प्रजासत्ताक दिन

डाॅ.दिलीपकुमार कसबे
२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या भारत देशामधील प्रजेच्या हाती सत्ता देण्यात आली म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली. म्हणजे नेमके काय तर लोकांनी लोकांच्या साठी चालविलेले राज्य होय.१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज भारतातून निघून गेले .जवळ जवळ दिडशे वर्षे इंग्रज भारतात राहिलेले होते.केवळ व्यापाराच्या उद्देशाने बाहेर पडलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पुढे हळू हळू त्याचे रूपांतर इंग्रजांच्या सत्तेत झाले म्हणजेच आपण अर्थात भारतीय लोक पारतंत्र्यात गेलेले होते. इंग्रज इथे येण्यापूर्वी इथली जनता. संस्थानिक, सरंजामदार, जमीनदार, वतनदार सेठ साहुकार यांच्या ही एकप्रकारे अधिपत्या खाली असल्या सारखीच होती . कारण पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांच्याकडे काम मिळेल त्यांच्याकडे जावे लागत असे. छोट्या मोठ्या अडचणी सोडवायच्या असतील, न्याय मिळवायचा असेल तर तीच माध्यमे होती.सरकार सरकार म्हणजे नेमकी काय स्थिती होती तर अशी अवस्था होती हेच सामान्य जनतेचे सरकार होते.मग यांच्याकडून सुद्धा पिळवणूक होत असायची. पैसा हवा असेल तर घर,जमीन गहाण ठेऊन व्याजाने रक्कम घ्यायची. त्याच्यावर चक्रवाढ व्याज असायचे, त्यामुळे उसणे घेतलेले पैसे अनंत अडचणी मधून किती ही फेडण्याचा प्रयत्न केला तरी ते फिटत नसायचे. सामान्यांना तेच मायबाप असायचे. जमीन,सोने,घर गहाण ठेवले की ते तसेच रहायचे. आज ही आपण बँकेतून कर्ज घेतले तरी आपल्या अडचणी मुळे वेळेवर फिटत नाही प्रसंगी जप्ती सारखे प्रसंग उभे रहातात. पण बँकेचे व्याज वार्षिक ०९, १०,१२ किंवा १४% मग ते राष्ट्रीय बँका,को-ऑप.बँक, पतसंस्था अथवा पतपेढी अशा माध्यमातून दाखविलेले दर असू शकतात किंवा थोडे कमी अधिक राहू शकतात. मात्र खाजगी कर्जांचे असे नसते. कदाचित ते मासिक ही व्याजदर असतात. मग याच्यावरून विचार करता येऊ शकतो. इंग्रज आल्यामुळे लोकांच्यात राष्ट्र, देश,मातृभूमि या भावना दृढ झाल्या. लोकांना जाणवू लागले परदेशातून लोक या भूमित येतात आणि मालकी हक्क गाजवितात.इथले देशी उद्योग नाहीसे होऊ लागले विदेशी चकचकीत आकर्षक वस्तूनी बाजार भरू लागले लोक बेरोजगार ही होऊ लागले.त्यातूनच देशप्रेमाची भावना जागृत होत गेली. लोक इंग्रजा विरूद्ध विदेशी वस्तूंच्या विरोधात आवाज उठवू लागले.इंग्रजानी इथल्या शासन व्यवस्थेत, संसदेत प्रतिनिधी घेतलेले होते.ते जनतेचे प्रतिनिधी होते ते जनतेची भूमिका,अडचण, इत्यादी विषयांवर आवाज उठवित होते.यातूनच दुसर्या महायुद्धात स्वत:ची इज्जत राखण्यासाठी इंग्रजांनी भारतीयांचे सहकार्य घेतले.
आज हा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने आपण साजरा करतोय.पण इथल्या प्रत्येक नागरिकाने याच्यावर विचार केला पाहिजे .प्रजासत्ताक दिनाचा नेमका अर्थ काय ?आणि हे जाणून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने भारतीय संविधानाचा अभ्यास करावयास हवा तरच आपणा प्रत्येकाला कळेल की माझी नेमकी कोणती कर्तव्ये आहेत मला या संविधानामुळे कोणते हक्क मिळालेले आहेत.केवळ झेंडा वंदन करून,जिलेबी खाऊन चालणार नाही.तर प्रजेच्या हाती सत्ता दिली म्हणजे नेमके काय आहे?तरच प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा खरा आनंद आपण घेतला असे म्हणता येईल. ज्यांच्या खांद्यावर आता आपण ही जबाबदारी दिली आहे.ज्यांच्याकडे सरकार सोपविले आहे त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा सामान्य जनतेला संविधानाच्या प्रती वाटून वाचण्यास प्रवृत्त करावयास हवे. शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाले पाहिजे.केवळ दिवस साजरा करून चालणार नाही.पण हे घडेल असे होत नाही.जनतेला त्यांचे हक्क आणि अधिकार दाखवून काय उपयोग. मग राज्य करणे,सत्तेत राहणे अशक्य होऊ शकते.पण जागतिक पातळीवर देशाचा खरा विकास घडवायचा असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क व कर्तव्ये समजायला हवीत.अन्यत: मूठभर राज्यकर्तेच सर्वेसर्वा होत राहणार.नेते जनतेला जे सांगतील ते ऐकायला टाळ्या वाजवायला व केवळ मतदान करण्यासाठी जनता शिल्लक राहू नये.असे वाटते .प्रश्न विचारणारे ,योग्य ला योग्य म्हणणारे,चुकीला चूक म्हणणारे चुकले तर कबूल करणारे असावे लागतात. असे होऊ नये म्हणून जनतेने चिंता व चिंतन ही करणे गरजेचे आहे.राज्य देश चलविण्यासाठी जनतेचा मेंदू जागृत असायला हवा.आजकाल च्या मोबाईल च्या टेक्निकल च्या जमान्यात केवळ अंधभक्त राहून चालणार नाही डोळेझाक पणे विश्वास ठेवून चालणार नाही.कुठेतरी प्रत्येक वाचकांने खात्री ही करावयास हवी.कोणीतरी सांगतय ते खरे असे म्हणून चालत नाही.कारण घरा- घरात आई-वडीलांच्यानंतर भावा -भावांच्या मध्ये अविश्वास निर्माण होतो.टोकाची भांडणे केवळ वाटपावरून, पैशावरून, शेतीवरून संपत्तीवरून होत असतात म्हणून कोणावर ही विश्वास ठेवण्यापेक्षा पडताळून पहा,खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा .कारण आज जो आपल्या हातात देश आहे या साठी कोण्या एका जातीचे,समाजाचे अथवा धर्माच्या लोकांचे रक्त सांडलेले नाही अथवा प्राणांचे बलिदान झालेले नाही तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी बलिदान केलेले आहे.तात्या टोपे,राणी लक्ष्मीबाई, वि.दा.सावरकर, लाल, बाल,पाल,महात्मा गांधी,सरदार वल्लभभाई पटेल,मौलाना आजाद,चक्रवर्ती राजगोपालचारी,खुदीराम बोस,डाॅ.राजेंद्र प्रसाद,राजगुरू,भगतसिंग, सुखदेव खान अब्दुल गफारखान,पीर अलीरखान,बिरसा मुंडा,कमला दोस्,कमलादेवी चट्टोपाध्याय ,जवाहरलाल नेहरू या सर्वांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते.या शिवाय आणखी किती तरी नावे आहेत पण सर्वांची नावे सांगणे अवघड आहे. या सर्वांचा कमी अधिक सहयोग झाला म्हणूनच आजचा दिवस आपण पहातोय ही.आज ऐवढी वर्षे आपण पूर्ण करतोय.आपण सुखाने रहात आहोत.त्या सर्वांच्या बलिदानाचे, त्यांच्या त्यागाचे,त्यांच्या सांडलेल्या रक्ताचे भान आपण ठेवले पाहिजेत असेच म्हणावे लागेल.
प्रजासत्ताक दिनाचे महत्व सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे.इथे कोण्या एका धर्माचे नव्हे तर कितीतरी धर्माचे,पंथाचे,सम्प्रदायाचे,जातीचे लोक या देशात राहतात. या सर्वांनासमोर ठेवून संविधान कर्त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील जास्तीत जास्त संविधानांचा अभ्यास करून सर्व समावेशक समतावादी संविधानाची निर्मिती केली.समता,न्याय, बंधूता या त्रिसूत्री चा वापर केलेला आहे.म्हणूनच आपण मोठ्या बंधूभावाने रहात आहोत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, डाॅ.ए.पी. जे अब्दुल कलाम,द्रौपदी मुर्मु,रामनाथ कोविद,असे वेगवेगळ्या जाती धर्माचे मंत्री, राष्ट्रपति,पदाधिकारी होऊन गेले काही आहेत हे केवळ संविधानामुळेच शक्य होत आहे.डाॅ बाबासाहेबांना माहित होते जर संविधानात धर्माला प्राधान्य दिले तर सरकार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही.कारण आपला देश केवळ एक धर्मवाशीय नाही.अराजकता माजू शकते. अल्पसंख्याकांच्या वरती पुढे अन्याय अत्याचार होत राहतील. म्हणून त्यांनी लंगडा,आंधळा,मुका बहिरा,सवर्ण, अवर्ण या सर्वांचा कसा विकास होईल हे पाहण्याच्या अनुषंगानेच संविधानात तरतूदी केलेल्या आहेत. याचे काटेकोर पणे पालन होत राहिले तर लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास म्हणावा लागेल. पण हे राज्यकर्त्यांनी मनापासून राबविले तरच हे शक्य होऊ शकते.आज सामान्य लोकांना उद्योग हवा.तरूणांना खात्यावर केवळ पैसा देवून चालणार नाही तर बहिणीना लाडकी ही करून चालणार नाही, त्यांच्या मधील आळसाला संधी देऊन चालणार नाही. त्यांच्यामधील क्रियाशीलतेला संधी दिली पाहिजे नव नवीन उद्योग निर्माण करून त्यांच्या कल्पना शक्ती,वेळेचा अधिकाधिक उपयोग करून घेतला पाहिजे .त्यांना कष्ट करण्याची सवय लावली पाहिजे.त्यांच्या घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला पाहिजे प्रत्येक शिक्षण रोजगाराभिमुख आहे हे ही पटवून सांगता आले पाहिजे. ज्यांनी रोजगाराभिमुख शिक्षण घेतले आहे त्यांच्या त्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे.कुठेतरी काम मिळाले पाहिजे.शिक्षणाचे बाजारीकरण होता कामा नये.तरूणांच्या आयुष्याशी खेळ होऊ नये.सत्तेचा उपयोग केवळ स्वत:साठी नातेवाईक यांच्यासाठी होऊ नये .जनता आहे तर देश आहे .
म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकाने भारत भूमीच्या रक्षणासाठी सरसावले पाहिजे.त्या ठिकाणी जात,धर्म, पंथ,हे सर्व बाजूला ठेवले पाहिजे.धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर प्रत्येकाला आप आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचा हक्क आहे.इथे असणाऱ्या कोणत्याही धर्माला कमी लेखू नये.जसा आपला धर्म तसाच इतरांचा ही धर्म आहे. जशी आपण आपल्या धर्माचे रक्षण करतो तसेच इतर धर्माचे रक्षण ही व्हावयास हवे.सर्वांनी मिळून मिसळून राहिले पाहिजे.धर्मा धर्मातून मानवतेचे रक्षण झाले पाहिजे ,कारण गरीब हवा,श्रीमंत हवा,हुशार हवा, ज्ञानी हवा, शेतकरी हवा,नोकर हवा,मालिक हवा . साहित्यिक हवा,वैज्ञानिक हवा. म्हणजेच इथे सगळ्यांचीच गरज आहे.प्रत्येकाचा उपयोग होत असतो.उपयोग कोणाचा, आणि कोणाचा नाही याचे उत्तर मिळणे अवघड आहे. म्हणून देशातील प्रत्येक नागरीकाचे हक्क अबाधित ठेवण्याचे काम आपले संविधान करतांना दिसते आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिज की प्रजेच्या हातात सत्ता हवी असल्यास संविधानाचे रक्षण करणे म्हणजे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचेच कर्तृव्य आहे असे नव्हे तर माझे ही कर्तृव्य आहे.मिळालेले जायला वेळ लागत नाही.तर टिकवायला वेळ द्यावा लागतो.हक्कासाठी लढाई सुद्धा करावी लागते.म्हणून विचार करावयास हवा की माझे कर्तव्य बजावत असतांना कोणावर अन्याय तर होत नाही ना.मग पत्रकार, वृत्तपत्रकार,डाॅक्टर, पोलीस, सरकार या सर्वानीच चिंतन केले पाहिजे की माझ्याकडून सर्वाना न्याय तरी मिळतोय ना.प्रत्येक जण आपल्या कर्तव्याची पूर्ती करत आहेत.तसे नागरिकांनी सुद्धा दक्ष रहायला हवे.
डाॅ.दिलीपकुमार कसबे स.गा.म.काॅलेज,कराड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत