देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

डॉ. बाबासाहेबांची ब्लू प्रिंट

लेखक : डॉ. ह. नि. सोनकांबळे


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच दलित या
घटकापुरता मर्यादित आणि संकुचित विचार केला नाही.
भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाची निळी प्रिंट (ब्ल्यू प्रिंट)
त्यांनी अगोदरच तयार करून ठेवली होती.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे*
*व्यक्तीमत्व केवळ आजचा विचार*
*करणारे नव्हते ते आजच्यासह*
*उद्याचाही विचार करायचे.*
*या देशाला एका वेगळ्या*
*उंचीवर नेवून ठेवायचे सामर्थ्य*
*त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच*
*’नवयुग’च्या एका लेखात*
*अत्रे यांनी स्पष्टपणे असे आवाहन*
*केले होते की, अमेरिका आणि रशिया*
*यांच्याशी स्पर्धा करण्याइतके*
*”सामर्थ्य या देशाच्या अंगी यावे,*
*असे आपल्याला जर वाटत असेल,*
*तर आपण ह्या देशाच्या भवितव्याची*
*सूत्रे नेहरू आणि आंबेडकरांसारख्या*
*अद्वितीय बुद्धिमत्तेच्या मुत्सद्यांच्या*
*हाती सोपविली पाहिजेत.*

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्यावर अतिशय समर्पक भाष्य अत्रे यांच्या लेखणीतून बाहेर आल्याचे दिसते. आचार्य प्र. के.‌ अत्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना *’नवभारताचे निर्माते’* असे संबोधले आणि यातच सर्व काही आले असे म्हणावयास काही हरकत नाही. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला समजून घेण्यास आमचे व्यक्तीमत्व मात्र नंतरच्या काळात खुजे पडले, हे मान्यच करावे लागेल. दिवसेंदिवस भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विषय महत्वाचा आणि गांभीर्याचा बनत चालला आहे. एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित या शब्दात बंदिस्त करण्यासाठी अनेकांनी टोकाचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे नंतरच्या काळात केवळ भारतापुरते मर्यादित राहिल्याचे दिसत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बकी यांनी जानेवारी २००८ मध्ये त्यांच्या संसदेत दिलेले भाषण, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य जेरमी कार्बीन यांनी अनेक वेळा ब्रिटिश संसदेमध्ये दिलेले‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ आणि त्याच संसदेचे सदस्य जेफ्री हून यांनी भारताची केलेली आधुनिक व्याख्या याशिवाय, शिक्षणक्षेत्रात कोलंबिया विद्यापीठ, सायमन फ्रेजर विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये वेळोवेळी होणारी चर्चा आणि हंगेरीमध्ये त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या शाळा, या जागतिक स्तरावरच्या घटना त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आणि महत्व सिद्ध करतात.

भारतात मात्र अजूनही त्यांची ओळख दलित या शब्दाअंतर्गत करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दलितांसाठी केले, आम्हा हिंदुंसाठी काहीच केले नाही, ही भावना इथल्या हिंदू धर्मातील लोकांना समजावून सांगत असताना आणि सावरकर ते भाजप या ग्रंथाचा शेवट करत असताना *स. ह. देशपांडे* यांनी दिलेले उत्तर मला हिंदू जनतेसाठी महत्वाचे वाटते. ते *म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ सालीच हिंदुमात्रांच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात नव्या समाजरचनेची सूत्रे सांगितली होती. या विषम समाजरचनेची कडू फळे चाखायची नशिबी आलेला पण मन हिंदुत्वाएवढे मोठे केलेला एक दलित विद्वान आणि लढवय्या नेता साठसत्तर वर्षांपूर्वी हिंदुसंघटनपक्षास मिळाला असता तर देशाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली असती. ती संधी त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांनी घालवली आहे. परंतु ती संधी आजच्या हिंदुंनी तरी घालवू नये असे मला वाटते.”* देशपांडे यांच्या या वाक्याचा अर्थ आजच्या हिंदू पिढीने तरी समजून घेतला पाहिजे. कारण या देशातल्या सर्व जनतेच्या उद्धाराचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे.

देशाची फाळणी होण्याच्या अगोदरच त्यांनी लोकसंख्येच्या अदलाबदलीचा विचार मांडला होता. कारण एक वेळेस पाकिस्तानमध्ये जर हिंदू जनता अडकून राहिली तर त्यांना भविष्यात खूप त्रास सहन करावा लागेल याची जाणीव त्यांना होती. परंतु त्याकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केले गेले. फाळणी झाल्यानंतर देखील पाकिस्तानात अडकून पडलेल्या हिंदुंना भारतात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू आणि पटेलांकडे आग्रह धरला आणि महार बटालियन पाठवून पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतात आणले गेले. परंतु या गोष्टी आपण आजही समजून घेत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात नेहमी हे राष्ट्र आणि या राष्ट्रात राहणारा व्यक्ती होता. त्यांनी या दोघांच्या विकासाचा जेवढा विचार केला होता तेवढा कदाचितच कोणत्या नेत्याने केला असावा. म्हणूनच *प्र. के. अत्रे असे म्हणतात की, अखंड भारताचा ऐक्याचा आणि स्वातंत्र्याचा त्यांच्याएवढा प्रचंड निष्ठावंत पुरस्कर्ता या देशात दुसरा नाही. परंतु त्यांना आपण केवळ हिंदुंचे आणि भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक एवढ्यापुरतेच मर्यादित समजून घेतले.*

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच दलित या घटकापुरता मर्यादित आणि संकुचित विचार केला नाही. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाची निळी प्रत (ब्ल्यू प्रिंट) त्यांनी अगोदरच तयार करून ठेवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व केवळ आजचा विचार करणारे नव्हते, ते आजच्यासह उद्याचाही विचार करायचे. या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच *’नवयुग’* च्या एका लेखात *अत्रे यांनी स्पष्टपणे असे आवाहन केले होते की, अमेरिका आणि रशिया यांच्याशी स्पर्धा करण्याइतके सामर्थ्य या देशाच्या अंगी यावे असे आपल्याला जर वाटत असेल, तर आपण या देशाच्या भवितव्याची सूत्रे नेहरू आणि आंबेडकरांसारख्या अद्वितीय बुद्धिमत्तेच्या मुत्सद्यांच्या हाती सोपविली पाहिजेत.* परंतु भविष्यात तसे झाले नाही. वेळोवेळी त्यांना हिंदुविरोधी विशेषणे लावून त्यांचा राजकीय पराभव केला गेला. यासाठी अडाणी आणि धर्मभोळ्या जनतेचा त्यांच्या विरोधात वापर केला गेला.

त्यांनी जेव्हा स्त्रियांच्या उद्धारासाठी हिंदू कोड बिल मांडले तेव्हा अडाणी आणि धर्मभोळ्या स्त्रियांचा वापर त्यांच्या विरोधात केला गेला, याचा स्पष्ट उल्लेख ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानावर हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोर्चा पाठवला गेला. आमच्या सांस्कृतिक वैभवाचे डॉ. आंबेडकर हेच विरोधक आहेत असा भास कायम ठेवला गेला. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रसायनच असे होते की, त्यांनी अगोदरच सांगितले होते, तुम्ही माझ्या विचारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि ते सार्थही ठरले. ज्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी अट्टाहास धरला होता परंतु ते तत्कालीन परिस्थितीत मंजूर झाले नाही. त्याच हिंदू कोड बिलावर आधारित स्त्रियांच्या उद्धारासाठी भविष्यात बावीसहून अधिक कायदे तयार केले गेले. पण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित आहेत, हे इथल्या व्यवस्थेने लोकांना कळूच दिले नाही. कामगार मंत्री असताना धनाबादच्या कोळशाच्या खाणीला भेट देवून आल्यानंतर गरोदर स्त्रियांना पगारी सुट्ट्या मिळाव्यात यासाठी कायदा त्यांनीच तयार केला. आज त्या कायद्यातील सुट्यांचे प्रमाण सहा महिने झाले आहे. परंतु याची जाणीव किती भारतीय स्त्रियांना आहे हा प्रश्नच आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत का ? याचा शोध आम्ही भारतीयांनी घेतला पाहिजे.

देशाला भेडसावणारे प्रश्न मग तो भारत पाकिस्तान फाळणीचा असो, काश्मीरचा असो की भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा असो, अशा कितीतरी प्रश्नांवर त्यांनी उत्तरे शोधून ठेवली आहेत. परंतु ते समजून घेवून त्याची अंमलबजावणी करण्यात आमची राजकीय शक्ती कमी पडत आहे, असेच म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राच्या विकासाला चालना देणारे नदी जोड प्रकल्प, शैक्षणिक धोरणे याचा आराखडाच तयार केला होता. परंतु त्यांच्या जाण्याने अशी कितीतरी कामे आजही अपूर्णच आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्टेजवर दिसत आहेत, परंतु त्यांच्या राष्ट्राच्या आणि मानवतेच्या विकासाची *’ब्लू प्रिंट’* कोणाकडेही नाही. ज्या दिवशी ही ‘ब्लू प्रिंट’ घेवून एखादा राजकीय पक्ष या देशाच्या सत्तेवर येईल त्याच दिवशी आपण खऱ्या अर्थाने या महाकारुणीकाला समजून घेण्यात यशस्वी ठरणार आहोत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!