाहीत त्या साठी ही संघर्ष करावा लागतो.त्यासाठी एकी पाहिजे.एकी शिवाय संघर्ष नाही.म्हणुन सांगावेसे वाटते आपण सर्वांनी शिकावे एक व्हावे व संघर्ष करावा आणि शिकवा चेतवा संघटीत करा*या भीम तत्वाचे होणारी दूर्दशा थांबवावी.
एम एल गोपनारायण.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत